मुंबईची खाडी आक्रसली; गेल्या ३० वर्षांमध्ये झाला हा बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2021   
Total Views |
creek _1  H x W





मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
गेल्या ३० वर्षांमध्ये मुंबई महानगराच्या खाडीतील १०७ चौ.किमी क्षेत्र नैसर्गिकरित्या लुत्प होऊन त्याठिकाणी दलदलीचा (मडफ्लॅट) आणि कांदळवन आच्छादित अधिवास निर्माण झाला आहे. परिणामी अरुंद झालेले खाडीक्षेत्र हे शहरी भागातील पूरपरिस्थितीला आणि सुपीक जमिनीच्या नष्टतेला कारणीभूत ठरले असून येत्या काळामध्ये ही समस्या वाढणार असल्याची एका अभ्यासाअंती समोर आले आहे.
 
 
 
दलदलीचा आणि कांदळवनांचा अधिवास हा किनारी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, या अधिवासाचा अप्रमाणित विस्तार हा घातक ठरु शकतो. याबाबत स्पष्टीकरण देणारे एका संशोधन समोर आले आहे. 'सृष्टी काॅन्झर्वेशन फाऊंडेशन'ने मुंबई महानगर क्षेत्रातील किनारी भागामध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये (१९९० ते २०१९) झालेल्या बदलांची नोंद केली आहे. यामध्ये उपग्रह छायाचित्रांच्या आधारे काही माहितीचे संकलन करण्यात आले आहे. मुंबईच्या खाडीत दलदलीचा आणि कांदळवनाचा अधिवास अप्रमाणित स्वरुपामध्ये विस्तारल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. कांदळवनांची वारेमाप वाढ, पावसाळ्याव्यतिरिक्तच्या काळात गोड्या पाण्यात झालेली घट आणि समुद्राच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे खाडीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गाळसंचयन झाले आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये ठाणे खाडीतील जवळपास ४७ चौरस कि.मी. मोकळे क्षेत्र हे दलदलीच्या आणि कांदळवनांच्या अधिवासामध्ये रूपांतरित झाले आहे.
 
 
 
कांदळवनांची वाढ ही किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. मात्र, सुपीक जमिनीवर झालेली कांदळवनांची वाढ ही अनेक समस्यांचे मूळ आहे. या अभ्यासामध्ये महानगरातील अशाच काही सुपीक जमिनींवर झालेली कांदळवनांची वारेमाप वाढ नोंदविण्यात आली आहे. उरणमधील करंजा परिसराचे उपग्रह छायाचित्रांच्या आधारे निरीक्षण केले असता, त्याठिकाणी शेतीयोग्य जमिनीवर कांदळवनांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी १९९० मध्ये १७.५ चौ.किमी कांदळवन क्षेत्र होते, जे २०१९ मध्ये ७८ चौ.किमी झाले. येथील शेतीयोग्य भूक्षेत्रावर खाडीचे खारे पाणी शिरून तिथे कांदळवने नैसर्गिकरित्या उगवली. परिणामी १९९५ मध्ये शेतजमिनीत क्षेत्रात १७.८ चौ. किमी असणारी घट २०१९ मध्ये ६०.६ चौ. किमी झाली आहे.
 
 
 
गाळसंचायनामुळे खाड्यांची पात्र ही अरुंद झाली आहेत. शिवाय खाडीमध्ये दलदलीचा प्रदेश वाढल्यामुळे तिची खोली कमी झाली आहे. परिणामी भरतीच्या वेळ पाण्याच्या संचयनाची क्षमता कमी झाली आहे. ज्यामुळे हे पाणी शहरामध्ये शिरल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. तसेच किनारपट्टीच्या प्रदेशात खाडीलगतच्या किंवा समुद्राजवळील बहुतेक शेतजमिनी या क्षार युक्त होत आहेत. या क्षारयुक्त जमिनीवर कांदळवनांची लागवड होत असल्यामुळे त्या नापिक होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. किनाऱ्याबाहेरील क्षेत्रात वाढत जाणाऱ्या पाण्याच्या पातळीवर रोख लावण्यासाठी बंधारे बांधणे हा दीर्घकालीन उपाय नाही. कारण, यामुळे कांदळवनेही नष्ट होतील आणि समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीमुळे या बंधाऱ्यांची उंचीही वाढवावी लागेल. - डाॅ. दिपक आपटे, कार्यकारी संचालक, सृष्टी कॉन्झर्वेशन फाऊंडेशन
 
 
 
 
उपाय काय ?
राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र (नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च) या शासकीय संस्थेने मुंबई महापालिकेच्या सहकार्याने पावसाळ्यात आणि इतर वेळच्या भीषण परिस्थितीत पूर नियंत्रण करण्यासाठी i-flows नावाची एकात्मिक पूर सूचना प्रणाली मुंबईसाठी विकसित केली आहे. या केंद्राच्या कौशल्याच्या आधारे संपूर्ण किनारी परिसंस्थेच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी शास्त्रीय अभ्यासाद्वारे एक व्यापक आराखडा तयार करता येऊ शकतो. याचा वापर बेटांसारख्या असलेल्या मुंबई शहर आणि त्यालगतच्या भागांमध्ये समुद्र-पातळीवरील वाढीचा होणारा परिणाम रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय राज्याला हवामान बदल धोरणाची आवश्यकता असून त्याव्दारे हवामान बदलामुळे किनारी क्षेत्रामध्ये होणाऱ्या दीर्घकालीन बदलाबाबत उपाययोजना करता येतील.
 
 
@@AUTHORINFO_V1@@