पुणे : बॅडमिंटनमध्ये परदेशात भारताला पहिल्यांदा पदक जिंकून देणारे दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. वयाच्या ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९६०च्या दशकात त्यांनी केलेल्या कामगिरीमुले त्यांना या दशकातील भारतीय क्रीडा क्षेत्राचे हीरो म्हणून ओळखले जाते. त्यांनी १५ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जेतेपदे पटकावली. त्यांनी सहा वेळा एकेरीतले राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. भारतीय क्रीडा इतिहासात नाटेकर यांचे विशेष स्थान असून त्यांचे यश नवोदित खेळाडूंना कायम प्रोत्साहित करत राहील, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
कोण होते नंदू नाटेकर ?
नंदू नाटेकर हे मूळचे सांगलीचे राहणारे होते. मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. बॅडमिंटनमध्ये त्यांनी भाराताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले आहे. आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. तसेच १९६१मध्ये भारत सरकारच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले क्रीडापटू होते. बॅडमिंटनप्रमाणे त्यांनी इतर खेळातही प्राविण्य मिळवले होते. क्रिकेट, टेनिस या क्रिडाप्रकारांतही त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवल्या होत्या.