मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षातील १५ ते २० नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीत उपस्थित असणाऱ्या नेत्यांच्या नावाची यादी देत भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बैठकीवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्विट केले की,"शरद पवारन यांच्या दिल्लीतील घरी बैठक २० जण उपस्थित असणाऱ्यांची यादी पाहाता संभाव्य आघाडी हा राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून एक नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही." असे म्हणत बैठकीत उपस्थित राहणाऱ्या नेत्यांची यादी जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे :
१) यशवंत सिंन्हा
२) पवन वर्मा
३) संजय सिंग
४) डी.राजा
५) फारुख अब्दुला
६) जस्टीस ए. पी.शाह
७) जावेद अखतर
८) के सी तुलसी
९) करन थापर
१०) आशुतोष
११)माजीद मेमन
१२) वंदना चव्हाण
१३) एस वाय कुरेशी (Former CEC)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी दिल्ली येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी निवडणूक प्रचाराचा व्यवसाय करणाऱ्या प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. यापूर्वी आपल्या मुंबई येथील निवासस्थानी त्यांना प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. दिल्ली येथे प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी सुमारे १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना शरद पवार यांच्या निवासस्थानी आमंत्रित करण्यात आल्याचे समजते. या बैठकीत काँग्रेस आणि भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांना आमंत्रित केले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीस आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आदी पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेसप्रणित युपीएचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिगरकाँग्रेसी पक्षांची ही बैठक बोलाविली आहे, त्यामुळे काँग्रेसला डिवचण्याचा शरद पवार प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. या बैठकीमध्ये विरोधकांच्या कथित तिसऱ्या आघाडीविषयी चर्चा होण्याचीही शक्यता आहे.