सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानांचा अचानक संवाद
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : “बारावीची परिक्षा रद्द करण्याचा तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. कारण सिर सलामत तो पगडी हजार. हा निर्णय घेतल्यामुळे आमचा तणाव आता नाहिसा झाला आहे”. अशा शब्दात सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले.
देशातील करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सीबीएसई मंडळाची बारावीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारी बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत पुढील चर्चा करण्यासाठी सीबीएसईने ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानकपणे सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. यावेळी पालकांनीदेखील परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का
पंतप्रधान मोदी या बैठकीमध्ये सहभागी होतील, हे ठरलेले नव्हते. त्यामुळे बैठकीदरम्यान अचानक समोर पंतप्रधान आल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, त्याचवेळी थेट पंतप्रधानांशी बोलायला मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
सर्वप्रथम एका विद्यार्थ्याने तुमचा निर्णय अतिशय योग्य असल्याचे सांगितले. कारण सिर सलामत तो पगडी हजार या म्हणीची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे तुम्ही आमचे सर्वांत मोठे प्रेरणास्रोत आहात, असेही म्हटले. त्यानंतर पंतप्रधानांनी विद्यार्थ्याने सांगितलेल्या म्हणीचा आधार घेऊन हेल्थ इज वेल्थ हे महत्वाचे असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे अभ्यासाव्यतिरिक्त व्यायाम करता की नाही, खरे सांगा; तुमचे आई-वडीलही येथेच आहेत, मी त्यांना विचारेल अशी कोपरखळीही मारली.
हिमाचल प्रदेशातील सोलन येथील विद्यार्थीनी कशिश नेगी या विद्यार्थीनीने पंतप्रधानांसोबत अशा पद्धतीने भेट झाल्याचा आनंद झाल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे परिक्षा रद्द करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभारही मानले. गेल्या दीड वर्षांपासून संभ्रमाचे वातावरण असल्याने तणाव निर्माण झाला होता, भविष्याविषयी काळजी वाटत होती. मात्र, आता हा निर्णय घेतल्याने आम्ही पुढील तणावमुक्त झाल्याचे तिने नमूद केले.