उद्योगक्षेत्रातील ‘पाटील’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2021   
Total Views |


aruna_1  H x W:



प्रामाणिकपणा , प्रचंड कष्ट घेण्याची तयारी , सामाजिक तळमळ , भला मोठा मित्रपरिवार आणि दांडगा जनसंपर्क याच्या जोरावर विनोद पाटील विविध उद्योग उभारुन यशस्वी झाले. समाजाने आपल्याला जे दिले आहे ते दुपटीने समाजाला परत करता आले पाहिजे या भावनेनेच ते व्यवसाय करतात. त्यामुळेच ते इतर उद्योजकसुद्धा घडवू शकले .



हा उद्योजक खर्‍या अर्थाने या मातीतला. भूमिपुत्र. त्याने कष्ट करण्यास मागे-पुढे पाहिलेच नाही. कष्ट करणार्‍याच्या मागे वैश्विक शक्ती उभी राहते, हे त्यास ठाऊक होते. त्याप्रमाणे तो कष्ट करत राहिला. इथे एक उद्योग उभारून तो सांभाळणे अवघड असताना त्याने पाच उद्योग उभारले आणि यशस्वी चालवलेसुद्धा. या उद्योजकास माणसांना मदत करणे म्हणजे आवडीचा छंद. त्याने स्वत: व्यवसाय करता करता इतर तरुण उद्योजकांनादेखील घडवले. आज हे उद्योजक तरुण त्यांचा व्यवसाय उत्तम पद्धतीने चालवत आहेत. इतरांना प्रोत्साहन देऊन मोठ्ठं करणारा हा उद्योजक म्हणजे ‘अरुणा डेव्हलपर्स’चे विनोद रमेश पाटील.
रमेश बारकू पाटील आणि अरुणा रमेश पाटील हे दाम्पत्य मूळचे मुलुंडचे. सोनकोळी समाजातील या दाम्पत्यास दोन मुले आणि दोन कन्या अशी एकूण चार अपत्ये. त्यातील विनोद सर्वात लहान. त्याचं शालेय शिक्षण मुलुंडच्या सॅमसन इंग्लिश हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर ‘मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स’मधून बारावी झाली. त्यानंतर विनोद यांनी उद्योग व्यवसाय करण्याचे ठरवले. रमेश पाटलांचा त्यास पाठिंबा होता. आई-वडील पहाडासारखे पाठीशी उभे राहिल्यानंतर उद्योगाचा डोंगर उभा करणे सहज शक्य होतं. विनोदनी चाळीतील घरं बांधण्यापासून सुरुवात केली. ‘अरुणा कन्स्ट्रक्शन’ असं कंपनीला आईचंच नाव देऊन व्यवसायाला सुरुवात केली. घरं बांधता बांधता एक संधी चालून आली, ज्यामुळे विनोद इमारत बांधकामामध्ये उतरले. याचदरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत काही इमारतीदेखील तयार केल्या.



अरुणा कन्स्ट्रक्शन’ आता ‘अरुणा डेव्हलपर्स’ म्हणून ओळखली जाऊ लागली. या व्यवसायामध्ये धीरेन पोपट आणि रवी हांडे-पाटील या मित्रांनी विनोदना खूप मदत केली. मुलुंडमध्ये ‘अवनी टॉवर’ उभा राहिला. ‘अरुणा डेव्हलपर्स’च्या यशात मानाचा तुरा खोवला गेला. इमारती तयार झाल्यानंतर सुरक्षिततेचा प्रश्न असायचा. अनेकजण सुरक्षारक्षकाची मागणी करायचे. या गरजेतूनच विनोद पाटील यांनी सुरक्षारक्षकांची संस्था निर्माण केली. ‘स्पॉट सिक्युरिटी’ असं त्यास नाव दिलं. अवघ्या ५० सुरक्षारक्षकांनी सुरु झालेली ही संस्था शेकडो सुरक्षारक्षकांची कधी झाली कळलंच नाही. याचदरम्यान ठाणे ते भिवंडी परिसराची रहदारी नियंत्रित करण्यासाठी ‘ट्राफिक वॉर्डन’ची सेवा देण्यासदेखील त्यांच्या संस्थेने सुरुवात केली, अशाप्रकारे ‘ट्राफिक वॉर्डन’ची सेवा पुरविणारी ‘स्पॉट सिक्युरिटी’ ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच संस्था होती. तत्कालीन उपायुक्त (परिवहन) शशिकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळेच ही सेवा आपण देऊ शकलो, असे विनोद पाटील प्रांजळपणे नमूद करतात. पुढे ही संस्था त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांना चालविण्यासाठी दिली.



समाजातील ‘फिटनेस’चं फॅड वाढत होतं. हे पाहून २००७ च्या दरम्यान विनोद पाटील यांनी फिटनेस क्षेत्रात पाऊल ठेवले. मुलुंडला तीन हजार चौरस फूट जागेत हेल्थक्लब सुरु केला. आरोग्याकडे लक्ष न देणार्‍यांचे पायसुद्धा त्यामुळे या ‘हेल्थ क्लब’कडे वळायला लागले. या ’हेल्थ क्लब’ची जबाबदारी त्यांनी दोन तरुणांवर दिली आहे. हे दोन तरुण फिटनेस क्षेत्रातील उद्योजक म्हणून घडत आहेत. ज्याप्रमाणे सुरक्षारक्षकांची विचारणा पाटील यांना होत होती तशीच विचारणा केबलबाबतीतसुद्धा होऊ लागली. खरंतर विनोद पाटील यांचे मित्र केबलच्या व्यवसायात होतेच. त्यामुळे ते कधी या क्षेत्रात आले नाही. मात्र, लोकांनी अनेकवेळा आपणच केबलची सेवा द्या, असा आग्रह केला आणि त्यातून ते या क्षेत्रात आले. ‘आई एकवीरा केबल नेटवर्क’ या नावाने व्यवसाय सुरु झाला. त्यांच्या येण्याने या क्षेत्रात स्पर्धा तयार न होता सहकार्याची भावना रुजली. अवघ्या ६० घरांनी सुरु झालेला हा व्यवसाय शेकडो घरांमध्ये पोहोचलेला आहे.



विनोद पाटील यांचा मित्रपरिवार दांडगा आहे. अगदी जीवाला जीव देणारे मित्र. त्यापैकी उमेश महाडिक, मिलिंद साळवी, यशोधन शेट्टी या तीन जिवलग मित्रांसोबत विनोद पाटील यांनी ‘स्वयंभू आर्ट्स’ नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती केली. ‘सूत्रधार’ नावाचा हा चित्रपट २०१४ साली रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. चिन्मय मांडलेकर, सुशांत शेलार, अलका कुबल, विनय आपटे अशी तगडी कलाकार मंडळी या चित्रपटात होती. दुर्दैवाने हा चित्रपट फारसा व्यवसाय करु शकला नाही.



विनोद पाटील यांनी आपल्या मित्रासोबत मत्स्यशेतीचा व्यवसायदेखील केला. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात त्यांची ही मत्स्यशेती आहे. प्रामुख्याने कोळंबीचे उत्पादन येथे घेतले जाते. ही कोळंबी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्सना पुरवली जातात.
समाजाचे आपण देणे लागतो ही भावना विनोद पाटील यांच्या मनात लहानपणापासूनच आहे. समाजाला आपण त्याची परतफेड करणे गरजेचे आहे, या विचाराने त्यांनी राजाराम साळवी यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेत प्रवेश केला. यामार्फत त्यांनी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले. अनेक तज्ज्ञ व्यक्ती या शिबिरासाठी निमंत्रित केले. ‘दादर केटरिंग कॉलेज’च्या माध्यमातून समाजातील ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला. आज हे विद्यार्थी आदरातिथ्य क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत आहेत. २०१३ साली त्यांनी ‘आदर्श रिक्षावाला’ ही अभिनव स्पर्धा घेतली. प्रामाणिक, उच्चशिक्षित, समाजसेवी भावना जोपासणार्‍या रिक्षाचालकांचा सत्कार करण्यात आला. यासाठी शेकडो रिक्षाचालकांची मुलाखत घेण्यात आली होती.


विनोद पाटील हे जसे उत्तम उद्योजक आणि समाजसेवक आहेत तसेच ते कुटुंबवत्सलसुद्धा आहेत. मीनल माळी या सुविद्य तरुणीसोबत त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. तन्वी आणि अवनी अशा दोन कन्या त्यांना आहेत. तन्वीने ‘मानसशास्त्र’ विषयात पदवी प्राप्त केली आहे, तर अवनी आता बारावीमध्ये शिकत आहे. “आयुष्याचा प्रवास मीनलच्या खंबीर सोबतीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता,” या शब्दांत ते आपल्या पत्नीविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.


प्रामाणिकपणा, प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, सामाजिक तळमळ, भला मोठा मित्रपरिवार आणि दांडगा जनसंपर्क याच्या जोरावर विनोद पाटील विविध उद्योग उभारुन यशस्वी झाले. समाजाने आपल्याला जे दिले आहे ते दुपटीने समाजाला परत करता आले पाहिजे या भावनेनेच ते व्यवसाय करतात. त्यामुळेच ते इतर उद्योजकसुद्धा घडवू शकले. विनोद पाटील खर्‍या अर्थाने उद्योगातले ’पाटील’ ठरले.

@@AUTHORINFO_V1@@