टोकियो (संदीप चव्हाण) : टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये सध्या भारतीय महिला खेळाडूंचा बोलबाला आहे. नारीशक्तीचा अनोखे दर्शन टोकियो ‘ऑलम्पिक’मध्ये पाहायला मिळतेय. ‘ऑलिम्पिक’च्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने भारताला ‘सिल्व्हर मेडल’ जिंकून दिले. आज त्यात भारतीय महिला बॉक्सर लवलीनाने आणखीन एका मेडलची निश्चिती केली आणि दिवस मावळताना पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या ‘सेमी फायनल’मध्ये धडक दिली.
बॉक्सर लवलीनाने तैपेईच्या चेन चीनचा ‘४-१’ असा पराभव करीत ‘सेमी फायनल’मध्ये धडक दिली. चेन चीन या खेळाडूने दिल्लीत झालेल्या वर्ल्डकपमध्ये ‘गोल्ड मेडल’ जिंकले होते. ‘सेमी फायनल’मध्ये तिची गाठ आता तुर्कस्तानच्या सुरमेनेली बुसेनाझशी पडणार आहे. या बुसेनाझने रशियातील वर्ल्डकपमध्ये ‘गोल्ड मेडल’ मिळवले होते. लक्षात घ्या, या दोन्ही वर्ल्डकपमध्ये लवलीनाला ‘ब्राँझ मेडल’ मिळाले होते. जर बुसेनाझला पराभूत केले, तर ती ‘फायनल’ला धडकेल. जिंकली तर ‘गोल्ड’ आणि हरली तर ‘सिल्व्हर’ आणि ‘सेमी फायनल’ हरली, तरी ‘बॉक्सिंग’च्या नियामानुसार दोन्ही ‘सेमी फायनल’ पराभूत खेळाडूंना ‘ब्राँझ मेडल’ दिले जाते. विशेष म्हणजे, लवलीना ज्या ‘वेल्टरवेट’ गटात खेळते. त्या वजनी गटाचा यंदा ‘ऑलिम्पिक’मध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. लवलीनाने या संधीचे सोने केले. येत्या दि. ४ ऑगस्ट रोजी लोवलिना ‘सेमी फायनल’ची मॅच खेळेल.
ईशान्य भारतातील मीराबाई चानू आणि लवलीना या दोन खेळाडूंनी भारताला ‘मेडल टॅली’मध्ये मानाचे स्थान दिले. या दोन्ही खेळाडूंमध्ये एक साम्य आहे. दोन्ही गरीब कुटुंबांतून आल्या. उद्याच्या खाण्याची भ्रांत दोघींना होती. पोटातील या भुकेलाच या दोघांनी आपली ताकद बनविले आणि टोकियोत इतिहास घडविला.
भारताची तिसरी कन्या पी. व्ही. सिंधूने अपेक्षेप्रमाणे बॅडमिंटनमध्ये आपली विजयी आगेकूच कायम राखत ‘सेमी फायनल’मध्ये धडक दिली आहे. मेडलपासून ती आता फक्त एक विजय दूर आहे. जपानच्या चौथ्या मानांकित यामागुचीचा तिने सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. ‘रिओ ऑलिम्पिक’मध्येही सिंधूने जपानच्या त्यावेळेच्या सहाव्या मानांकित ओकूहाराचा पराभव करत ‘फायनल’मध्ये धडकी दिली होती आणि ऐतिहासिक ‘सिल्व्हर मेडल’ जिंकले होते. यजमान जपानच्या या दोन्ही खेळाडूंना आज ‘क्वॉर्टर फायनल’मध्ये पराभव पत्करावा लागालाय. ‘ऑलिम्पिक’मध्ये सिंधूपुढे जपानचा निभाव लागत नाही हेच खरे.
जपानवर दुसरा विजयी हल्ला केला, तो भारतीय पुरुष हॉकी संघाने. भारताने जपानचा ‘५-३’ असा पराभव केला. ‘अ गटा’तून दुसर्या क्रमांकाने भारताने ‘क्वॉर्टर फायनल’ गाठली आहे. भारताची ‘क्वॉर्टर फायनल’मध्ये आता ‘ब गटा’तील तिसर्या क्रमांकावर असणार्या ब्रिटनसोबत गाठ पडेल. १९८० साली ‘मॉस्को ऑलिम्पिक’मध्ये भारताने ‘गोल्ड मेडल’ जिंकले होते. त्यानंतर गेली ४२ वर्षे ‘ऑलिम्पिक हॉकी मेडल’ने भारताला हुलकावणी दिली आहे. यंदा भारतीय पुरुष हॉकी टीमचा फॉर्म पाहता मेडलची खात्री देता येईल.
‘ऑलिम्पिक’मधील महाराष्ट्राचे आव्हान होते ते तीन हजार मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे आणि नेमबाज राही सरनौबत यांच्यावर. अविनाशने ‘ऑलिम्पिक’मध्ये ८ मिनिटे १८.१२ सेकंदाच्या नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, पण तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही. प्राथमिक लढतीत त्याच्या गटाता त्याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
‘शूटिंग’मध्ये भारताची निराशाजनक कामगिरी आजही कायम राहिली. महाराष्ट्राची राही सरनौबत २५ मीटर पिस्तुलच्या प्रकारात मेडलची दावेदार मानली जात होती. पण अंतिम फेरीतील आठ खेळाडूतही तिला स्थान पटकावता आले नाही. तिची ३२ व्या क्रमांकावर घसरण झाली. एशियाडच्या २५ मीटर पिस्तुलमध्ये ‘गोल्ड मेडल’ जिंकणारी राही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती. क्रोएशियात एक महिना आधी झालेल्या वर्ल्डकपमध्येही राहीने ‘गोल्ड मेडल’ जिंकून अपेक्षा उंचावल्या होत्या. पण तिला आज सूर गवसला नाही. आता महाराष्ट्राची तेजस्विनी सावंत ‘रायफल थ्री पोझिशन’मध्ये आपले कौशल्य आजमावेल.
दिल्लीतील ‘कॉमनवेल्थ’मध्ये महान धावपटू मिल्खा सिंगशी गप्पा मारण्याची संधी मिळाली होती. मिल्खांना ‘फ्लाईंग शीख’ म्हटले जायचे. त्यांच्या यशाचे रहस्य काय असा प्रश्न मी त्यांना विचारले होते... तेव्हा ते मिश्किलपणे हसून म्हणाले होते. ‘बेटा बचपनमें इस पेटने बढी भूख झेली हैं... पेट की यह भूखही आपको दौडना और जितना सिखाती हैं ।’ मीराबाई, लोवलिना या खेळाडू मिल्खा सिंगचा वारसा चालवत आहेत. भारताची ‘मेडल’ची भूक प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये वाढते आहे आणि त्यात महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे. लंडन ‘ऑलिम्पिक’मध्ये बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, आणि बॉक्सर मेरीकोमने ‘ब्राँझ मेडल’ जिंकले होते. गेल्या ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सिल्व्हर, तर कुस्तीपटू साक्षी मलिकने ‘ब्राँझ मेडल’ जिंकले होते. यंदाही पहिली दोन मेडल नक्की करणार्या मीरा आणि लोवलिना या महिला खेळाडू आहे आणि सिंधू ही मेडलच्या नजीक पोहोचली. नारीशक्तीच्या उदयाचे कौतुक करावे तितके कमी आहे.