संजय राऊत ‘मातोश्री’तल्या मालकाऐवजी ‘सिल्व्हर ओक’मधल्या मालकाला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची भाषा करत आहेत. यावरून या माणसाचा अतिशयोक्ती करत फक्त खुशामत करण्याचाच उद्योग असल्याचे वाटते.
शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले नाही, तर २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदींच्या पराभवाची व विरोधकांच्या विजयाची शक्यता नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान तोंडपाटीलकीशिवाय अन्य काहीही नाही. कारण, शरद पवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून संजय राऊतांना फक्त बारामतीकरांची खुशमस्करी करण्याचे काम उरले आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शरद पवारांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष व पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पेश करावे, असा आग्रह धरला होता. मात्र, सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीच संपुआच्या अध्यक्षा असल्याने इंदिरा गांधी ते राजीव गांधींपर्यंत कोणीही विश्वास न ठेवलेल्या पवारांसारख्या व्यक्तीकडे त्या मोदीविरोधकांच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता नाही. तसेच गांधी कुटुंबीयांच्या मते देशाच्या पंतप्रधानपदावर केवळ नेहरू-गांधी खानदानातील व्यक्तींचाच हक्क असतो व पदाचा आवाका नसला तरी राहुल गांधींच्या रूपात काँग्रेससाठी तशी व्यक्ती आता उपलब्धही आहे, ते पाहता पवार त्या निकषात बसत नाहीत आणि त्यामुळेदेखील ते २०२४ साली संपुआचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार होऊ शकत नाहीत. तरीही संजय राऊत आपल्या ‘सिल्व्हर ओक’च्या धन्याची नसलेली देशव्यापी प्रतिमा तावातावाने विरोधकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात, मालकाची चाकरी करणे हे त्यांचे कर्तव्यच; पण तो मालकही तितक्या तोलामोलाचा आहे की फक्त साडेतीन जिल्ह्यापुरता, याचे भान त्यांना नसते. त्यातूनच त्यांनी आताही शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याची मागणी केली. संजय राऊतांना शरद पवारांना ‘लार्जर दॅन लाईफ’ वगैरे ठरवण्याची हुक्की अधे-मधे येत असते, त्यातलाच हा प्रकार. मात्र, संजय राऊतांचे विधान, नशेतली व्यक्ती मध्येच मोठ्या आवाजात आपण फार काही महत्त्वाचे सांगत आहोत, असा आव आणून बोलत असते, त्यापेक्षा निराळे नाही.
संजय राऊतांनी शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची मागणी केली, त्याचवेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र स्वबळाच्या बेटकुळ्या दाखवत होते. २०२४ साली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल, असा त्यांचा दावा आहे. राज्यातही स्वबळावरच लढण्याची भाषा नाना पटोले अनेक दिवसांपासून करताना दिसतात, आता त्यांना केंद्रातही स्वबळाचे स्वप्न पडू लागले. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलेल्या तिन्ही पक्षांत एकमत नसल्याचे दिसते, तरीही संजय राऊत जाहीरपणे शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरवण्याचा लकडा लावताना दिसतात. त्यावरून पंचतंत्रातील माकड आणि सुताराची गोष्ट आठवल्याशिवाय राहत नाही. त्यात आताच्या परिस्थितीनुरूप बदल केला की, ती गोष्ट संजय राऊतांना बरोबर लागू पडते. एका सुताराने मनोरंजनासाठी एक माकड पाळलेले असते. सुतार आपले काम करत असताना इकडे-तिकडे हुंदडणे, वा झाडावर उड्या मारण्याचे खेळ माकड करत असते. जेणेकरून मालकही खूश होईल. पण, एकदा सुतार काम थांबवून जेवणासाठी जातो, त्यावेळी माकड मात्र कामाच्या ठिकाणीच थांबते. तेव्हा आपण इतके दिवस सुतारकाम पाहत आहोत, तर आपणही करून बघू, आपल्यालाही जमेल म्हणून माकड लाकडाच्या ओंडक्यावर बसते. पण, सुताराने त्यात पाचर मारून ठेवलेली असते, माकडाला काही अक्कल नसल्याने ते झटक्यात लाकडातली पाचर ओढून काढते. त्याचवेळी त्याची शेपूट मात्र तो लाकडाचा ओंडका मिटला जाऊन त्यात अडकते. गोष्ट इथेच संपत नाही. पण, आजची संजय राऊत यांची अवस्था त्या लाकडाच्या ओंडक्यात अडकलेल्या शेपटासारखी झाल्याचे दिसते. संजय राऊत वा त्यांची शिवसेना संपुआची सदस्य नाही किंवा त्यांना त्यात घेतलेले नाही. तेव्हा त्यांनी संपुआचा अध्यक्ष वा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा, याची उठाठेव करण्याची गरज नाही. पण, शरद पवारांच्या पायरीवर पडीक असलेल्या संजय राऊतांना ते समजू शकत नाही. म्हणून ते शरद पवारांना राष्ट्रीय नेतृत्व देण्याची मागणी करत असतात. पण, त्यांच्या या गुणामुळे फायद्यापेक्षा नुकसानच होत असून काँग्रेस नेत्यांची नाराजी व त्या नाराजीतून स्वबळाची भाषा केली जात असते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांतील धुसफुशीचे कारण तेच असून २०२४ पर्यंत आता सत्तेसाठी एकत्र आलेले; पण भविष्यात एकट्याच्या सत्तेसाठी हपापलेले पक्ष सोबत राहतीलच, याची कसलीही खात्री नाही.
दरम्यान, संजय राऊत शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची मागणी कोणत्या आधारावर करतात? कारण, शरद पवारांची राजकीय ताकद उणीपुरी चार खासदारांपुरतीच आहे, तसेच वेळोवेळी राष्ट्रीय पातळीवर मोदी वा भाजपविरोधकांच्या होणार्या बैठकांत शरद पवारांचे नाव आवर्जून घेतले जातेच असे नाही किंवा त्यांना फार आग्रहाने बोलावले जाते, असेही नाही. सोबतच शरद पवारांची कालची भूमिका आज नसते आणि आजची भूमिका उद्या नसते, म्हणजे कायमच अस्थैर्य. त्या गुणानेही त्यांना देशभरातील राजकीय पक्ष मोदीविरोधातील विश्वासू सहकारी म्हणून मान्यता देऊ शकत नाहीत. त्याउपरही शरद पवार यदाकदाचित पंतप्रधानपदाचे उमेदवार झालेच, तरी विजयाऐवजी पराभवच होणार. कारण, नरेंद्र मोदींचे भारतीय जनमानसातील स्थान अजूनही सर्वोच्च आहे. २०१४ पासून सुरू झालेल्या राष्ट्रजागरणाने आणि विकासमार्गाने मोदींना वगळून अन्य कोणत्या नेत्यावर, तेही शरद पवारांसारख्या नेत्यावर मतांचा पाऊस पाडण्याची जनतेची इच्छाच नाही. तेव्हा त्यांना राष्ट्रीय नेतृत्व दिले काय अन् न दिले काय २०२४ साली भाजपला सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तरीही संजय राऊतांना शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरवायचे असेल तर जरूर ठरवावे, त्याने फारसा फरक पडणार नाही. मागे एकदा राऊतांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील, अशी बडबड केली होती. आता तेच संजय राऊत ‘मातोश्री’तल्या मालकाऐवजी ‘सिल्व्हर ओक’मधल्या मालकाला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची भाषा करत आहेत. यावरून या माणसाचा अतिशयोक्ती करत फक्त खुशामत करण्याचाच उद्योग असल्याचे वाटते. दुसरीकडे काँग्रेसच्या नाना पटोलेंनीदेखील कितीही स्वबळाचा दावा केला तरी राहुल गांधींना स्वतःलाच पुन्हा वायनाडमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. ती व्यक्ती देशाचे नेतृत्व काय करू शकते, वा काँग्रेसला सत्तेपर्यंत काय नेऊ शकते? हो, स्वबळाच्या भाषेमुळे गलितगात्र झालेल्या पक्षीय कार्यकर्त्यांत उत्साह वगैरे संचारू शकतो. पण, त्यातून फलिताची शक्यता नाही.