सागरसुरक्षेसाठी ‘एनएमएससी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2021   
Total Views |

narendra modi_1 &nbs

 
आर्थिक उपयुक्ततेबरोबरच अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराने वेढलेला असल्याने भारताचे स्थान रणनैतिकदृष्ट्याही वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहे. मागील सात वर्षांपासून भारताने आपले सागरी स्थान अधिक बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णयदेखील घेतलेले आहेत. दक्षिण चीन समुद्रात उचापती करणारा चीन हिंदी महासागरात घुसखोरी करू इच्छित असताना आणि पाकिस्तानमार्फत दहशतवादी हल्ल्याचा धोका असताना सागरी सुरक्षा अत्यावश्यक झाली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार त्या दिशेने ठोस पावले उचलत असून, एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार सरकारने राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक-‘एनएमएससी’ची निर्मिती करून त्याच्या नियुक्तीची तयारी पूर्ण केली आहे.
 
 वृत्तानुसार भारतीय नौदलातील सेवारत अथवा नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या ‘व्हाईस अ‍ॅडमिरल’ची या पदावर नियुक्ती करण्यात येईल. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने लष्कर, हवाईदल आणि नौदलातील समन्वयासाठी ‘चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ची निर्मिती केली होती. तिन्ही सैन्यदलांतील सुसूत्रीकरणासाठी ‘चिफ ऑफ डिफेन्स’ची आवश्यकता होतीच; त्यानंतर आता ‘एनएमएससी’ची स्थापना करून नौदलाच्या मजबुतीकरणाचे कामही हाती घेण्यात आल्याचे यावरून दिसून येते.

दरम्यान, सागरी सुरक्षा समन्वयक, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अंतर्गत काम करणार असून, तो सागरी सुरक्षा डोमेनवर सरकारचा प्रमुख सल्लागार असेल. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, हिंदी महासागरात भारतासमोर अडथळे उभे करण्याचा मनसुबा बाळगणार्‍या चीनने एकविसाव्या शतकातील सागरी सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या शासन आराखड्याला पुनर्गठित करण्यात यश मिळवले आहे. तथापि, भारत याबाबत चीनपेक्षा मागे राहिला होता. उल्लेखनीय म्हणजे, दोन दशकांपूर्वी ‘कारगिल ग्रुप ऑफ मिनिस्टर’च्या समितीने सागरी सुरक्षा समन्वयकपदाच्या निर्मितीचा सल्ला भारत सरकारला दिला होता. समितीने नौदल, तटरक्षक बल, केंद्र आणि राज्य सरकारांच्या मंत्रालयांत संस्थात्मक संबंधांसाठी, सागरी प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी एका शीर्षस्थ घटकाची आवश्यकता अधोरेखित केली होती. एका शीर्षस्थ केंद्रीय घटकाच्या निर्मितीने देशाच्या महत्त्वपूर्ण जलमार्गांवरून शत्रूचे येणे-जाणे रोखता येईल. दरम्यान, सागरी सुरक्षेवर काम करणार्‍या अधिकार्‍यांमध्ये सामंजस्याची कमतरता असल्याने ‘२६/११’सारखा दहशतवादी हल्ला भारतावर-मुंबईवर झाला होता.

पाकपुरस्कृत दहशतवादी कराचीपासून मुंबईच्या किनार्‍यापर्यंत एका साध्या होडक्याने येण्यात यशस्वी झाले होते.नौदल, तटरक्षक बल आणि मुंबई पोर्ट सारेच आपल्या अधिकार क्षेत्रावरून आपापसातच झगडले आणि अखेरीस देशवासीयांना त्यांच्यातील मतभेदाचे नुकसान सोसावे लागले. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला ‘चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपीन राव यांनी, ‘एनएमएससी’च्या निर्मितीच्या अनुषंगाने पद्धतींवर काम केले गेले आहे, अशी घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, “आंतर-मंत्रालयीन विचारानंतर एका राष्ट्रीय सागरी आयोगाच्या (एनएमसी) संघटनात्मक आराखड्यावर काम करण्यात आले आहे. ते काम आता अंतिम टप्प्यात असून त्यासाठी केवळ सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या (सीसीएस) मंजुरीची आवश्यकता आहे. चालू वर्षाच्या मध्यात ‘एनएमसी’ प्रत्यक्षात येईल.”

भारताचा सागरकिनारा एकूण सात हजार ५१६ वर्ग किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. ‘एक्सक्लुझिव्ह इकोनॉमिक झोन’चा विस्तार २.०३ दशलक्ष वर्ग इतका असून, देशाचा ९० टक्क्यांपेक्षा अधिक व्यापार आणि प्रामुख्याने कच्च्या तेलाचा ७० टक्क्यांपेक्षा अधिक व्यापार सागरमार्गाने होतो. सागरी मार्ग आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था आणि ऊर्जेसाठी महत्त्वाचा आहे. अंदमान-निकोबर बेट समूहाजवळील चीनचा प्रभाव संपत चालला आहे. चीनने आता आपले लक्ष मलाक्काच्या सामुद्रीधुनीकडे वळवले आहे. चीनच्या ८० टक्के तेलाची पूर्तता दक्षिण चीन समुद्रापासून मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होते आणि तेथील भारताची उपस्थिती चीनच्या ‘हायड्रोकार्बन’चा पुरवठा सहज बाधित करू शकते. त्यातून चीनला गुडघे टेकण्यात अजिबात वेळ लागणार नाही. जर भारताला हिंदी महासागरातील चीनची उपस्थिती कमी किंवा मर्यादित करायची असेल तर केंद्रीय गृह, जहाज, मत्स्य आदी मंत्रालय व विभाग आणि राज्य सरकारांपासून नौदल, तटरक्षक, सीमा शुल्क, गुप्तचर संस्था आणि बंदरविषयक अधिकार्‍यांपर्यंत विविध हितसंबंधीयांमधील ताळमेळीची आवश्यकता आहे. ‘एनएमएससी’ची त्वरित स्थापना या प्रक्रियेला वेगवान करू शकेल आणि देशाची सुरक्षा बळकट करण्यात मदत करू शकेल.








 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@