स्वातंत्र्यदिनी बॉम्बस्फोट घडविण्याची तयारी करणाऱ्या दहशतवाद्यांना अटक

    12-Jul-2021
Total Views | 150

Lakhanau_1  H x
 
 
लखनऊ : ‘प्रेशर कुकर’मध्ये ‘टाईम बॉम्ब’ ठेवत भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी मोठा घातपात घडविण्याचा कट रचणाऱ्या दोघा अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात उत्तर प्रदेशमधील पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी दोघा दहशतवाद्यांना अटक केली असून मिनहाज अहमद, मसरुद्दीन अहमद अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती आहे. या दोघांकडूनही ‘प्रेशर कुकर’सह ‘टाईम बॉम्ब’ बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून यांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचले असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्तांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
 
 
लखनौशहरातील काकोरी पोलीस ठाण्याच्या भागातील दुबग्गा परिसरात एका गॅरेजमध्ये ‘अल कायदा’चे दहशतवादी लपल्याची माहिती ‘एटीएस’ला मिळाली होती. यानंतर ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी छापे टाकत कारवाई केली. यात दोन दहशतवाद्यांना जीवंत पकडण्यात ‘एटीएस’ला यश आले आहे. पाच दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या अतिरेक्यांना ताब्यात घेतल्यानंतर ‘एटीएस’कडून करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळून आली. यात दोन ‘प्रेशर कुकर’, बॉम्ब, ‘टाईम बॉम्ब’ बनवण्यासाठी लागणारी सात किलो स्फोटके आणि त्यासंबंधी साहित्यही असल्याची माहिती असून अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. यासह काही बडे नेतेही त्यांच्या ‘टार्गेट’वर असल्याची माहिती आहे.
 
 
पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे धागेदोरे हे जम्मू-काश्मीर सीमेवर सक्रिय असलेल्या ‘एक्यूआयएस’ मॉडेलसोबतच पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी जुळल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मूत झालेल्या एका स्फोटातील दहशतवादी हा लखनौमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी कारवायांची सूत्रे पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवरील पेशावर-क्वेटामधून हलवण्यात येत आहेत. हल्ल्यासाठी मिनहाज अहमद आणि मसिरुद्दीन यांची मोठी भूमिका होती. लखनौ, कानपूरमधील साथीदारही यात सामील असून त्यांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121