साहित्यातील मुसाफिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2021   
Total Views |

manse_1  H x W:



लेखक जनार्दन ओक यांनी कथा, नाटक आणि चित्रपट संवाद लेखन करून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविला, त्यांच्या लेखनप्रवासाविषयी जाणून घेऊया...


जनार्दन ओक मूळचे बदलापूरचे. त्यांचे ओक हे बदलापुरातील सुप्रतिष्ठित घराणे होते. त्यांची बदलापूरमध्ये स्थावर, जंगम मोठी मालमत्ता होती. जनार्दन यांचे वडील श्रीकृष्ण पांडुरंग ओक हे स्वातंत्र्यसैनिक होते. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष यु. एन. ढेबर यांच्याबरोबर त्यांनी उत्तर प्रदेश, गुजरात येथे काँग्रेसच्या प्रचाराचे कार्य केले. तसेच भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या बरोबरही त्यांनी काम केले. सततचा तुरुंगवास, दानशूरता, सामाजिक कार्य व अल्पायुष्य यांनी त्यांचे संसाराकडे दुर्लक्ष होऊन सर्व संपत्ती गेली. त्यानंतर पोट भरण्यासाठी ते कल्याणला आले.
 
जनार्दन ओक सध्या कल्याणमधील टिळक चौकातील दत्तआळी परिसरात वास्तव्यास आहेत. भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांनी काँग्रेसच्या राजकारणात भाग घेणे बंद केले व त्यांनी गोसेवेचे काम सुरू केले. त्यामुळे काँग्रेसनेदेखील त्यांच्या कामाची दखल घेतली नाही. आपण जे काही काम केले ते कर्तव्य म्हणून केले. त्यामागे लाभ मिळावा अशी वृत्ती नसल्याने त्यांनीही तत्कालीन सरकारकडे कधीही काही मागितले नाही. जनार्दन ओख राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बाल स्वयंसेवकापासून मुख्य शिक्षक, कार्यवाह, विस्तारक होते, त्या कामामुळे देशभक्ती अंगात मुरली. कल्याणला आल्यावर ११ वी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी बेंचफिटर, कारकून, केमिकल ऑपरेटर अशा नोकर्‍या केल्या खर्‍या; पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. या नोकरीमध्ये यश न आल्याने त्यांनी आपली पावलं व्यवसायाकडे वळविली. ‘इन्शुलेटिंग वार्निश’ बनवून तेही विकले. पण, त्यात शारीरिक हानी होऊ लागल्याने तेही बंद केले. ते १९८५ पासून लेखनावर उदरनिर्वाह करू लागले. त्यांनी रहस्य, गूढ, अनुवाद, सामाजिक, विनोदी, राजकीय, ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. याशिवाय सात नाटके व दोन चित्रपटांचे संपूर्ण लेखनही त्यांनी केले आहे. रहस्यकथेपासून ते अध्यात्म या विविध विषयांवरील त्यांची १५३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
जनार्दन यांनी ‘निष्पाप’ हा तत्कालीन परिस्थितीवरचा राजकीय चित्रपट व ‘सडेफटिंग’ या विनोदी चित्रपटांचे कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. देशभक्तीच्या संस्कारामुळे मराठी भाषेत कुणीही न लिहिलेल्या ‘विजयनगरचे साम्राज्य’, कोणासही माहिती नसलेल्या पुष्यमित्र शुंग यांच्यावरील ‘सेनापती’, ‘राणी दुर्गावती’, ‘शकांतक दुसरा चंद्रगुप्त’, ‘शालिवहन शककर्ता गौतमीपुत्र शालिवाहन’, ‘रामदास’, ‘आर्य चाणक्य’, ‘अहिल्यादेवी’ अशा त्यांच्या कांदबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच कैकेयी खरी कशी होती यावर ‘कैकेयी’, ‘लंकापती रावण’, ‘नल-दमयंती’, ‘पौराणिक’, ‘याज्ञवल्क्य’, ‘शंकराचार्य’, ‘नवनाथ’, ‘व्यास’ यांच्यावर लिहून कठोपनिषदावरही लिहिले आहे. हे लिखाण करताना जे लघु स्वरूपात लिहिले होते, ते विस्तृत स्वरूपात लिखाण करायचे एवढेच उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले होते. हेरकथा लिहितानाही देशप्रेमाचीच महती त्यातून सांगायचे. ‘विषकौमुदी’ या चंद्रगुप्तावरील विषप्रयोगाच्या प्रयत्नावरील नाटकातही तेच उद्दिष्ट समोर ठेवले होते. लेखन करतानाही त्यांनी त्यामागे धोरण ठेवले होते. सध्या जनार्दन हे ‘ज्ञानेश्वरी’ लिहित आहेत. ही ‘ज्ञानेश्वरी’ वाचकांना समजण्यास आणि वाचण्यास सोपी जावी, या पद्धतीने लिखाण करण्याचे काम ते करीत आहेत. याशिवाय त्यांना कविता, पोवाडा, मातीकाम, चित्रकला यांची आवड आहे. त्यांनी उर्दूचा थोडा अभ्यास केला आहे. ‘तूं उर्दू काव्यातील’ पुस्तक प्रसिद्ध असून त्यात उर्दू शेराचे मराठी काव्यात अनुवाद आहेत. काही उर्दू रचनाही त्यांनी रचल्या आहेत.

जनार्दन ओक यांनी विविध स्पर्धांसाठी चार प्रायोगिक नाटकांचे लेखन केले होते. त्यातील ‘दि ट्रॅप’ नाट्यप्रयोगाला मुंबई महानगर आंतरविभागीय नाट्यस्पर्धेत १९७९ ला चार पारितोषिके मिळाली. ‘होऊन जाऊ दे’ आणि ‘दि ट्रॅप’ ही नाटके पुस्तकरूपाने प्रसिद्ध आहेत. ‘निष्पाप’ या चित्रपटाच्या कथेस ३० व्या महाराष्ट्र चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट कथेचे नामांकन मिळाले आहे. जर्नादन ओक यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कल्याण शाखेचे अध्यक्षपद भूषविले आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेचे उपाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. ‘काव्यकिरण मंडळा’च्या कल्याण या संस्थेच्या कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. तसेच ‘सार्वजनिक वाचनालय, कल्याण’ या संस्थेच्या कार्यकारिणीवर त्यांची सातत्याने निवड झाली होती.
विभागीय साहित्य संमेलन डोंबिवली येथे साहित्यिक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बिर्ला महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव समारोहात तत्कालीन कुलगुरू स्नेहलता देशमुख यांच्या हस्तेही त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठाणे येथे साहित्यिक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते २०१४ साली ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



@@AUTHORINFO_V1@@