अफगाणातले घोंघावते संकट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2021   
Total Views |

taliban _1  H x


विकासाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या अफगाणिस्तानात पुन्हा नव्याने जुने तालिबानचे संकट घोंघावताना दिसत आहे. नुकतेच तालिबानने रशियात पत्रकार परिषद घेत अफगाणिस्तानच्या तब्बल ८५ टक्के भागावर आमचे म्हणजे तालिबानचे वर्चस्व असल्याचे म्हटले. त्यातच इराणनेदेखील तालिबानी नेत्यांशी चर्चा केली आहे. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यामुळे तालिबानी राजवट परत येऊ लागली असल्याचे दिसून येत आहे.
 
 
आक्रमक पवित्रा घेत तालिबान्यांनी तेथे पुन्हा देश ताब्यात घेण्याचे युद्ध सुरू केले आहे. असा दावा केला जातोे की, देशातील ४२१ जिल्ह्यांपैकी तालिबानने १५० हून अधिक जिल्ह्यांवर नियंत्रण ठेवले आहे. तालिबानी सैनिक पुढे जात असताना अफगाण सैनिक आधीच शस्त्रे टाकत असल्याचे चित्र काही प्रमाणात दिसून येत आहे. अफगाण सैन्यदलाचे बरेच सैनिक शेजारील देश ताझिकिस्तानमध्ये आपला जीव वाचवण्यासाठी गेल्याचेही चित्र समोर येत आहे. यातून अफगाण सैन्यांची स्थिती कमकुवत झाल्याचे सहज समजते. हे मोठ्या धोक्याचे चिन्ह आहे आहे. अशाप्रकारे लढताना तालिबान देशातील इतर भाग ताब्यात घेण्यास सक्षम असेल, तर हा देश आदिम युगाकडे परत जाण्याचीदेखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. सत्य हे आहे की, अफगाणिस्तानमध्ये येणार्‍या काळात पुन्हा युद्धजन्य परिस्थिती दिसून येण्याची दाट शक्यता आहे.
 
 
अफगाणिस्तान सुरुवातीला रशिया आणि अमेरिका यांच्यात युद्धाचे महत्त्वाचे रिंगण राहिलेला आपण पाहिला आहे. त्यानंतर सप्टेंबर २००१ मध्ये न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन येथे ‘अल कायदा’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने तालिबान आणि ‘अल कायदा’चा खात्मा करण्यासाठी अफगाणिस्तानात तळ ठोकला होता. अमेरिकेने तालिबान आणि ‘अल कायदा’ला अफगाणिस्तानमधून उठविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण आता अमेरिकेलाही आपले व्हिएतनाम आणि इराकमध्ये जे घडले तेच अफगाणिस्तानमध्ये घडत असल्याचे समजले आहे. म्हणूनच अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे हितावह असल्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. अफगाणिस्तानात दोन दशकांत हजारो अमेरिकन आणि नाटो सैनिक मारले गेले.
 
 
त्याचा परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही बसत होता. म्हणून अमेरिकेने स्वतःहून अफगाणिस्तान सोडला. आज अफगाण सैन्य अमेरिकन सैन्याविना मोठ्या प्रमाणात निःशस्त्र आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान ताब्यात घेणे तालिबानसाठी एक प्रकारे सुलभ होत असल्याचे दिसून येत आहे. तालिबानला मिळणारी ताकद ही पाकिस्तानच्या माध्यमातून मिळत आहे, हे आजवर कुणापासूनदेखील लपलेले नाही. पाकिस्तान पुन्हा तालिबानला अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यासाठी पाकिस्तानची सेना तालिबानला अफगाण सैन्यांशी लढताना मदत करेल, असेदेखील एकंदरीत धोरणांवरून दिसून येत आहे.
 
 
पूर्वी, तालिबानने अफगाणिस्तानातील बर्‍याच शहरांमध्ये आत्मघातकी हल्लेदेखील केले, ज्यामुळे लोक घाबरुन गेले आणि त्यांनी घरे सोडली. ताब्यात घेतलेल्या भागात तालिबानी कायदे लागू केले, महिलांना घर सोडण्याची परवानगी नाही. पुरुषांनी लांब दाढी ठेवाण्याची सक्ती केली जात आहे. शैक्षणिक संस्थांना कुलूप ठोकले आहे. महागाई वाढू लागली आहे. सरकारी इमारती पाडल्या जात आहेत. हजारो अफगाण नागरिक अन्य देशांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे चित्र अफगाणिस्तानमध्ये पाहावयास मिळाले. पुन्हा एकदा अशा प्रकारचे भविष्य अफगाणिस्तानात दिसून येणार काय, हाच प्रश्न यानिमिताने पुन्हा पुढे येत आहे.
 
 
आता अफगाणिस्तानात रक्तपात वाढल्यास निवडलेले सरकार आणि तालिबान यात संघर्ष झाल्यास सरकारी सुरक्षादले आणि तालिबानी लढाऊ यांच्या रक्तरंजित संघर्षाला कोण रोखणार हाच कळीचा मुद्दा आहे. सत्य हे आहे की, केवळ अमेरिका, पाकिस्तान यासारख्या देशांनी अफगाणिस्तानला युद्धाच्या आगीत टाकले आहे. शांतता चर्चेत कोणालाही रस नाही. अफगाणिस्तानातल्या या घडामोडींमुळे भारतासाठीही समस्या निर्माण होत आहेत. तेथे अनेक भारतीय प्रकल्प चालू आहेत. यापूर्वीही भारताने तालिबानी सत्तेचे समर्थन केले नव्हते. अशा परिस्थितीत तेथे पुन्हा तालिबानचे राज्य आला तर भारतासाठी आगामी काळ हा नक्कीच काठीण्याचा असेल. एकीकडे अफगाणिस्तान विविध उद्योगांसाठी भारताला आमंत्रण देत आहे. अशावेळी तालिबानने देश ताब्यात घेतल्याचा दावा करणे, हे एखाद्या पुढे जाऊ पाहणार्‍या राष्ट्राच्या मार्गात नक्कीच खोडा निर्माण करणारे आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@