ऐसी हे समर्थपदवी!

    02-Jun-2021
Total Views | 88

smarath_1  H x


हिंदू संस्कृतीवरील आक्रमण रोखून लोकांना संस्कृतीरक्षणासाठी तयार करणे, हिंदवी स्वराज्यासाठी लोकांना अनुकूल करून घेणे, लोकांच्या मनात रामराज्याची प्रेरणा निर्माण करणे, लोकांना धीर धरा, असे सांगून म्लेंच्छांच्या धाडीची भीती घालवणे, बलोपासनेचे धडे देऊन लोकांमध्ये धैर्य उत्पन्न करणे, लोकांना खरे अध्यात्म व भक्तिरहस्य सांगून त्यांना दांभिक गोसाव्यांपासून सोडवणे, हिंदूंमधील दैवतांचा गल्बला बाजूला सारून लोकांना रामोपासनेला आणि हनुमानाच्या उपासनेला लावणे, अशी अनेक समाजोपयोगी आत्मोद्धाराची कामे स्वत: सूत्रधार होऊन त्यांनी समर्थपणे चालवली. म्हणून लोक स्वामींना ‘समर्थ’ म्हणू लागले.


जांब या गावात सूर्याजीपंत व रेणुकाबाई उर्फ राणूबाई हे आदर्श जोडपे राहत होते. धार्मिकवृत्तीच्या राणूबाईंनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान सूर्यनारायणाची उपासना केली. उपासना चालू असताना या धमर्र्शील पतिव्रतेने गंगेलाही नवस केला होता. त्यामुळे पहिला पुत्र झाल्यावर तो गंगेच्या नवसाचे एक फळ म्हणून कृतज्ञतापूर्वक त्याचे नाव ‘गंगाधर’ असे ठेवले. त्या पाठोपाठ दुसरा पुत्र चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमीला मध्याह्नीला झाला, तो सूर्यनारायणाच्या कृपेने झाला. म्हणून त्याचे नाव ‘नारायण’ ठेवण्यात आले. या नारायणालाच आपण ‘रामदासस्वामी’ म्हणून ओळखतो. स्वामींच्या शिष्यांनी समर्थचरित्रात रामदासांच्या बालपणीच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. रामदासांना लहानपणी घरचे ‘नारोबा’ म्हणत असावेत. त्यावरून लहान रामदास सर्वांचे लाडके होते, असे अनुमान काढता येते. नारोबा १२ वर्षे जांबला घरी व त्या परिसरात राहिले. प्रत्यक्ष रामरायाकडून आपल्याला अनुग्रह मिळावा, असा ध्यास त्यांनी घेतला होता. एक दिवस निमित्त साधून नारोबा जांबहून पळाले, ते त्यांनी नाशिक हे तीर्थक्षेत्र गाठले आणि रामरायाच्या उपासनेला आरंभ केला. येथे त्यांनी बद्ध अवस्था संपून मुमुक्षू अवस्थेला सुरूवात केली. रामरायाला सर्वस्व मानून त्यांनी सर्वकाही जांबलाच सोडून दिले होते. मागे वळून त्यांनी पाहिले नाही. कारण, रामाचे सख्यत्व त्यांना हवे होते.
देवाच्या सख्यत्त्वासाठी। पडाव्या जिवलगासी तुटी।
सर्व अर्पावे शेवटी।प्राण तोही वेंचावा ॥ (दा. ४.८.८)

रामरायाला मिळवण्यासाठी जवळच्या जिव्हाळ्याच्या नातलगांची ताटातूट सहन करावी लागते. इतकेच काय, पण प्राणही द्यायला तयार झाले पाहिजे. म्हणजे बद्धावस्था संपते, या प्रक्रियेत काही हातचे राखून चालत नाही. त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. पूर्वीचे सर्वस्व विसरून अनन्य भक्तिभावाने स्वामींनी नाशिकला रामरायाची उपासना आरंभली. गोदावरीच्या पाण्यात उभे राहून गायत्री पुरश्चरण व रामनामाचा जप केला. मुक्कामाला ते जवळच्या टाकळीला एका लहान गुहेत जात. तेथे घनदाट अरण्य होते. येथून स्वामींची साधकदशा सुरू झाली. या लहान मुलाचे हे धाडस पाहून लोक आश्चर्यचकित होत. साधकदशेत लोकनिंदा सहन करावी लागते. ती रामदासांनी लहानवयात सहन केली. नाशिकला १२ वर्षे तप:साधना, पुरश्चरण, रामनामाचा जप अनन्यभावे करुन प्रत्यक्ष रामरायाकडून अनुग्रह घेतला. येथे साधकाचा ‘सिद्ध’ झाला. रामाचा साक्षात्कार होणे ही काही सामान्य गोष्ट नव्हती. त्यासाठी अनेक वर्षे साधना करावी लागते. रामरायाचे दर्शन, त्याचा साक्षात्कार हा विवेकी अंत:करणाने पचवता आला पाहिजे. ‘परमार्थाचा मला साक्षात्कार झाला,’ याचा यत्किंचिंतही गर्व करुन चालत नाही, ही अहंकाराची भावना उत्पन्न होऊ नये म्हणून स्वामी स्वत:ला ‘रामाचा सेवक’, ‘रामाचा दास’ म्हणवून घेऊ लागले. अशा रीतीने नारायणाचा, नारोबाचा ‘रामदास’ झाला. नंतर रामाच्या आज्ञेवरुन स्वामींनी १२ वर्षे पायी फिरुन तीर्थाटनाच्या निमित्ताने सारा हिंदुस्थान पायाखाली घातला.



जेथे जातील तेथे योग्य माणसांची निवड करुन त्यांच्याकडे हिंदू धर्मसंस्कृती रक्षणाचे काम सोपवून स्वामी पुढे जात. तप:साधनेचे तेज, मधुर भाषा निरपेक्षवृत्ती, प्रेमादराची वागणूक या गुणांनी लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. महंतांची, सज्जनांची संघटना उभारत स्वामींची भ्रमंती चालू होती. या तीर्थाटन काळात विविध प्रांतांतले लोक त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखत. त्यापैकी काही नावे अशी होती - ‘भक्त’, ‘महंत’, ‘बंदे’, ‘फकिर’, ‘जयवंत’, ‘सज्जन’ इत्यादी. नारायण-नारोबा-रामदास-स्वामी वरील नावे असा बदल होत गेला. देशभ्रमंतीच्या काळात स्वामींनी संपूर्ण देशाची अवस्था पाहिली. सामाजिक आचार-विचार, राजकीय घडामोडी त्यातून उद्भवलेले अत्याचार, मंदिरे व त्यातील मूर्तींची तोडफोड, विध्वंस, धार्मिक अवनती, दांभिकता, भोंदू साधू या सार्‍यांचे सूक्ष्मावलोकन स्वामींनी केले. म्लेंच्छांची दहशत हिंदू समाजाचे सांस्कृतिक अध:पतन हे सारे पाहून स्वामींना वाईट वाटे. मनाशी एक निश्चय करुन ते परतले. नाशिकला जाऊन रामरायाचे दर्शन घेतले आणि नियोजित कार्यासाठी कृष्णाकाठी निघून गेले. तेथील लोकांना दीक्षा देत आपल्या कार्यासाठी तयार करू लागले. हनुमानाची मंदिरे स्थापून बलोपासना वाढवू लागले. त्यावेळीही ते रामदासस्वामीच होते. ‘ब्राह्मण मंडळ्या’, ‘भक्त मंडळ्या’ मिळवू लागले. रामदासांनी केलेल्या कामाचा व्याप पाहा. हिंदू संस्कृतीवरील आक्रमण रोखून लोकांना संस्कृतीरक्षणासाठी तयार करणे, हिंदवी स्वराज्यासाठी लोकांना अनुकूल करून घेणे, लोकांच्या मनात रामराज्याची प्रेरणा निर्माण करणे, लोकांना धीर धरा, असे सांगून म्लेंच्छांच्या धाडीची भीती घालवणे, बलोपासनेचे धडे देऊन लोकांमध्ये धैर्य उत्पन्न करणे, लोकांना खरे अध्यात्म व भक्तिरहस्य सांगून त्यांना दांभिक गोसाव्यांपासून सोडवणे, हिंदूंमधील दैवतांचा गल्बला बाजूला सारून लोकांना रामोपासनेला आणि हनुमानाच्या उपासनेला लावणे, अशी अनेक समाजोपयोगी आत्मोद्धाराची कामे स्वत: सूत्रधार होऊन त्यांनी समर्थपणे चालवली. म्हणून लोक स्वामींना ‘समर्थ’ म्हणू लागले. तथापि स्वामींच्या मते, समर्थ म्हणजे प्रभू रामचंद्र. दासबोधाची रचना समर्थकृपेमुळे म्हणजे रामकृपेने झाली, असे स्वामी दासबोधाच्या अखेरीस सांगतात.
भक्ताचेनि साभिमाने। कृपा केली दाशरथीने।
समर्थकृपेची वचने। तो हा दासबोध॥ (२०.१०.३०)
असे असले तरी स्वामींचे भक्त मात्र रामदासांनाच ‘समर्थ’ म्हणतात. ही ‘समर्थ’ पदवी कोणाला द्यावी, या संबंधी शंकरराव देव यांनी दासबोधाच्या प्रस्तावनेत केलेले विवेचन मोठे मार्मिक आहे. देव म्हणतात, “ते सर्वात वडील म्हणून समर्थ, कोणी म्हणतात की, ते भिक्षेला निघाले म्हणजे ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा रघुवीरांचा जयजयकार करीत म्हणून ते समर्थ. अनेकांचे अनेक तर्फ आहेत, पण असे तर्क करण्याचे कारण नाही. ‘समर्थ’ पदवी कोणाला प्राप्त होते, हे रामदासांनीच दासबोधात सांगून ठेवले आहे. ‘समर्थ’ शब्दांची उपपत्ती त्यांनीच दिलेली असल्यावर निराळी उपपत्ती बसवण्याचा आपणांस काय अधिकार आहे!
बहुत जनासि चालवी। नाना मंडळे हालवी।
ऐसी हे समर्थ पदवी। विवेके होते॥ (दा.१८.१०.४६)
जो समाजाच्या सुखदु:खाची सूत्रे आपल्या हाती घेतो व सार्‍या समाजाला चालवतो, कार्यासाठी प्रवृत्त करतो, त्यांना सन्मार्गाला आणून सोडतो तो समर्थ! समर्थ पदवी त्याला मिळते.
ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या। भक्तमंडळ्या मानाव्या।
संतंमंडळ्या शोधाव्या। भूमंडळी॥ (९.६.१४)
या उपदेशाप्रमाणे आपण स्वत:कृती केली म्हणून रामदासांना ‘समर्थ’ म्हणत, असे अनुमान काढणे अपरिहार्य आहे. असे वाटते.”

(दासबोध प्रस्तावना)
शंकरराव देवांनी केलेले वरील विवेचन योग्य आहे. समर्थ नुसता उपदेश करत फिरत नसत, तर स्वत: कृती करुन चळवळ उभी करत. त्यांनी उभी केलेली चळवळ पूर्णत: त्यांच्या नियंत्रणाखाली असे, त्याला भगवंताचे अधिष्ठान असे. त्यामुळे लोक सन्मार्गापासून ढळत नसत.
सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करीला तयाचे॥
परंतु येथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ (२०.४.२६)
त्यांच्या चळवळीने सर्वसामान्य लोकांना त्रास होत नसे, म्हणून रामदासस्वामी समर्थ पदवीला योग्य आहेत.
- सुरेश जाखडी
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121