मलालाच्या देशाची खदखद

    09-Jun-2021   
Total Views | 143

Malala_1  H x W
 
 
विवाहसंबंध आणि रीतीरिवाजांबद्दल असहमत असलेल्या मलालाला आता चालीरीतीही नकोशा वाटू लागल्या आहेत. पाकिस्तानातील शिक्षण व महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवणार्‍या मलाला युसूफझईने ब्रिटनचे प्रसिद्ध मासिक ‘वोग’ला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी नुकतेच एक वक्तव्य केले आहे. पण, तिचे हे वक्तव्य तिच्या मायदेशीही कुणाला रुचलेले नाही. लग्नाच्या विषयांवर मलालाने नाक मुरडलं. स्वतःच्याच नव्हे, तर संपूर्ण समाजव्यवस्थेबद्दल तिचा आक्षेप आहे. तिचे म्हणणे आहे की, “जर एखाद्याला जीवनसाथीच मानायचे असेल तर लोक लग्न का करतात. कागदावर या गोष्टींची नोंद ठेवण्याची गरज काय, ही एक भागीदारी का, असू शकत नाही.” मलालाचे हे विचार कदाचित पाकिस्तानातील नागरिकांना रुचले नाहीत. पाकिस्तानच्या प्रसिद्धी माध्यमांनीही मलालाचा समाचार घेतला.
 
 
 
९ ऑक्टोबर, २०१२ रोजी पाकिस्तानातील मिंगोरा स्वातघाटी येथे एक दहशतवादी हल्ला झाला. दुपारी १ वाजताची ही घटना. तालिबानचे हत्यारबंद दहशतवादी एक शालेय बस थांबवतात. “मलाला कोण आहे?” असा प्रश्न विचारतात. भेदरलेल्या विद्यार्थिनी मलालाचे नाव घेत नाहीत. पण, तिच्याकडे नजरा वळल्या. एक गोळी थेट मलालाच्या चेहर्‍याला लागते. तिला सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे वय कमी होते. त्यामुळे लंडनला हवाई रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठवण्यात आले. या घटनेनंतर मलाला प्रकाशझोतात आली. मुलांच्या हक्कांचा ती पाकिस्तानातील आवाज बनली. ‘नोबेल’ पुरस्काराने तिचा सन्मानही झाला. वय वर्ष २३ असलेली मलाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाऊ लागली. पाकिस्तानातील लाडकी मलाला कट्टरपंथीयांना पूर्वीपासूनच खटकत होती. परंतु, आता तिथल्या नागरिकांनाही खटकू लागली. वृत्तनिवेदक फीझा खान यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, “मलाला आता बदलली आहे. एकेकाळी स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या मलालाने हा विषय थोडा बाजूला सारला आहे.” नायझेरियात एका शाळेतील १५० विद्यार्थिनींचे अपहरण करण्यात आले. त्यावेळी बराक आणि मिशेल ओबामांसह अनेकांशी तिने भेटी घेत हे विषय मांडले होते. मलालाने खूप नाव कमावले. मात्र, आता तिच्या लोकप्रियतेत घट झाली आहे.” एका वृत्तसंस्थेच्या माहितीच्या हवाल्यानुसार, बराचसा वेळ मलाला आपल्या बागकामात आणि व्हिडिओ गेम्स खेळण्यात घालवते. वयाच्या १५व्या वर्षीच तिने ‘मलाला फंड’ सुरू केला होता. यात जगभरातून देणग्या आल्या. अगदी डॉलर्समधून मदत मिळाली.
 
 
लंडनच्या बर्मिंघमच्या मध्यवर्ती आणि सुंदर ठिकाणी एक आलिशान बंगला आहे. नोकरचाकर गाड्यांसह सुविधा आहे. १७व्या वर्षातच ‘नोबल’ पुरस्कार मिळाल्याने पैशांची काही कमी नाही. आता अस्सखलित इंग्रजीही मलाला बोलू लागली आहे. कोरोनामुळे कुटुंबासह तिचा ‘वर्ल्ड टूर’चा बेत रद्द झाला. या सर्व गोष्टी जरी सामान्य असल्या, तरीही पाकिस्तानातील नागरिकांना त्या खटकतात. अर्थात, मलालाचे ‘लॅव्हिश’ जगणे आणि तिच्या सवयी त्यांना फारशा रुचत नसाव्यात. यापूर्वी मलालाला पाकिस्तानचाच नव्हे, तर भारताचाही रोष पत्करावा लागला होता. कारण, ‘नोबेल’ पुरस्कार जिंकल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने काश्मीरच्या मुद्द्यावर भाष्य केले होते की, “तिथे मुले बाहेर येण्यासाठी धास्तावतात,” असे वक्तव्य तिने केले होते. एका पाकिस्तानी प्राध्यापकाने याबद्दल टिप्पणी केली होती की, “मलालापेक्षा जास्त हल्ले पाकिस्तानातील लाखो मुलांनी झेलले आहेत. त्याच्याहून गंभीर हल्ले इथे मुलांवर होतात. पाकिस्तानातील अमेरिकेतील ‘ड्रोन’ हल्ल्यांच्या विरोधात ती आवाज उठवणार का? जर तिला आपल्या देशाची इतकीच काळजी असेल तर पुन्हा मायदेशात का येत नाही? मलालावर झालेला हल्ला केवळ रचलेले नाटक नव्हते ना?” असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. २०१४च्या ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालात केवळ तिच्या समर्थकांची संख्या ३० टक्के होती. मलाला ज्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील आहे, तिथल्या आमदारांनीही तिच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचे म्हटले होते. तिच्या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणीदेखील त्यांनी केली होती. तालिबान आणि पाकिस्तानी पोलिसांनी तिचे पुस्तक हटवण्यास सांगितले होते. मलाला ज्या देशाची आहे, तिथल्या कट्टरतावाद्यांनी तर तिला झिडकारलेच; मात्र तिथल्या नागरिकांनाही ती फारशी रुचली नाही. पाकिस्तानातील वास्तव स्वीकारून पुढे काम करण्यापेक्षा मलालाने आलिशान जगणे स्वीकारले की काय, असाच प्रश्न पडतो.
 
 

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

अग्रलेख
जरुर वाचा
भारताचं राफेल विमान पाकिस्ताननं पाडलं का? या प्रश्नावर ए. के. भारती यांनी दिलं उत्तर! म्हणाले, प्रश्न हा...

"भारताचं राफेल विमान पाकिस्ताननं पाडलं का?" या प्रश्नावर ए. के. भारती यांनी दिलं उत्तर! म्हणाले, "प्रश्न हा..."

(India-Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी युद्धविराम देण्यात आला. यानंतर रविवार, दि. ११ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत विस्तृत..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121