ठाण्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीची रसद
ठाणे : अतिवृष्टी आणि दरडींच्या आपत्तीने पिचून गेलेल्या कोकणच्या हाकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाणे शाखेच्या स्वयंसेवकांनी घरोघरी फिरून गोळा केलेली मदतीची रसद कोकणातील पूरग्रस्तांसाठी रवाना केली. ठाण्यासह मुंबई व इतरत्र भागात रा. स्व. संघ व जनकल्याण समितीतर्फे मदतीचा हा ओघ सुरूच आहे.
आपत्तीत सहकार्यासाठी वेळ न घालवता यथाशक्ती धावून जाणे, हा सामान्य स्वयंसेवकाचा स्वभाव आहे. चरखी दादरी असो की, देशाच्या कुठल्याही भागात माणूस संकटात आहे हे कळताच संवेदनशील स्वयंसेवक तत्काळ सक्रिय होऊन थेट कृती करतो. समाजाला आवाहन करतो आणि समाजही मोठ्या विश्वासाने उत्स्फूर्त प्रतिसाद देतो.
कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी रा. स्व. संघ ठाणेतर्फे मदतीचे आवाहन करताच अन्नधान्य, कपडे, वस्तू, अन्य आवश्यक साहित्य आणि धनादेश स्वरूपात मदतीचा अक्षरशः पाऊस पडला. नौपाडा परिसरातील संघाच्या प्रताप कार्यालयात परिसरातील महाविद्यालयीन तरुणाईने घरोघरी संपर्क करून साहित्याचे संकलन केले.
गोळा झालेल्या साहित्याची नोंदणी, वर्गवारी आणि बांधणी करून दोन टेम्पो आणि काही स्वयंसेवक पूरग्रस्त कोकणात रवाना करण्यात आल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले. आपल्या समाज बांधवांच्या वेदनेवर आपुलकी आणि कर्तव्य भावनेने फुंकर घालण्यासाठी पुढाकार घेणे, हीच आपल्या देशाची शक्ती आहे. रा. स्व. संघ 1925पासून या शक्तीचे संघटन करून रचनात्मक कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.