
टोकिया : उत्साहाला वय असते का? जिद्दीला मर्यादा असते का? मेरी कोमला जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारता तेव्हा तिचे उत्तर असते, “जब तक खेलना हैं, जी जान से खेलना हैं...! खिलाडी पहले दिमाग और फिर दिल की सुनता हैं। जबतक यह दोन्हो हार नही मानते तबतक खेलूंगी...!” टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये ‘प्री क्वार्टर फायनल’मध्ये तिला कोलंबियाच्या वेलिंसियाकडून पराभव पत्कारावा लागला. हा पराभव तिच्या बिलकूल जिव्हारी लागलेला नाही. मॅचनंतर हसतच ती आम्हा पत्रकारांना समोरी गेली.
त्यात जगभरातील पत्रकार होते. पराभवासाठी ‘कारणं देणे तिच्या रक्तात नाही. गुणांच्या विभागणीवर तिचा पराभव झाला. साध्या सोप्या शब्दात जिगरबाज खेळ करून ती हरली. या मॅचला सुरुवात होण्यापूर्वी काही मिनिटे आधी तिला मॅच अधिकार्यांनी तिचा टीशर्ट बदलायला सांगितले. कारण, काय तर तिच्या टीशर्टवर तिचे नाव स्पर्धेच्या ‘फॉरमॅट’नुसार नव्हते. खरेतर कोणत्याही खेळाडूंसाठी पराभवाचे कारण देण्यासाठी हे चांगले आयते कारण. पण, ही तर ठरली मेरी कोम.
तिला आम्ही याबाबत विचारल्यावर हसतच ती म्हणाली,“पराभव हा पराभव असतो. मॅच ‘बॉक्सिंग रिंग’च्या आत खेळली जाते. बाहेर काय घडते यांनी मला काही फरक पडत नाही. यापूर्वी तीन वेळा मी वेलिंसियाशी खेळले आहे. आम्ही दोघी एकमेकांना चांगले ओळखतो. ती आज माझ्यापेक्षा चांगली खेळली.” मेरीचे हे असे साधे सोपे असते. कारण मेरी आता महानतेच्या पंक्तीत जाऊन बसलीय. सध्या ती राज्यसभेवर खासदार आहे. एखादी खासदार खेळाडू ‘ऑलिम्पिक’ खेळतेय हेही बहुदा जगातील पहिलीच घटना असावी. पण मेरीने ‘सगळ्यात पहिली’चे असे अनेक शिखरे आजवर पार केलीत.
जागतिक हौशी संघटनेचे जेतेपद सहा वेळा जिंकणारी पहिली आणि एकमेव खेळाडू. जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपदाच्या सातही लढतीत मेडल जिंकणारी ती पहिली बॉक्सर, ऑलिम्पिकला पात्र ठरणारी भारताची पहिली बॉक्सर, लंडन ऑलिम्पिकमध्ये ‘ब्राँझ’ जिंकून ‘ऑलिम्पिक मेडल’ जिंकणारी पहिली खेळाडू. याशिवाय एशियन आणि राष्ट्रकुलमध्येही ‘सगळ्यात पहिली’ अशा प्रकारच्या अनेक विक्रमांची लयलूट केलीय. ही यादी न संपणारी आहे.
२० वर्षांहून अधिक काळ मेरीने बॉक्सिंग विश्व गाजवले. मध्यंतरी ती तीन मुलांची आई बनल्यावर तिच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडलची लयलूट करीत तिने यंदा ‘ऑलिम्पिक’ही गाठलेच. “जोवर मी खेळातून आनंद लुटतेय आणि माझ्या देशवासीयांना खेळाचा आनंद लुटू देतेय तोवर खेळायचे.” मेरीचे आतातरी इतकेच ठरले आहे. मेरी जिंकली तर बातमी होते, मेरी हरली तर त्याहून मोठी बातमी होते, यातच सारे काही सामावले आहे.