अंतराळ क्षेत्रातील स्पर्धेसाठी भारताची सज्जता महत्त्वाची

    13-Jul-2021   
Total Views | 241

space_1  H x W:

‘व्हर्जिन गॅलाटिक’च्या यशस्वी उड्डाणानंतर आता खासगी क्षेत्राची स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकाव धरून यशस्वी व्हायचे, तर अंतराळ शिक्षण आणि संशोधनावर भर देतानाच या क्षेत्रात भारतीय खासगी कंपन्या, गुंतवणूक संस्था आणि स्टार्ट-अपसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध होतील.
 
चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या केंद्रस्थानी असलेल्या अंतराळ क्षेत्रातील स्पर्धा तीव्र झाली आहे. दि. ४ ऑक्टोबर, १९५७ रोजी रशियाने ‘स्पुटनिक’ उपग्रह सोडून या क्षेत्रात आघाडी घेतली. १९६१ साली रशियाचा युरी गागारिन पहिला अंतराळवीर ठरला. अमेरिकेने या स्पर्धेत स्वतःला झोकून देऊन दि. २० जुलै, १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगला चंद्रावर उतरवले आणि रशियाकडून झालेल्या अपमानाची परतफेड केली. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अंतराळ क्षेत्रातील स्पर्धादेखील थंडावली. भारत, चीन, इस्रायल आणि जपानसारखे मोजके देशच या क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकले. २१व्या शतकात खासगी क्षेत्राच्या प्रवेशामुळे पुन्हा एकदा या स्पर्धेला तोंड फुटले. नुकतेच दि. ११ जुलै रोजी ब्रिटिश उद्योगपती आणि साहसवीर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी पहिले अंतराळ पर्यटक होण्याचा मान मिळवला. ‘व्हर्जिन गॅलाटिक’ या आपल्या कंपनीच्या ‘युनिटी’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या‘ स्पेसशिप-२’ या विशेष विमानात बसून त्यांनी पृथ्वीपासून ८६ किमी उंची पार केली आणि अंतराळात प्रवेश केला.
अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील स्पेसपोर्ट केंद्रातून ‘व्हर्जिन गॅलाटिक’च्या विमानाने उड्डाण केले आणि सुमारे ४५ हजार फूट उंचीवर जाऊन ‘युनिटी’ नावाच्या रॉकेटला आपल्यापासून वेगळे केले. या रॉकेटने मग अंतराळात झेप घेतली आणि इतिहास रचला. ‘युनिटी’ रॉकेटने यापूर्वीही अंतराळात प्रवेश केला असला तरी पहिल्यांदाच दोन पायलट आणि चार प्रवाशांना सोबत घेऊन अंतराळ गाठले. हा मान मिळवणार्‍या त्यांच्या सहकार्‍यांमध्ये कंपनीच्या संशोधन आणि शासकीय संबंध क्षेत्रातील उपाध्यक्ष सिरिषा बांडला यांचादेखील समावेश होता. सिरिषा यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील गुंटूरमध्ये झाला. वयाच्या चौथ्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी ‘नासा’तर्फे अंतराळवीर होण्यासाठी प्रयत्न केले. पण, दृष्टिदोषामुळे त्या पात्र ठरल्या नाहीत. त्यांचे अंतराळ भ्रमणाचे स्वप्न वेगळ्या मार्गाने पूर्ण झाले. त्यांच्यासोबत कंपनीच्या मुख्य अंतराळ प्रशिक्षक बेथ मोझेस आणि ऑपरेशन्स इंजिनिअर कोलिन बेनेट यांचादेखील समावेश होता. या अंतराळवीरांनी खुर्चीच्या पट्ट्या सोडून सुमारे चार मिनिटे गुरुत्वाकर्षणरहित अवस्थेत तरंगण्याचा आनंद घेतला. सुमारे दीड तास अंतराळातून पृथ्वीचे निरीक्षण करून ‘स्पेसशिप-२’ जमिनीवर परतले.
 
वयाची सत्तरी पार केलेल्या रिचर्ड ब्रॅन्सनना धोका पत्करायची आणि आजवर कोणी जे केले नाही, असे काही तरी करायची विलक्षण हौस आहे. या जिद्दीवरच त्यांनी १९७०च्या दशकात संगीताच्या कॅसेटच्या दुकानापासून सुरुवात करून ‘व्हर्जिन’ विमान कंपनीपर्यंत मजल मारली आणि सहा अब्ज डॉलरची संपत्ती उभी केली. ब्रॅन्सन यांनी ‘व्हर्जिन’ला पहिली खासगी अंतरिक्ष कंपनी बनवण्यासाठी २० वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या ‘स्पेसशिप-१’ या विमानाने २००४ सालीच केवळ आठवडाभराच्या अंतराने दोनदा अंतराळात प्रवेश करून दाखवला आणि जगाला अंतराळ पर्यटनाचे स्वप्न दाखवले. त्यांच्या स्वप्नासाठी न्यू मेक्सिको सरकारने २० कोटी डॉलर खर्च करून ‘स्पेस पोर्ट’ हा तळ उभारला. पण, त्यानंतर ब्रॅन्सनला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला. असे असले तरी जिद्द न सोडता ब्रॅन्सन यांनी आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले. ब्रॅन्सननंतर अवघ्या नऊ दिवसांनंतर ‘अ‍ॅमेझॉन’चा संस्थापक जेफ बेझोस आपल्या ‘ब्ल्यू ओरिजिन’ या कंपनीच्या रॉकेटद्वारे अंतराळात जाणार आहे. बेझोसला मागे टाकून जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरलेला इलॉन मस्कदेखील आपल्या ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या माध्यमातून अंतराळात जाण्यासाठी सज्ज आहे. ‘व्हर्जिन गॅलाटिक’ने पुढील वर्षीच्या सुरुवातीपासून अंतराळ पर्यटनासाठी तिकीटविक्री सुरू केली आहे. अंतराळातील दोन तासांच्या अनुभवासाठी ६००हून अधिक लोकांनी कंपनीकडे प्रत्येकी १४ कोटी रुपयांहून अधिक पैसे भरून तिकिटे काढली आहेत.
आजपर्यंत अंतराळ क्षेत्र विविध देशांच्या संशोधन संस्थांपुरते मर्यादित होते. याचे कारण या क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीची आवश्यकता असून, अपयश येण्याची शक्यता खूप जास्त आहे. अवकाशयान पाठवण्यात यशस्वी झालेल्या अंतराळ संस्थांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मर्यादित आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे, या क्षेत्रात भारताची ‘इस्रो’ जगातील आघाडीच्या संस्थांमध्ये गणली जाते. २१व्या शतकात संगणक आणि इंटरनेट क्षेत्रातील प्रगतीचा फायदा अंतराळ संशोधन क्षेत्रालाही झाला. अवकाशयानाच्या उड्डाणाचे परीक्षण आभासी पद्धतीने करणे शक्य झाले. पूर्वी एका अंतराळवारीसाठी १०० ते १२० कोटी डॉलर खर्च येत असे, कारण अंतराळात झेपावण्यासाठी वापरलेले रॉकेट त्यानंतर पृथ्वीवर कोसळत असे. जगप्रसिद्ध ‘टेस्ला’ कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांनी २००२ साली स्थापन केलेल्या ‘स्पेस एक्स’ कंपनीने रशिया तसेच अन्य ठिकाणांहून रॉकेट मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न फसल्यानंतर स्वतःचे रॉकेट बनवले. त्यांचे ‘फाल्कन-९’ हे रॉकेट पुन्हा पुन्हा वापरता येत असल्यामुळे एक दशांश खर्चात अंतराळात जाणे शक्य झाले. खर्च कमी झाल्यामुळे अंतराळ पर्यटनापासून ग्रह किंवा उपग्रहांवरून दुर्मीळ खनिजं पृथ्वीवर आणून त्यांचा वापर करणे दृष्टिपथात आले आहे.
स्वातंत्र्यकाळात धान्यासाठी इतर देशांच्या मदतीवर अवलंबून असलेल्या भारतासाठी अंतराळ संशोधन संस्था सुरु करणे ही चैन आहे, असे कोणालाही वाटू शकले असते. पण, विक्रम साराभाईंसारख्या वैज्ञानिकांनी हे स्वप्न पाहिले. पंडित नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांनी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेला राजकीय पाठबळ पुरवले. त्यातून ‘इस्रो’चा जन्म झाला. ‘इस्रो’ने ‘नासा’ आणि अन्य अंतराळ संशोधन संस्थांशी तुलना करता, भारताने अत्यंत किफायतशीर दरात अंतराळ मोहिमा पूर्ण केल्या. मंगळयानाचा प्रति किलोमीटर खर्च ऑटोरिक्षापेक्षा कमी म्हणजे एका किलोमीटरला सात रुपये इतका आला. भारताने १९६७ साली अंतराळ क्षेत्राबद्दल झालेल्या आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या आहेत.
 या करारानुसार अंतराळ क्षेत्र सर्वांसाठी खुले आहे. कोणताही देश अंतराळातील ग्रह, उपग्रह किंवा अन्य कोणत्या गोष्टीवर मालकी हक्क सांगू शकत नाही. या करारात अंतराळ प्रदूषित करण्यास, तसेच त्याचे लष्करीकरण करण्यास विरोध केला आहे. अंतराळ क्षेत्रातील खासगी क्षेत्राच्या सहभागाबद्दल या करारामध्ये उल्लेख नसला तरी आज ती वस्तुस्थिती झाली आहे. अंतराळ क्षेत्राचा आकार वाढून तो ३५० अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतील. अंतराळ क्षेत्राद्वारे अन्य क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठीही चालना मिळू शकते. नरेंद्र मोदी सरकारने देशाच्या परराष्ट्र धोरणात अंतराळ क्षेत्राचे महत्त्व ओळखले आहे. अमेरिका, रशिया, युरोपीय महासंघ, इस्रायल, जपान आणि द. कोरियासारख्या देशांशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये अंतराळ क्षेत्रातील सहकार्याचा मोठा वाटा आहे. यापूर्वी ‘इस्रो’ने विविध देशांचे उपग्रह अंतराळात सोडले आहेत. २०१७ साली ‘इस्रो’ने ‘सार्क’ गटासाठी उपग्रह अंतराळात सोडला, तसेच एकाच उड्डाणात विविध देशांचे १०४ उपग्रह अंतराळात सोडले. पुढील वर्षी ‘इस्रो’ मानवरहित ‘गगनयान’ अंतराळात पाठवणार असून, त्याचे उड्डाण यशस्वी झाल्यास २०२३ साली पहिला भारतीय अंतराळवीर भारतीय अवकाशयानातून उड्डाण करेल. या क्षेत्रात देशादेशांमध्ये जीवघेणी स्पर्धा नसली, तरी ‘व्हर्जिन गॅलाटिक’च्या यशस्वी उड्डाणानंतर आता खासगी क्षेत्राची स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकाव धरून यशस्वी व्हायचे, तर अंतराळ शिक्षण आणि संशोधनावर भर देतानाच या क्षेत्रात भारतीय खासगी कंपन्या, गुंतवणूक संस्था आणि स्टार्ट-अपसाठी अधिकाधिक संधी उपलब्ध होतील, यासाठी सक्रिय प्रयत्न करावे लागतील.




 

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121