निसर्गातील दिव्यशक्ती प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अहर्निश प्रयत्नशील आहेत. एका विशिष्ट नियमात राहून ही आपली कर्तव्ये बजावतात. याच्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण होते आणि मानवासह पशू, पक्षी जीवजंतू, वनस्पती या सर्वांचे जगणे सुकर होते.
शं न: सूर्य उरुचक्षा उदेतु
शं नश्चतस्र: प्रदिशो भवन्तु।
शं न: पर्वता ध्रुवयो भवन्तु
शं न: सिन्धव: शमु सन्त्वाप:॥
(ऋग्वेद - ७.३५.८)
शं नो वात: पवताँ शं नस्तपतु सूर्य:।
शं न: कणिक्रदद्देव: पर्जन्योऽभि वर्षतु॥
(यजुर्वेद- ३६/१०)
अन्वयार्थ :
१) हे परमेश्वरा, ब्रह्मांडातील सर्व प्राणिसमूहांसाठी (उरूचक्षा:) सृष्टीतील सर्व पदार्थांना स्पष्टपणे प्रकाशित करणारा (सूर्य:) हा सूर्य (न:) आम्हां सर्वांसाठी (शं उदेतु) शांतपणे उगवत राहो. (चतस्र: प्रदिश:) चारही विस्तारलेल्या दिशा (न:) आम्हां सर्वांसाठी (शं भवन्तु) शांती व सुखदायक ठरोत. (ध्रुवय: पर्वता:) उंच व दृढ अशा पर्वतांच्या रांगा (न:) आम्हा सर्वांसाठी (शं भवन्तु) उपद्रवरहित, शांत असोत. (सिन्धव:) नद्यांचे प्रवाह व समुद्रांच्या लाटा (शं भवन्तु) सुखकारक ठरोत. (आप:) आड, विहिरी व तळे इत्यादींचे पाणी (शं उ सन्तु ) आम्हा सर्वांकरिता निश्चितच सुखकारक होवो.
२) भूमंडळावर विद्यमान असलेल्या सर्व देशांमध्ये राहणार्या (नः) आम्हा सर्वांकरिता (वात:) वारा (शं पवताम्) अतिशय शांततेने व आनंदाने शीतल व मंदपणे वाहत राहो. (सूर्य:) प्रकाशमान होत असलेला हा सूर्यदेखील (शं) शांतता प्रदान करीत (तपतु) अनुकूलतेने तापत राहो. (कनिक्रदत्) आकाशमार्गातून गर्जना करणारा (पर्जन्य: देव:) पर्जन्य देवदेखील (न:) आम्हा सर्वांसाठी (शं) अतिशय सुव्यवस्थित रितीने (अभिवर्षतु) चहुबाजूंनी बरसत राहो.
विवेचन
परमेश्वर हा समग्र ब्रह्मांडाचा केवळ उत्पत्तीकर्ताच नाही, तर तो सर्वांचा पालनकर्ता व क्रमानुसार संहारकर्तादेखील आहे. जन्माला आलेल्या सृष्टीतील सर्व प्राणीसमूहांना तो अजिबात वार्यावर सोडत नाही, तर त्यांची तितक्याच आस्थेवाईकपणे काळजी पण वाहतो. म्हणूनच अगदी अनादीकाळापासून या चराचर समूहातील प्रत्येक सृष्टितत्त्वांचे तो अतिशय सुव्यवस्थितपणे पालन व संगोपन करतोय. भगवंताला आपण ‘त्वमेव माता च पिता त्वमेव।’ असे म्हणण्याचे कारणच आहे की, तो आपल्या लेकरांना सर्व काही प्रदान करून अगदी सुरक्षितपणे सांभाळतो. किंबहुना जन्मदात्या माता-पित्यांपेक्षाही तो अतिशय दूरदृष्टीने व तितक्याच काळजीने सूक्ष्मातिसूक्ष्म व स्थूलातिस्थूल अशा असलेल्या मुलाबाळांचे परिपोषण करतो. ईश्वराचे मायबाप असणे हे केवळ नावापुरतेच नाही, तो तर सर्वांचा सर्वोच्च असा जन्मोजन्मीचा पालक, माता-पिता बनून सांभाळ करतो. त्यात कोणतीही कमतरता भासू देत नाही. जसे की, बाळ जन्माला येण्याअगोदरच गर्भात त्याला सुरक्षित स्थापन-संवर्धन करणे, आईच्या उदरातून बाहेर येण्याअगोदरच मातेच्या स्तनात दुधाची निर्मिती करणे, नंतर जसा-जसा तो शिशु मोठा होऊ लागेल, तसा- तसा त्याची विविध प्रकारच्या गोदुग्ध, धान्य, फळे व अन्य स्वादिष्ट पदार्थांद्वारे खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. तसेच कधी आजारी पडला तर विविध औषधी, वनस्पती अथवा सृष्टीतील माती, पाणी, अग्नी, वायू या नैसर्गिक तत्त्वांच्या आधारे त्यांवर उपचार ही करतो.
सृष्टीला संचालित करण्यासाठी त्याचे आदिज्ञान म्हणजेच वेद होय. याच ज्ञानाच्या आधारे माणसाला जगण्याचे बळ मिळते. नवनवीन शोध लावत माणूस आपली जीवनयात्रा सफल करतो. मानवाच्या बुद्धीत सत्यज्ञानाचा व सत्कर्मांचा प्रकाश पाडण्याचे कार्य ईश्वर नेहमीच करत आला आहे. कुठे चुकलेच तर त्याला सुमार्गावर आणण्याचे व दंडित करण्याचे कार्य करण्याचे कार्यही तो करतो.प्रत्येक व्यक्तीच्या रक्षण, संवर्धनाबरोबर सार्या सृष्टीच्या पर्यावरण रक्षणाचे कार्य परमेश्वर अगदीच उत्तम पद्धतीने करतोय. त्याच्या अधिपत्याखाली असलेले पृथ्वी, द्युलोक, अंतरिक्ष, सूर्य, चंद्र, वायू, जल, अग्नी आकाश ही सारी तत्त्वेदेखील अगदी नियमितपणे कार्यरत आहेत. निसर्गातील या दिव्यशक्ती प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अहर्निश प्रयत्नशील आहेत. एका विशिष्ट नियमात राहून ही आपली कर्तव्ये बजावतात. याच्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण होते आणि मानवासह पशू, पक्षी जीवजंतू, वनस्पती या सर्वांचे जगणे सुकर होते. माणूस मात्र आपल्या शुद्र स्वार्थापोटी निसर्गनियमांचे उल्लंघन करीत आहे. सृष्टीतील नद्या, झाडे, भूमी, पर्वत, हवा यांच्यावर अतिक्रमण करून स्वतःच्या भौतिक सुख, सुविधा वाढविण्याकरिता प्रयत्न करतो. आपल्या सुखासीन जगण्याच्या हव्यासापोटी माणूस निसर्गाची पर्वा करीत नाही. कदाचित याच कारणांमुळे प्रदूषणाचा भस्मासुर या भूमंडळाला दुःखसागरात घेऊन जातो आहे.
वेदांनी पर्यावरणाच्या रक्षणावर भर दिला आहे. मानवासह सर्व प्राणी व एकूणच जड- चेतन तत्त्वांचे जीवनयापन सुसह्य व्हावे, म्हणून चारही वेदांतील विविध मंत्रांत मौलिक उपदेश केला आहे. सृष्टीतील भूमी, वायू, जल, अग्नी, सूर्य, चंद्र, पर्जन्य, पर्वत, नद्या, वनस्पती, पशू इत्यादी तत्त्वांचे संचालन अतिशय उत्कृष्ट व्हावे, याकरिता वेगवेगळ्या माध्यमाने प्रबोधन केले आहे. वैदिक शांतिपाठात द्युलोक, पृथ्वी जल, औषधी, वनस्पती तसेच समग्र विश्वात शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी कामना केली आहे. प्रदूषण निवारण्याकरिता विविध प्रकारच्या यज्ञांची संकल्पनादेखील मांडली आहे. ऋग्वेदाचा ‘अग्निमिळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्।’ हा पहिलाच मंत्र अग्नीची उपासना करण्यास प्रेरित करतो. यज्ञाच्या विशुद्ध प्रक्रियेमुळे वायुप्रदूषण नष्ट होऊन नैसर्गिक आरोग्य अबाधित होऊ शकते. त्याबरोबरच ऋतुचक्रदेखील सुव्यवस्थित होतात. यात शंका नाही. शांतिकरण प्रकरणांमध्ये तर निसर्गातील प्रत्येक तत्त्वांच्या सुव्यवस्थेचे आणि सम्यक गतीचे वर्णन आले आहे.
वरील दोन मंत्रांतील आशयदेखील पर्यावरणरक्षणाचा दिव्य संदेश प्रदान करणारे आहेत. पहिल्या मंत्रात म्हटले आहे - सृष्टीचा आधारभूत घटक असलेला सूर्य आम्हा सर्वांसाठी कल्याणकारक ठरो. त्याचा प्रकाश, ऊर्जा, तेज, दाहकता या सर्व गोष्टींमध्ये समतोल असावा. अधिक प्रमाणात उष्णता वाढली, तर त्याचा परिणाम उष्माघात, अनावृष्टी, रोगराई यांसारख्या भयंकर बाबी वाढण्यात होतो. कमी प्रमाणात उष्णता असेल, तर त्यामुळे पण लाभ होत नाहीत. यासाठी सूर्याने संतुलित राहून जीवसृष्टीला नवजीवन प्रदान करावे. ना कमी ना अधिक! प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी दिशांचेही तितकेच महत्त्व आहे. तसे पाहिले तर कोणतीही दिशा अमंगल कदापि नाही. अथर्ववेदात म्हटले आहे- सर्वा आशा मम मित्रं भवन्तु। सर्वच दिशा या सुदिशा ठराव्यात. त्या आमच्या मित्र बनाव्यात. सर्व दिशांकडून जीवांना सुखांचा वर्षाव व्हावा. कोणत्याच दिशेकडून भीतीचे प्रसंग येऊ नयेत. त्याचबरोबर भूमीवर स्थिर व दृढपणे उभ्या असलेल्या पर्वतांच्या रांगा आमच्याकरिता सुखदायक ठराव्यात. पर्वत डळमळीत होऊ नयेत. भूकंप इत्यादी नैसर्गिक आपदा उद्भवू नयेत. तसेच नद्या, तळी, विहिरी आड किंवा प्रचलित कूपनलिका इत्यादींपासून मिळणारे पाणी हे आरोग्यासाठी निर्मळ, शुद्ध व मधुर असावे. दूषित पाण्यामुळे नाना प्रकारचे आजार उद्भवतात. यासाठीच वेदांनी समुद्रापासून ते नद्यांपर्यंतचे पाणी हे अमृतासमान असावे, असा दिव्य संदेश अगदी सृष्टीच्या आदीकाळीच दिला आहे. कधीही अतिवृष्टी किंवा अनावृष्टी ओढवू नये. यामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवून माणसांचे जीवन दुःखदायक ठरू शकते, अशी सद्भावनापूर्ण काळजी वेदांनी वाहिली आहे.
दुसर्या मंत्रातूनदेखील पर्यावरण चिंतनाचा उपदेश मिळतो. वायू हा सृष्टीजीवनाचा महत्त्वाचा घटक होय. हवा किंवा वार्याविना निसर्गात गतीच होऊ शकत नाही. पण, वार्याची ही गती संहारक असता कामा नये. सर्व ऋतूंमधील वारा हा सार्या भूमंडळासाठी सुखकारक ठरो. जीवांना विचारण्याकरिता आवश्यक तितक्या प्रमाणात शीत-उष्ण या दोन्ही गोष्टींचे संमिश्रण असलेला समीर सर्वांना आरोग्य प्रदान करणारा असावा. वादळी वारा सारे काही उद्ध्वस्त करतो. पाहता पाहता जीवसृष्टी संपुष्टात येते. वार्याने संयमितपणे वाहण्याचे कार्य केले, तर सर्व कार्यव्यवहार सुरळीतपणे चालतात. त्याचबरोबर सूर्यानेदेखील आपल्या मर्यादेत राहूनच तप्त व्हावे. यानंतर पर्जन्यदेवता हीदेखील योग्य त्या प्रमाणात सकळ भूमंडळावर वर्षत राहावी. देशोदेशी आवश्यक त्या प्रमाणात व ऋतू अनुकूल वृष्टी होत राहावी. यामुळे मानवासह पशु-पक्षी, वनस्पतींच्या जगण्याला नवे बळ मिळते. त्याचबरोबर शेती व्यवसायदेखील चांगल्या प्रकारे होतो. काहीच पाऊस न पडल्याने पिण्याच्या पाण्याची व अन्नधान्याची समस्या भेडसावू लागते, तर अत्यधिक पाऊस झाल्याने पिकांचेही नुकसान होते. म्हणूनच ‘पर्जन्य: शम् अभिवर्षतु।’ पर्जन्यदेवतेने आपल्या विशिष्ट सीमारेषेत राहूनच जलवृष्टी करावी.वैदिक पर्यावरणाचा हा कितीतरी महान व मौलिक संदेश सध्याच्या व्यवस्थेने अंगीकारला, तर निश्चितच सारे भूमंडळ सुखी, समृद्ध व आनंदयुक्त होणार, हे निश्चित!
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य