ठाण्यातील लघुउद्योगांचे भीष्म पितामह, एक समाजधुरीण उद्योजक डॉ. मधुसूदन तथा आप्पासाहेब खांबेटे यांच्याविषयी...
दि. ३० जून, २०१७ रोजी देशभरात लागू असलेले १७ वेगवेगळे अप्रत्यक्ष कर रद्द करून वस्तू व सेवा कर (जीएसटी) करप्रणाली भारतात लागू करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच संपूर्ण भारतातील उद्योगांसाठी सुधारणांचे पर्व सुरू झाले. त्यावेळेस ८५ वर्षांच्या डॉ. मधुसूदन तथा आप्पासाहेब खांबेटे तसेच ‘टिसा’ यांच्यासाठी व सर्व उद्योगांसाठी समाधानाचा क्षण होता. कारण, गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ जकात तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कर व स्थानिक संस्था कर रद्द करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना कायमस्वरूपी विराम मिळाला. तसेच ‘इन्स्पेक्टरराज’ व लालफितीपासून लघु व मध्यम उद्योगांची कायमची सुटका झाली. यात ठाण्यातील उद्योग व उद्योजकांना डॉ. खांबेटे यांचाच मोठा आधार वाटतो.
डॉ. मधुसूदन उर्फ आप्पासाहेब खांबेटे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील अंजर्ले या गावात स्वातंत्र्यापूर्वी झाला. त्यांचे वडील कोलकाता येथील ‘मायर्स पंप’मध्ये मॅनेजर होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांचे शिक्षण एंग्लो गुजराती स्कूल या गुजराती माध्यमाच्या शाळेत १९३८ ते १९४२ दरम्यान झाले. त्यामुळे त्यांना इंग्रजी, हिंदी आणि मूळ भाषा मराठी याव्यतिरिक्त गुजराती आणि बंगाली अस्खलितपणे येते. त्यांनी १९४८ मध्ये नागपुरात मॅट्रिक पूर्ण केले, त्यानंतर त्यांना त्यांच्या मामाकडे राहण्यासाठी मुंबईला पाठवले गेले. तेथे त्यांनी ‘इंटरमिजीएट’पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच हॉकी, फुटबॉल आणि खो-खो संघाचे नेतृत्व त्यांनी केले. ‘इंटरमिजीएट सायन्स’ पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा कोलकाताला गेले. तिथे त्यांना ‘मे. वेस्टिंगहाऊस सॅक्सबी अॅण्ड फार्मर’मध्ये संधी लाभली. प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतच ‘इलेक्ट्रिकल’ आणि ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ या दोन्ही पदविका त्यांनी मिळवल्या.
शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक झालेल्या मधू खांबेटे यांनी आपली ‘अप्रेंटिसशिप’ गांभीर्याने घेतली. त्यांच्या कामातील समर्पणाच्या आणि एकाग्रतेमुळे व्यवस्थापकीय संचालकाने त्यांना इंग्लंडमध्ये आठ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कंपनीने त्यांना ‘आर अॅण्ड डी’मध्ये पोस्ट केले. कारखान्यात एवढ्या मोठ्या चिकाटीने काम करत असल्याने विचार आला की, आपण स्वतः काम समजून घेण्याइतके हुशार आहोत आणि हेच योगदान नोकरीपेक्षा आपली स्वतःची कंपनी स्थापन करून दिले तर? आणि त्यातूनच वयाच्या ३२ व्या वर्षी स्वत:चे स्वतंत्र युनिट सुरू केले. कोलकाता येथे खांबेटे यांच्या निवासस्थानासमोर एक बिहारी सिंग नावाचे कुटुंब राहत होते, त्यांचा तबेला होता, त्यांच्याकडे १०० सायकलरिक्षा होत्या. खांबेटे यांनी त्यांच्या मुलास श्याम बिहारी सिंग यास भागीदार म्हणून घेतले, सोबत त्यांचा खास मित्र एस. व्ही. जोशी होताच. या तिघांनी मिळून ‘न्यूमॅटिक्स’ आणि ‘हायड्रॉलिक पाईप फिटिंग्ज’ तयार करण्यासाठी तबेल्यातच ‘मे. एसकेजी इंजिनिअर्स’ नावाचे युनिट स्थापन करून उद्योजकतेची मुहूर्तमेढ रोवली.
खांबेटे यांनी त्याच्या तत्त्वांचे पालन करत आपल्या आधीच्या कंपनीची कोणतीही उत्पादने कॉपी किंवा तयार न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ‘अलाईड प्रॉडक्ट्स’ उत्पादनासह प्रारंभ केला. त्यानंतर काही ‘एर्मेटो फिटिंग्ज’ आयात केल्या. उद्योगाला सुगीचे दिवस असताना आई-वडील मुंबईच्या हद्दीजवळ ठाण्यात स्थायिक झाले, तिथे त्यांचे मामा राहत होते. त्यामुळे खांबेटे यांनीदेखील ठाणे येथे जावे, यासाठी दबाव वाढला. कोलकाता येथे स्थापन केलेली ‘मे. एसकेजी इंजिनिअर्स’ या भरभराटीस आलेल्या उद्योगातील भागीदारी खांबेटे यांनी जड अंतकरणाने सोडून सर्व सूत्रे भागीदार श्यामसुंदरकडे दिली. विशेष म्हणजे, आता श्यामसुंदर नसले तरी ही कंपनी मात्र सुरू असल्याचे खांबेटे अभिमानाने सांगतात.
बंगाल ते ठाणे या प्रवासात त्यांनी पुनश्च उद्योजकतेची कास धरली. वागळे इंडस्ट्रियल इस्टेट येथे महाराष्ट्र वित्तीय महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या दीड लाख रुपयांत व १५ हजार उसनवारीतील रकमेतून ५०० चौरस मीटरचा भूखंड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे वडील रामकृष्ण यांच्या नावाने १९६९ मध्ये ‘मे. रामसन इंजिनिअर्स’ या नावाने पुन्हा श्रीगणेशा केला. स्वतः १८ तास राबून त्यावेळी किमान ५० जणांना रोजगार देत तीन शिफ्टमध्ये राबून कारखाना भरभराटीस आणला.
लघुउद्योगांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी लघुउद्योजकांची संघटना नव्हती. तेव्हा डॉ. मधुसूदन उर्फ आप्पासाहेब खांबेटे यांनी वेद गुगलानी, बी. के. गुप्ता, रामन्ना, श्रीनिवास, पी. नारायणन, आर. व्ही. दांडेकर आदी लघुउद्योजकांना सोबत घेऊन १९७४ साली ‘ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’ अर्थात ‘टिसा’ची स्थापना केली. संस्थेची स्वतःची वास्तू असावी, यासाठी संघर्ष करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे १९८३ मध्ये एक रुपया चौ.मी. दराने ‘टिसा’ला प्लॉट मिळाला. तेव्हापासून महाराष्ट्रातील प्रत्येक ‘एमआयडीसी’त एक रुपया चौ.मी. दराने प्लॉट देण्यास सुरुवात झाली. याचे श्रेय खांबेटे यांनाच जाते.
१९८९ च्या सुमारास उद्योगांना एकत्र करून कराच्या जाळ्यात आणण्यासाठी खांबेटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्र सरकारकडे धाव घेतली होती. त्यानंतर १९९० साली ‘कोसिआ’ म्हणजे ‘चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स’ या लघुउद्योजकांच्या राष्ट्रीय शिखर संस्थेचा जन्म झाला. या माध्यमातून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून नवीन पिढीला मार्गदर्शन तसेच रोजगार देण्याचे काम वयाच्या नव्वदीतही अव्याहतपणे सुरू आहे. गळ्यात ‘भ्रष्टाचार हटाव’चा बिल्ला अडकवून ते भ्रष्टाचाराचा आजन्म निषेध करीत आहेत. कोरोना काळात खांबेटे व त्यांच्या सहकार्यांनी ‘टिसा’ व ‘कोसिआ’च्या माध्यमातून औद्योगिक तसेच वैद्यकीय साहाय्य करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. मधू खांबेटे यांना आपुलकीने ‘आप्पासाहेब’ म्हणून संबोधले जाते, तर जवळच्या मित्रांसाठी ते मधूच आहेत. अशा मधूमय व्यक्तित्वाला ठाणे महापालिकेने ‘ठाणेभूषण’ पुरस्कार देऊन गौरविले. सध्या उतारवयातदेखील आप्पा खांबेटे उद्योजकांना मार्गदर्शन करीत असून उर्वरित आरोग्यदायी आयुष्यासाठी त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!