ईशान्य भारतातील चतुराचा सिंधुदुर्गात अधिवास; पश्चिम घाटातील पहिलीच नोंद

    28-Jun-2021   
Total Views | 258
dragonfly _1  H


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
ईशान्य भारतामध्ये आढळणाऱ्या चतुराची प्रथमच पश्चिम घाटामधून नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये हा चतुर आढळून आला आहे. याशिवाय केरळमधील अधिवास असणारी टाचणीदेखील सिंधुदुर्गात सापडल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या चतुर आणि टाचणींच्या यादीमध्ये भर पडली आहे.
 
 
 
'ओडोनाटा' ही उडणाऱ्या कीटकांची ऑर्डर आहे. ज्यामध्ये टाचणी आणि चतुरांचा समावेश होतो. जैवविविधतेची खाण असणाऱ्या पश्चिम घाटामध्ये 'ओडोनाटा'च्या १७४ प्रजाती सापडत असून त्यामधील ५६ प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. या प्रजातींंमधील तब्बल १३४ प्रजातींची महाराष्ट्रामधून नोंद आहे. आता या नोदींमध्ये दोन प्रजातींची भर पडली आहे. 'अ‍ॅग्रिओक्नेमिस केरेलेन्सिस' या टाचणीची आणि गीनाकंठा खसियासा या चतुराच्या प्रजातीची महाराष्ट्रामधूून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांमध्ये या दोन्ही प्रजाती आढळून आल्या आहेत. कुडाळच्या 'संत राऊळ महाराज महाविद्यालया'चे सहाय्यक प्राध्यापक योगेश कोळी, विद्यार्थी अक्षय दळवी आणि संशोधक डाॅ.दत्तप्रसाद सावंत यांनी या नोंदी केल्या आहेत. भारतातील नामांकित शोधपत्रिका 'जर्नल ऑफ थ्रेटंड टाक्सा'मध्ये ही नोंद प्रसिद्ध झाली आहे.
 
 
dragonfly _1  H
 
 
टाचणीची 'अ‍ॅग्रिओक्नेमिस केरालेन्सिस' ही प्रजात प्रामुख्याने केरळमध्ये सापडणारी प्रजात असून प्रथमच तिची महाराष्ट्रामधून नोंद केल्याची माहिती डाॅ.दत्तप्रसाद सावंत यांनी दिली. कुडाळ तालुक्यामधील ठाकूरवाडी पाणथळ, बांबुळी आणि चिपी विमानतळाच्या पठारवरुन या टाचणीची नोंद केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पश्चिम घाटामधील या प्रजातीचे उत्तरेकडील अधिवास क्षेत्र या नोंदीमुळे समजले आहे. चतुराची 'गायनाकँथा खासियाका' ही प्रजात प्रामुख्याने ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमधील किनारी प्रदेशात आढळत असून आम्हाला ती प्रथमच महाराष्ट्रामध्ये सापडल्याची माहिती संशोधक अक्षय दळवी यांनी दिली. सावंतवाडीमधील माजगावमध्ये रात्रीच्या वेळी निरीक्षण करत असताना प्रकाशझोतावर हा चतुर आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या प्रजातीचे नमुने गोळा करुन निरीक्षणाअंती प्रजातीच्या ओळखीबाबत खात्री करण्यात आली. 'गायनाकँथा खासियाका' चतुराचा अधिवास ईशान्य भारतापुरताच मर्यादित असल्याचे मानले जात असताना त्याची नोंद आता पश्चिम घाटामधून करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ती पहिलीची नोंद असल्याचे सावंत यांनी नमूद केले.
 
 
'अ‍ॅग्रिओक्नेमिस केरालेन्सिस'
 

dragonfly _1  H 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121