मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आला आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण राज्य मागासवर्ग आयोग आता नेमणं हे आघाडी सरकारचं उशिरा सूचलेलं शहाणपण आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. राज्य मागासवर्ग आयोग नेमण्यात आलं आहे. त्याचं स्वागतच आहे. पण १३-१२-२०१९ रोजीच कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने राज्य मागासवर्ग आयोग नेमायला हवा होता. आता आयोग नेमणे म्हणजे सरकारला उशिरा सूचलेलं शहाणपण आहे. यात सरकारने बरेच महिने घालवले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दुर्देव सुदैव काही म्हणा. कोरोनामुळे निवडणुका पुढे गेल्या आहेत. अन्यथा कोणत्याही स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींसाठी एकही जागा शिल्लक राहिली नसती, असं सांगतानाच आता सरकारला इम्पिरिकल डाटावर वेगाने काम करावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरूनही राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. म्हणून हे सरकार सतत बहाणे सांगत आहे. ज्याला काम करायचं असतं, ते बहाणे सांगत नाहीत. ते करून दाखवत असतात. मागास आयोगाबाबत केंद्राचे अधिकार आहेत, असं जरी आपण मानलं तरी राज्य मागासवर्ग आयोग तयार करून अहवाल तयार केला पाहिजे. हा अहवाल केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला दिला पाहिजे. या बेसिक गोष्टी केंद्राने नव्हे तर राज्याने करायच्या आहेत. त्याही केल्या जात नाही, असा दावा करतानाच लोकांना कन्व्हिन्स करता येत नसेल तर त्यांना कन्फ्यूज करा हे या सरकारचं धोरण असून त्यामुळेच हे सरकार असं वागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.