टोकियो : सध्या भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये टोकियो ऑलिम्पिक २०२१ या स्पर्धेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावेळी भारताच्या एका खेळाडूचा पराभव होऊनही तिच्या कामगिरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे ऑलिम्पक स्पर्धेत तलवारबाजीमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरलेली 'भवानी देवी'. पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणाऱ्या भवानीने पहिली लढत जिंकली, पण दुसऱ्या फेरीत तिचा पराभव झाला. तरीही, तिच्या या कामगिरीमुळे देशावासियांकडून कौतुक होत आहे.
भवानीने पहिल्या लढतीमध्ये ट्युनेशियाच्या नादिया बेनचा १५-३ असा पराभव करत एक दमदार विजय मिळवला. या सामन्यात तिने पहिल्या ३ मिनिटातच ८-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ६ मिनिट १४ सेकंदात तिने ही लढत १५-३ अशी जिंकली. पुढे तिचा सामना फ्रान्सच्या ब्रुनेटशी झाला. या सामन्यात तिने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्रुनेटला चांगलीच टक्कर दिली. मात्र, अखेर तिला या लढाईत पराभव स्वीकारावा लागला. तिला ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले असले तरीही तिच्या या अनोख्या कामगिरीने भारतीयांची मने जिंकली आहेत.
यानंतर तिने एक ट्विट करत देशवासीयांची माफिदेखील मागितली. तिने यामध्ये म्हंटले आहे की, " हा अनुभव खूप उत्साहित आणि भावूक होता. मी नादियाविरुद्धच्या सामना १५-३ अशा फरकाने जिंकत ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरले. पण दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मॅनॉन ब्रुनेटकडून ७-१५ ने मी पराभूत झाले. पण मी माझे सर्वश्रेष्ठ दिले असले, तरी देखील मी जिंकू शकले नाही. मला माफ करा."