नवी दिल्ली : सोलापूरचे रणजितसिंह डिसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकतेच त्यांची जागतिक बँकेच्या शैक्षणिक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. जून २०२१ ते जून २०२४ या तीन वर्षांसाठी ते या पदावर राहून जागतिक बँकेसाठी काम करणार आहेत. यापूर्वी ते शैक्षणिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा जागतिक पातळीवरचा ग्लोबल टीचर पुरस्कार पटकावला आहे. अशी कामगिरी करणारे ते देशातील पहिलेच शिक्षक ठरले.
संपूर्ण जगातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधाररण्यासाठी जागतिक बँकेने 'ग्लोबल प्रशिक्षक' नावाचा उपक्रम सुरू केला आहे. जगभरातल्या मुलांना मिळत असलेल्या शैक्षणिक पातळीत वृद्धी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांची वेगवेगळी ध्येये गाठण्यासाठी जगातल्या १२ तज्ञ व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून २१व्या शतकातल्या शिक्षकांच्या घडणीसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे गुरुजी डिसले यांनी सांगितले.