विचारशीलतेने लक्ष्य गाठणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2021   
Total Views |

Mangesh Wadaje_1 &nb
 
 
विचारशक्ती, मेहनत, चिकाटी आणि ध्येयाची स्पष्टता यांच्या बळावर नोकरदार ते उद्योजक असा विलक्षण यशस्वी प्रवास करणार्‍या ’हायबर टेक्नोक्रॅट लिमिटेड’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश दत्तात्रय वडजे यांच्या कार्याविषयी...
 
 
 
मानवी आयुष्याला विचार करण्याची वृत्ती ही मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. व्यक्तीने विचार केल्यास आणि त्याच विचारांना मूर्त रूप देणारी कृती केल्यास जीवनात यशस्वी होणे सहज शक्य असते. विचार आणि कृती या दोन घटकांवरच यश व अपयश हे अवलंबून असते. जीवनात घडणार्‍या घडामोडींपासून ते जीवन व्यवस्थित व्यतित होण्यासाठी आवश्यक असणार्‍या उद्योग-व्यवसाय, नोकरी यात यश संपादित करण्यासाठी ध्येयनिश्चिती आणि त्या दिशेने अविरत प्रवास हे आवश्यक असते.
 
 
 
मूळचे नाशिकचे व सध्या नवी मुंबई परिसरात असणार्‍या ’हायबर टेक्नोक्रॅट लिमिटेड’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश दत्तात्रय वडजे यांचा ‘सेवक ते उद्योजक’ हा जीवनप्रवास याच सगळ्या गुणवैशिष्ट्यांनी ओतप्रोत भरलेला आहे, हे त्यांच्याशी संवाद साधताना सहज जाणवते.
 
 
 
वडजे यांचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी हे मूळ गाव. आई व वडील दोघेही शिक्षक असणार्‍या निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात वडजे यांचा जन्म झाला. घरात ‘लक्ष्मी’ची वानवा असली तरी, ‘सरस्वती’चे लाभलेले वरदान त्यांना घरातूनच प्राप्त झाले. शांत, संयमी स्वभाव आणि विचारशील कृती हे त्यांच्या स्वभावाची गुणवैशिष्ट्ये. शालेय शिक्षणापश्चात त्यावेळी समाजात अभियांत्रिकी शिक्षणाचे वारे वाहत होते. त्यातच लहानपणापासून अभियंता होण्याची आवड त्यामुळे वडजे यांनीदेखील इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. स्थापत्यशास्त्रातील पदवी संपादित करण्याबरोबरच त्यांनी एमबीए (फायनान्स) देखील केले आहे. शालेय जीवनात वडजे यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने अनेक स्पर्धा गाजविल्या. त्यामुळे आपल्या व्यावसायिक जीवनात अंगीभूत असलेल्या या गुणांचा त्यांना अत्यंत फायदा झाल्याचे ते सांगतात. व्यवसाय वाढीसाठी इतरांना आपली बाजू सक्षमपद्धतीने पटवून देणे त्यामुळेच शक्य होत असल्याचे वडजे आवर्जून नमूद करतात.
 
 
 
वडजे हे एमबीएचे शिक्षण घेत असताना त्यांची ‘कॅम्पस’ मुलाखतीच्या माध्यमातून ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’ (एचसीसी) मध्ये त्यांची निवड झाली. ‘एमबीए’ (फायनान्स)ची पार्श्वभूमी असल्याने त्यांना या कंपनीत लेखा विभागात कार्य करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांची नियुक्ती ही ‘कन्स्ट्रक्शन’ विभागात करण्यात आली. यावेळी त्यांनी चेन्नई जवळील एन्नोर येथे ‘ब्रेक वॉटर’ बनविण्यासाठी ‘प्लानिंग इंजिनिअर’ म्हणून काम केले. त्यावेळी जगात ‘एसएपी सॉफ्टवेअर’चा बोलबाला होता. हे एक ‘इआरपी सॉफ्टवेअर’ आहे. जगातील क्र. १चे सॉफ्टवेअर अशीच त्याची ख्याती आहे.
 
 
 
या नवीन सॉफ्टवेअरचे ज्ञान अर्जित करण्यासाठी वडजे यांनी नोकरीचा राजीनामा दिला. चेन्नई येथे ‘एसएपी’चे प्रशिक्षण त्यांनी घेतले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विदेशात मोकरीची संधी उपलब्ध होईल, अशी वडजे यांची धारणा होती. तशी संधीदेखील त्यांना आली. मात्र, कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांनी भारतातच आगामी काळात सेवा देण्याचा निश्चय केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा ‘एचसीसी’मध्ये नोकरीसाठी विचारणा केली. आधीचा कार्यअहवाल हा उत्तम असल्याने त्यांनी विचारणा करताच त्यांना पुन्हा तेथे लगेच रुजू करण्यात आले.
 
 
 
या नवीन ‘पुनश्च हरिओम’ असणार्‍या प्रवासात वडजे यांना आता मुंबई येथे ‘प्रोजेक्ट मॉनेटरिंग सेल’मध्ये ‘प्रोजेक्ट मॉनिटर’ म्हणून नियुक्त करण्यात आले. येथे त्यांनी मुंबई-पुणे महामार्गाच्या काही भागाचे ‘मॉनिटरिंग’ करण्याचे कार्यदेखील केले. तसेच कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पा’त ९० च्या दशकात, लवासा येथे ‘प्लानिंग मॅनेजर’ म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. ‘एचसीसी’मध्ये काम करत असताना जागतिक स्तरावर असणारे ‘इआरपी’ भारतात ‘कन्स्ट्रक्शन’ क्षेत्रात अवलंबिवता येईल का, असा विचार सुरू झाला. त्यावेळी यासाठी वडजे यांची प्रकल्प समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
 
भारतात ‘कन्स्ट्रक्शन’ क्षेत्रात ‘इआरपी’चा प्रयोग हा पहिल्यांदाच होणार होता. त्यासाठी वडजे यांनी युरोपियन देशातील कंपन्यांमध्ये अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी इटली, जर्मनी व नेदरलँड येथे जात प्रत्यक्षअनुभव घेत अध्ययन केले. तेथे त्यांना जाणवले की, तेथील उद्योग समूह हे तंत्रज्ञान अंशत: वापरत होते. त्यांच्या महत्त्वाकांक्षा व भारतीय कंपन्यांच्या इच्छा-आकांक्षा यात अंतर होते. ‘एसएपी सॉफ्टवेअर’मध्ये थोडाफार बदल करून भारतात ते कन्स्ट्रक्शन क्षेत्रात वापरता येईल, हे वडजे यांच्या लक्षात आले. ‘आयबीएम’ कंपनीच्या मध्यातून ‘एचसीसी’मध्ये वडजे व त्यांच्या सहकार्‍यांच्या प्रयत्नांतून हे सॉफ्टवेअर कार्यन्वित करण्यात आले. त्या प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून वडजे यांनी दायित्व सांभाळले. केवळ आठ महिन्यांत ‘बेस इम्प्लिमेंट’ करत साधारण एक वर्षात वडजे व त्यांच्या सहकार्‍यांनी हे सॉफ्टवेअर पूर्णतः कार्यन्वित केले.
 
 
या दरम्यान ‘आयबीएम’ कंपनीने जम्मू-काश्मीर व आसाम येथे तेथील अशांत वातावरणामुळे येथे काम करण्यास नकार दिला. तेव्हा वडजे व त्यांच्या सहकार्‍यांनी तांत्रिक ज्ञान संपादित करत स्वतः ’इम्प्लिमेंट’ केले व ते यशस्वीदेखील झाले.
 
 
भारतात आपण जर एखादी गोष्ट पहिल्यांदा करत आहोत, तर आपल्याकडे व्यवसाय संधी आहे, हे वडजे यांना यावेळी जाणवले. ‘एचसीसी’साठी काम करत असताना वाढीव पगाराच्या अनेक संधी इतर अनेक कंपन्यांनी वडजे यांना देऊ केल्या. मात्र, व्यवसाय सुरू करण्यासच वडजे यांनी प्राधान्य दिले.
 
 
याबाबत बोलणी करण्यासाठी वडजे व त्यांचे सहकारी ‘एचसीसी’ व्यवस्थापनाकडे दाखल झाले. त्यांना आपले विचार पटवून देत ‘एचसीसी’ची उपकंपनी म्हणून व्यवसायाला मान्यता द्यावी, अशी विनंती केली. वडजे व त्यांच्या सहकार्‍यांच्या या विचाराला त्यावेळी प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी या सर्वांचा आत्मविश्वास व ‘पॅशन’ बघून परवानगी दिली. कारण, कर्मचारी स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी मागत आहे, याचा त्यांना मनस्वी आनंददेखील झाला होता. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या व्यवसायाच्या वाढीसाठी वडजे व त्यांच्या सहकार्‍यांना सुरुवातीच्या काळात अनेक आव्हाने व अडचणींचा सामना करावा लागला. त्यासाठी एकमेव उपाय होता तो म्हणजे मेहनत. मेहनत आणि विचारातील स्पष्टता या द्वयींच्या जोरावर वडजे यांनी कार्यारंभ केला. सुरुवातीला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. वडजे व त्यांच्या सहकार्‍यांना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे सुरुवातीला काम मिळण्यास त्रास झाला. यावेळी ‘बिझनेस डेव्हलपमेंट हेड’ म्हणून वडजे यांनी कामकाजास सुरुवात केली. यावेळी या उपकंपनीचे अध्यक्ष म्हणून सतीश पेंडसे हे धुरा सांभाळत होते.
 
 
या उपकंपनीच्या विकासासाठी त्याच्या समृद्धीसाठी लोकांना संवाद साधणे आणि त्यांना सॉफ्टवेअरचे महत्त्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादित करण्यावर भर दिला. या मेहनतीला दिल्ली येथील ‘ओरिएंटल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स’ या कंपनीच्या रूपाने फळ मिळाले व ही कंपनी या उपकंपनीची पहिली ग्राहक झाली. त्यानंतर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यात या उपकंपनीचा कार्यविस्तार झाला.
 
 
भारतात यश मिळाले असल्याने दुबई येथे या उपकंपनीने आपले कार्यालय सुरू केले. त्यात युएई, ओमान, कतार, सौदी अरेबिया, युरोप, स्वित्झर्लंड आदी देशांत व्यवसायवृद्धी होण्यास चालना मिळाली.
 
 
२०१६ मध्ये वडजे यांनी ही उपकंपनी ‘टेक ओव्हर ’करून कंपनीच्या व्यवस्थापनाचा ताबा घेतला. त्यावेळी कंपनीची कर्मचारी संख्या १०० इतकी होती. आर्थिक बाबींमुळे नव्हे, तर ज्ञानाच्या आधारावर वडजे यांना ही संधी मिळाली होती. २०१६ मध्ये कंपनीचा वार्षिक ‘टर्नओव्हर’ २५ कोटी रुपये होता. तो आतापर्यंत वार्षिक १०२ कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. तसेच, कर्मचारी संख्येत चौपट वाढ होऊन आज ४०० कर्मचारी येथे कार्यरत आहेत.
 
 
देश-विदेशातील १५० उद्योग समूह या कंपनीचे ग्राहक आहेत.
 
 
सुरुवातीला सर्व कर्मचारी वर्गाचे वेतन अदा करण्यात पुंजी खर्ची होत असल्याने वडजे यांना स्वतःचा पगारसुद्धा वेळेवर करता येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे घर चालविणेदेखील अवघड होत असे. कुटुंबासाठी केलेली बचत खर्ची करत आपला उदरनिर्वाह वडजे यांनी केला. स्वतःच्या कंपनीच्या विस्तारासाठी केवळ भाडे कमी लागावे व पैशांची बचत व्हावी, यासाठी वडजे पहाटे ३ वाजता उठून सकाळी ६ वाजताचे विमान गाठत असत. कामे करून रात्री उशिराचे विमान परतीसाठी गाठत असत. भल्या सकाळी व रात्री उशिरा विमानाला भाडे कमी असल्याने ही युक्ती वडजे यांनी साधली होती.
 
 
कंपनीच्या कामाने वेग पकडला असतानाच कोरोनाच्या संकटाचा सामना वडजे यांना करावा लागला. वडजे यांचा ‘एसएपी सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट’ करण्याचा व्यवसाय हा पूर्णत: प्रत्यक्ष संवादावर अवंलबून असणारा. मात्र, कोरोना काळात त्यावरच बंदी आली. ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून व्यवसाय मिळविणे अवघड झाले. मात्र, कंपनीच्या समृद्धतेसाठी झगडणार्‍या कर्मचारी वर्गाने अथक प्रयत्न करत व्यवसाय आणला.
 
 
या काळात कर्मचारी वर्गाचे पगार वेळेवर होणे आवश्यक होते. त्यामुळे पूर्ण कोरोना काळात एकही कर्मचारी वडजे यांनी कमी केला नाही. तसेच, एक दिवसदेखील कर्मचारी वर्गाचा पगार उशिरा केला नाही. सर्व कर वेळेत भरले. त्या काळात कंपनीचे ‘रिझर्व्ह फंड’देखील त्यांनी यासाठी वापरले. तसेच, ५० ते ६० लोकांना नव्याने रोजगार दिला. सरकारी धोरणांचा अडसर याबाबत वडजे यांना विचारले असता ते सांगतात की, “आमच्या क्षेत्रात सरकारमुळे अडथळा आला असे कधीही जाणवले नाही.” नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, समृद्धी महामार्ग यासाठी ‘५ डी’ ‘बिल्डिंग इन्फर्मेशन मॉडेलिंग’ वडजे यांची कंपनी करत आहे. यामुळे किती वेळात किती मूल्यांचे काम झाले, हे समजणे सहज शक्य होते.
 
 
रुपये १५०० प्रतिमहिना या वेतनाने आपले व्यावसायिक जीवन सुरु करणारे वडजे आज महिन्याला चार ते साडेचार कोटी रुपयांच्या घरात आपल्या कर्मचार्‍यांचे वेतन अदा करत आहेत.
 
 
आगामी दोन वर्षांत २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक व्यवसाय करण्याचे व २०२८ पर्यंत २५०० कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट वडजे व त्यांच्या सहकारीवर्गाने उराशी बाळगले आहे.
 
 
“उद्योजकाने यशस्वी होण्यासाठी पैसे न पाहता, ‘पॅशन’ म्हणून व्यवसाय करावा. चांगले माणसे तयार करून ते सांभाळत येणे हे उद्योगाच्या समृद्धतेसाठी आवश्यक असते. उद्योजकाला पोषक वातावरण निर्माण करता आले पाहिजे,” असाच संदेश वडजे नवउद्योजकांना देतात.
 
 
इतरांप्रमाणे नोकरी करतच वडजे यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. मात्र, नोकरी करत असताना त्यात आपला विचार त्यांनी कायम सजग ठेवला व व्यवसायाची संधी हेरली. स्थापन केलेल्या व्यवसायाला योग्य दिशा देत मेहनतीने उभे केले. केवळ अन् केवळ विचारशक्ती, मेहनत, चिकाटी आणि ध्येयाची स्पष्टता यामुळेच हे शक्य होत आहे. वडजे यांचा एकूणच जीवनप्रवास नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, हीच आशा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@