कलोपासक जीवनाधारक

    08-Jun-2021   
Total Views | 222

Sonali Joshi_1  
 
‘आर्ट थेरपी’च्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करणार्‍या नाशिक येथील सोनाली जोशी यांच्या कार्याविषयी...
 
 
मानवी जीवनात कलेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. नवीन ऊर्जा, जीवनाचे मोल, महत्त्व आणि जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा सकारात्मक दृष्टिकोन हा मानवीय परिघात निर्माण करण्याकामी कला ही कायमच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. मानवी जीवनाच्या प्रवासात अनेक संकटे येत असतात. त्यापैकीच एक म्हणजे आरोग्यविषयक समस्यांचे संकट. या काळात औषधोपचारांबरोबरच मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे हेही तितकेच आवश्यक असते. यासाठी साहाय्यभूत ठरते ती ‘आर्ट थेरपी.’ नाशिक येथील सोनाली जोशी याच ‘आर्ट थेरपी’च्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत.
 
 
जोशी या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. तसेच त्यांनी ‘आर्ट थेरपी’चे अधिकृत शिक्षणदेखील घेतले आहे. त्याचबरोबर कलाशिक्षक म्हणूनदेखील त्यांनी नाशिकमधील विविध शाळांत कार्य केले आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी असल्याने मानवी जीवनप्रवासातील उणे-अधिक त्यांनी बरोबर हेरले आणि जीवनाचा लेखाजोखा हा कसा सुस्थापित करता येईल, याबाबत त्यांनी ‘आर्ट थेरपी’च्या माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली.
 
 
शालेय कलाशिक्षक म्हणून कार्य करत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जसे की, आकलन क्षमता कमी असणे, लिखाण करण्यात अडचणी येणे, स्मरणशक्तीची कमतरता असणे आदी. या सर्व समस्यांतून विद्यार्थ्यांची मुक्तता व्हावी, यासाठी त्यांनी ‘आर्ट थेरपी’चा सुयोग्य असा वापर केला.
 
 
त्याचा फायदा होऊन अनेक विद्यार्थी या समस्यांतून मुक्त झाले. ‘आर्ट’ आणि ‘क्राफ्ट’मधील काही बाबींचा सुयोग्य वापर करत त्यांनी ज्या मुलांचे हाताचे स्नायू बळकट नाही, अशांना त्यांची ही समस्या दूर व्हावी म्हणून देखील कार्य केले. परिणामस्वरूप, या विद्यार्थ्यांची लेखन करताना येणार्‍या अडचणीतून मुक्तता झाली.
 
 
हे कार्य करत असतानाच सन २०१५ मध्ये जोशी यांना कर्करोगाने ग्रासले. कर्करोग निदान झालेल्या क्षणापासून ते उपचार पद्धतीपर्यंत, त्यातील वेदना, मनाची होणारी अस्वस्थता या सगळ्या बाबी जोशी यांनी स्वतः अनुभवल्या आहेत. कर्करोग हा जितका शारीरिकदृष्ट्या वेदनादायी आहे तितकाच किंबहुना, जास्त असा मानसिकदृष्ट्या तापदायी आहे. ‘आर्ट’मध्ये असणारी ‘हिलिंग पॉवर’ जोशी यांना ज्ञात होतीच. त्याच थेरपीचा वापर त्यांनी स्वतःवर करण्यास या काळात सुरुवात केली. त्यामुळे जोशी यांचा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे सहज प्रवास होण्यास सुरुवात झाली.
 
 
कर्करोग उपचारात मनाचा खूप मोठा वाटा असतो. मन खंबीर असल्यास या काळात जीवनात येणारे नैराश्य सहज परतविता येते. या काळात मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी ‘आर्ट’चा मोठा वाटा असू शकतो, हे जोशी यांनी जाणले. “‘आर्ट थेरपी’मधील ‘मंडल थेरपी’सारख्या पद्धतीतून कर्करोगग्रस्त रुग्णांना नक्कीच उभारी येते,” असे जोशी आवर्जून सांगतात.
 
 
“नकारात्मक विचार येणे स्वाभाविक आहे. मात्र, त्या विचारांचे सकारात्मकतेत परिवर्तन होणे आवश्यक आहे, यासाठी ‘कलर थेरपी’, ‘सेल्फ पोट्रेट थेरपी’ यांसारख्या ‘आर्ट थेरपी’च्या अंगातून मनाचा अभ्यास करता येतो,” असे जोशी सांगतात.
 
 
आपल्या स्वानुभवानंतर इतरांच्या जीवनातदेखील चैतन्य फुलावे व त्यांना जीवनाधार प्राप्त व्हावा, यासाठी ‘हिलिंग-७२०’ या आपल्या केंद्राच्या माध्यमातून जोशी सध्या कार्यरत आहेत.
 
 
आजवर त्यांनी तीन हजारांपेक्षा जास्त कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यापैकी ७५ टक्के रुग्ण हे आज उत्तम जीवनमान व्यतीत करत आहेत. उर्वरित २५ टक्के रुग्ण हे त्यांना याबाबत माहिती नसल्याने किंवा त्यांचा या पद्धतीवर विश्वास नसल्याने मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रक्रियेत आहेत.
 
 
‘आर्ट थेरपी’मुळे वेदनाशामक औषधेदेखील कमी झाल्याचे जोशी सांगतात. रुग्ण व कुटुंब यांचे समुपदेशन, कोणती ‘आर्ट थेरपी’ वापरावी आणि रुग्ण संवाद, अशा तीन पातळ्यांवर या पद्धतीत कामकाज केले जाते. या थेरपीत उपचार होण्याकामी रुग्ण हा कलाकार असणे किंवा त्याच्यात एखादी कला असणे आवश्यक नाही, तर ही थेरपी 'process is more important than end product' या पद्धतीनुसार कार्यरत असल्याचे जोशी आवर्जून नमूद करतात.
 
 
‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफर’ म्हणूनदेखील जोशी यांची एक वेगळी ओळख आहे. “आयुष्यातील संकटांचा सामना करण्याची शिकवण निसर्गाने दिली,” असे सांगत असताना जोशी म्हणतात की, “स्वीकारार्हता हा गुण निसर्गच आपल्याला देतो. याचाच फायदा कोरोनाकाळात नागरिकांना उद्भवणार्‍या विविध समस्यांची उकल करण्याकामी झाला.
 
 
भारतात अजून ‘आर्ट थेरपी’चा म्हणावा तेवढा प्रसार झालेला नाही. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्या दूर होण्याकामी तेथेदेखील ही थेरपी अमलात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात ‘आर्ट थेरपी’ ही एक चळवळ म्हणून उभी राहावी, यासाठी कार्यरत राहणार आहे.” त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121