ठाणे : ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,येऊर टेकडीवरील पाटोणपाडा परिसरातील निलपाणी तलावात गेल्या २४ तासामध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याने ठाणे शहर हळहळले आहे.चौघेही मित्रासोबत तलावात पोहण्यासाठी गेले होते.
दरम्यान,कोरोनाकाळात तलाव- धबधब्यांवर पावसाळी पर्यटनास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असतानाही चार बळी गेल्याने प्रशासकीय दुर्लक्ष उघड झाले आहे.धबधब्यावर जाणाऱ्या या तरुणांच्या टोळक्यांना अटकाव करण्यात पोलीस आणि वनविभागासह प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे या घटनांवरून दिसत आहे.
येऊरच्या नीलपाणी तलावात रविवारी सकाळी प्रसाद पावसकर (१६) या युवकाचा बुडून मृत्यू झाला.त्यानंतर सायंकाळी राबोडीतील जुबेर सय्यद हा तरुण बुडून मृत्यूमुखी पडला.तर,सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तेजस चोरगे (१७) रा.समतानगर आणि ध्रुव कुळे (१७) रा. वर्तकनगर यांचाही याच तलावात बुडुन मृत्यु झाला.
हे सर्वजण मित्रांसोबत पावसाळी पर्यटनासाठी येऊरला गेले होते.दरम्यान,२४ तासात चार जण बुडाल्याने ठाण्यात हळहळ व्यक्त होत असुन जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाची पायमल्ली होऊनही पोलीस आणि वनविभागाकडून कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.