कोरोना विषाणू महामारीशी झगडणार्या जनतेला वाचवण्यासाठी सर्वच देश लसीकरण अभियान आक्रमकपणे राबवताना दिसतात. तथापि, मर्यादित प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे जगभरातील देशांकडे लस निवडीचे फारसे पर्यायही नाहीत. त्याच कारणामुळे कित्येक देशांना चीनच्या ‘सिनोफॉर्म’नामक लसीवर अवलंबून राहत महामारीवर नियंत्रणाचे स्वप्न पाहण्याची वेळ आली आहे. मात्र, आता तर त्या देशांना चिनी लसीवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू पाहत आहे.
कारण, चीनच्या ‘सिनोफॉर्म’ लसीची कोरोनाविरोधातील कमी परिणामकारकता. दरम्यान, आपले शेजारी पाकिस्तान आणि नेपाळमध्येदेखील चिनी लसीचा वारेमाप वापर करण्यात आला. त्यानंतर आता या देशांतही कोरोना संक्रमणाचे संकट वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या एका वृत्तानुसार, चीनचा शेजारी मंगोलियानेदेखील ‘सिनोफॉर्म’ लसीच्या आधारे उन्हाळ्यातच कोरोनाला संपवू, असे आश्वासन जनतेला दिले होते. बहारीननेही चिनी लसीचा वापर करत लवकरच सर्वांचे जीवन सर्वसामान्य पातळीवर येईल, असे म्हटले होते. सेशेल्स तर आपली खालावलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी चिनी लसीचा वापर करत होता.मात्र, आता ते त्यांच्यासाठी शक्य असल्याचे दिसत नाही. इतकेच नव्हे, तर चिलीनेही चीनच्या ‘सिनोफॉर्म’ लसीच वापर कोरोनाविरोधातील लढ्यातील एक शस्त्र म्हणून केला. पण, आता तिथेही लसीकरणानंतर बर्याच मोठ्या संख्येने लोक कोरोना विषाणूने संक्रमित झाले आणि विशेषज्ज्ञांना गंभीर संकटाचा इशारा द्यावा लागला. मंगोलिया, बहारीन, सेशेल्स, चिली या चारही देशांनी सुलभतेने उपलब्ध झालेल्या चिनी लसीवरच भरवसा ठेवला होता. परंतु, आता हे सारेच देश कोरोना विषाणूपासून मुक्तीऐवजी संक्रमण संख्येत आलेल्या भीषण उसळीने धास्तावलेले आहेत. चीनने गेल्या वर्षाच्या अखेरीस लस मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून जगभरातील देशांना आपल्या झेंड्याखाली आणण्याची मोहीम सुरू केली होती. कारण, भारत आणि अमेरिका जगाला लसपुरवठा करून आपल्या बाजूने वळवून घेतील, अशी त्याला भीती वाटत होती.
आता मात्र कित्येक देशांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे समजते की, चीनने तयार केलेली ‘सिनोफॉर्म’ कोरोनाविरोधी लस विषाणू संक्रमण रोखण्यात प्रभावी सिद्ध होत नाही. प्रामुख्याने कोरोनाच्या नव्या ‘व्हेरिएंट’वर या लसीचा अजिबात परिणाम होताना दिसत नाही. दरम्यान, विशेषज्ज्ञांच्या मते कोणत्याही देशात कोरोनाच्या प्रकरणांची घटती संख्या तो देश आपल्या नागरिकांना कोणती लस टोचत आहे यावर अवलंबून आहे. ‘डेटा ट्रॅकिंग प्रोजेक्ट अवर वर्ल्ड इन डेटा’नुसार, मंगोलिया, बहारीन, सेशेल्स आणि चिलीमध्ये ५0 ते ६८ टक्के लोकसंख्येचे संपूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात सर्वाधिक कोरोना प्रकोप सहन करणार्या दहा देशांमध्ये या चारही देशांचा समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे, हे चारही देश ‘सिनोफॉर्म’ व ‘सिनोव्हॅक बायोटेक’द्वारे तयार केलेल्या चिनी लसीच्या मात्रांचा वापर करत आहेत.
जगभरातील किमान ५३ देशांमध्ये चीनची कोरोनाविरोधी लस टोचली जात आहे. त्यापैकी कित्येक दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातील विकसनशील देश आहेत. खरे म्हणजे, चिनी कोरोनाविरोधी लस स्वस्त आणि साठवणुकीसाठी सोपी आहे. उणे २0 अंशापेक्षा अधिक तापमानावर लस साठवणुकीची सुविधा नसलेल्या देशांसाठी ही लस वापरण्याजोगी आहे. पण, त्यात विषाणूवरील परिणामकारकतेचा अभाव आहे. दरम्यान, चीनमधील ‘सेंटर फॉर डिसीस कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन’चे डायरेक्टर गाओ फू यांनी दोन दिवसांआधीच आता उपलब्ध असलेल्या लसींचा प्रभाव कमी असल्याचे स्वीकारले होते. तसेच त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी चिनी लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली जात असल्याचे ते म्हणाले होते. चिलीमध्ये चीनच्या ‘कोरोनाव्हॅक’ लसीचा वापर करण्यात येत आहे. त्याची निर्मिती दिग्गज चिनी औषध उत्पादक कंपनी ‘सिनोव्हॅक’ने केली आहे. चिली विद्यापीठातील अध्ययनात, चिनी लसीच्या पहिल्या मात्रेचा प्रभाव केवळ तीन टक्के असल्याचे समोर आले होते, तर दुसर्या मात्रेनंतर तिची परिणामकारकता ५६ टक्क्यांपर्यंत वाढते. ब्राझीलमधील अध्ययनात तर चिनी लसीचा प्रभाव ५0 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे उघड झाले होते. एकूणच, चिनी लस कोरोना रोखण्यात फारशी सक्षम नाही, हेच यातून स्पष्ट होते.