सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते राधानगरीला जोडणाऱ्या वनक्षेत्रात अस्वलांचा अधिवास नाही?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2021   
Total Views |
sahyadri _1  H



मुंबई (अक्षय मांडवकर) -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (एसटीआर) आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्याला जोडणाऱ्या वनपट्ट्यामध्ये अस्वलांचा अधिवास नसल्याची माहिती नुकत्याच एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे. या वनपट्टयामध्ये झालेले खाणकाम आणि खासगी मालकीतील वन जमिनींच्या बदलणाऱ्या उपयोगितेमुळे याठिकाणाहून अस्वलांचा अधिवास नष्ट झाल्याची शक्यता आहे. मात्र, सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणामार्गमध्ये हा वनपट्टा संवदेनशील भूमिका बजावतो. त्यामुळे भ्रमणमार्गाची संलग्नना अबाधित ठेवण्यासाठी या भूभागावर संवर्धनात्मक उपययोजना राबवणे आवश्यक आहे.
 
 
महाराष्ट्रात विस्तारलेल्या पश्चिम घाटामधील वन्यजीव भ्रमणमार्गाला सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग म्हणतात. हा भ्रमणमार्ग सह्याद्रीमध्ये आढळणाऱ्या सस्तन प्राण्यांचे स्थलांतर आणि त्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतो. व्याघ्र स्थलांतराबरोबर अस्वलांच्या दृष्टीने देखील हा भ्रमणमार्ग महत्त्वाचा आहे. मात्र, एसटीआर आणि राधानगरी अभयारण्य या दोन्ही संरक्षित क्षेत्रांना जोडणाऱ्या या भ्रमणार्गामध्ये अस्वलांचा अधिवास नसल्याची माहिती समोर आली आहे. 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी २०१९-२० साली केलेल्या सह्याद्रीच्या भूप्रदेशीय सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, "एसटीआर (कोयना अभयारण्य/ चांदोली राष्ट्रीय उदयान) आणि राधानगरी अभयारण्यामध्ये अस्वलांची संख्या आणि त्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. या दोन्ही संरक्षित वनक्षेत्रांना जोडणाऱ्या वनपट्टयाचे सरळ रेषेतील अंतर साधारण ६० किलोमीटर असून या पट्ट्यामध्ये आम्हाला अस्वलांच्या अधिवासाच्या खुणा सापडलेल्या नाहीत."
 
(सह्याद्रीमधील अस्वलांच्या अधिवासाचा नकाशा)
sahyadri _1  H  
 


पंजाबी यांनी सह्याद्रातील या भूप्रदेशाचे सर्वेक्षण हे २०१०-११ आणि २०१९-२० या दोन्ही सालांमध्ये केले. या दोन्ही सर्वेक्षणावेळी त्यांना एसटीआर आणि राधानगरीला जोडणाऱ्या वनपट्यांमध्ये अस्वलांचा अधिवास आढळून आला नाही. या वनपट्ट्यामध्ये अस्वलांच्या अधिवासाच्या दृष्टीने गुहा आणि सड्यांसारख्या पूरक अशा जागा आहेत. मात्र, याठिकाणी पूर्वी असलेल्या बाॅक्ससाईडच्या खाणी बंद पडल्या असून तो अधिवास अजून वनामध्ये रुपांतरित झालेला नाही. शिवाय या पट्ट्यामध्ये खासगी मालकीच्या वन आच्छादित जमिनी असून त्यांची उपयोगितेमध्ये बदल होत असल्याने त्याठिकाणी वन्यजीव अधिवास निर्माण न होत असल्याची शक्यता पंजाबी यांनी वर्तवली आहे. अस्वल ही सर्वसामान्य प्रजाती असली तरी एखाद्या वनक्षेत्राभोवती झालेल्या अतिक्रमणाचा प्रभाव त्यांचा अधिवासावर तातडीने पडतो.
 
 
 
संवर्धन राखीव वनक्षेत्र
एसटीआर आणि राधानगरीला जोडणाऱ्या वनपट्ट्यामध्ये नुकतेच राज्य सरकारने तीन संंवर्धन राखीव क्षेत्र आरक्षित केली आहेत. त्यामध्ये विशालगड, पन्हाळगड आरक्षित करण्यात आले असून गगनबाबडा संवर्धन राखीव वनक्षेत्राची अधिसूचना अजूनही प्रसिद्ध झालेली नाही. गनबाबडाच्या दक्षिणेकडील बाजूस अस्वलांचा अधिवास आहे. मात्र, त्याचा उत्तरेला आणि विशालगड व पन्हाळगड संवर्धन राखीव क्षेत्रात अस्वलांचा अधिवास नाही. त्यामुळे या भूभागाला तातडीने संरक्षण प्रदान करुन त्याठिकाणी वन्यजीवांचा अधिवास वाढवण्यासाठी उपयोजना राबवणे गरजेच्या आहेत.
 
 
 
सह्याद्रीच्या दक्षिणेकडे आरक्षित केलेल्या संवर्धन राखीव वनक्षेत्रांमध्ये आपल्याला व्याघ्र अधिवास आढळून आला आहे. वनक्षेत्राला संरक्षण दिल्याचा हा चांगला परिणाम आहे. एसटीआर ते राधानगरी दरम्यानच्या पट्ट्यामध्ये आपण तीन संवर्धन राखीव वनक्षेत्र आरक्षित केली आहेत. त्यामुळे नक्कीच याठिकाणी अस्वलांची संख्या वाढण्यास मदत होईल. मात्र, त्यासाठी काही कालवधी जावा लागेल. तसेच या संवर्धन राखीव वनक्षेत्रांच्या व्यवस्थापन आरखड्यामध्ये त्यादृष्टीने तरतूदी करण्यात येतील. -  डाॅ.व्ही क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@