मुंबई : अश्लील चित्रफित आणि चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर बॉलीवूडमध्ये सुरु असलेल्या आणखी एका वाईट धंद्यांची पोलखोल सध्या हिंदी सिनेसृष्टीमध्ये सुरु आहे. आता यावर अभिनेत्री कंगना रानौतनेखील उडी घेतली असून तिने पुन्हा एकदा बॉलीवूडवर निशाणा साधला आहे. तिने फेसबुकवर आपले मत व्यक्त करताना म्हंटले की, "बॉलीवूड हे गटार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले."
कंगना रानौतने म्हंटले आहे की, "...म्हणूनच मी या चित्रपट सृष्टीला गटर म्हणते. चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. मी माझ्या आगामी 'टीकू वेड्स शेरू' या चित्रपटात फिल्मी उद्योगाचा हा काळा चेहरा जगासमोर आणणार आहे. या क्रिएटिव्ह उद्योगात आपल्याला काही नियमांची गरज आहे. असे नियम जे चुकीची कामें करण्यांवर नजर ठेवतील.” अशा आशयाची एक पोस्ट करत कंगनाने राज कुंद्रावर निशाणा साधला आहे. तिची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
कंगनाच्या आगामी 'टीकू वेड्स शेरू' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ट्विटरवरून बेदखल केल्यानंतर अनेकवेळा तिने आपले मत व्यक्त करण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामचा सहारा घ्यायला सुरुवात केली आहे. राज कुंद्राचे प्रकरण बाहेर आल्यानंतर चमकदार पडद्यामागील भयाण वास्तव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता तर याचे कनेक्शन हे थेट इंटरनेटवरील पॉर्न इंडस्ट्रीशी जोडले गेले आहे.