मुंबई : गेले काही दिवस सुरु असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याचा थरार अद्याप संपलेला नाही. ५ दिवसांव्यतिरिक्त ६ वा दिवस आरक्षित असून आणखीन एक दिवस खेळण्यास मिळत असला तरीही हा सामना अनिर्णीत राहून भारत आणि न्यूझीलंड हा चषक शेअर करू शकतात, असे अंदाज बांधले जात आहेत. अशी चर्चा असताना भारतीय गोलंदाजांनी किवीच्या फलंदाजांसमोर टिचून गोलंदाजी सुरु ठेवली आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी किवींची अवस्था ५ बाद १३५ अशी करून ठेवली होती. कर्णधार केन विलीयन्सन वगळता इतर सर्व महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात भारतीयांना यश मिळाले आहे.
पाचव्या दिवशी भारतीय संघ विकेट मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होता. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे दोघेही चांगली गोलंदाजी करत होते. न्यूझीलंडच्या डावातील ६३व्या षटकात मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर अनुभवी रॉस टेलरला बाद आणि केन - टेलरची भागीदारी मोडली. त्यानंतर इशांतने हेन्री निकोलस आणि शमीने बीजे वॅटलिंगला माघारी धाडत किवींचा कणा मोडला. गेले ४ दिवस पावसामुळे येणाऱ्या व्यत्ययाने वैतागलेल्या भारतीय क्रिकेटप्रेमींना अखेर गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे एक मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळाला आहे. त्यामुळे आता इथून भारतीय संघ सामना जिंकत इतिहास रचतो का? कि किवी सामना अनिर्णीत ठेवण्यात यशस्वी होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.