लहानपणापासूनच तंत्रज्ञान आणि संगीताची आवड असल्याने मोठेपणी हेच क्षेत्र त्याच्या आयुष्याचे सोबती बनले. कोरोना काळात ‘ऑनलाईन’ तंत्रज्ञानाच्या साह्याने देश-परदेशातील अनेकांचा ‘डिजिटल सारथी’ बनलेल्या याच्याविषयी...
सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये कार्यक्रम, बैठका या सगळ्या गोष्टी ऑनलाईनच पार पडतात. गेले दीड वर्ष हे ऑनलाईनचे गणित सांभाळताना अनेकांना अडचणी आल्या, काहींसाठी तर हे माध्यम पूर्णपणे नवीन होते, अशा अनेकांना तांत्रिक साहाय्याच्या माध्यमातून मदत करून ‘डिजिटल सारथी’ ठरलाय ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीचा आदित्य बिवलकर. ‘मीडिया हब’ या त्याच्या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था आणि व्यावसायिकांना त्याने तांत्रिक मदत तर केलीच किंबहुना, ‘लॉकडाऊन’च्या काळात देशासह जगभरातल्या लोकांना त्याने सहकार्य केले आहे.
आदित्य बिवलकर मूळचा डोंबिवलीकर. स. वा. जोशी विद्यालयात प्राथमिक शिक्षण, तर मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयातून त्याने ‘बीएमएम’ची पदवी घेतली. त्यानंतर काही काळ पत्रकारिताही केल्यानंतर संगीत क्षेत्रात सक्रिय असल्याने सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्याचबरोबर व्यवस्थापन करणे, यासाठी त्याने ‘रघुलीला’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभरात केले आहे. याच्याच जोडीला सामाजिक संस्था तसेच व्यवस्थापनांना तंत्रज्ञानाशी जोडण्याचा त्याचा प्रयत्न सुरूच आहे.कला शाखेतली पदवी असली, तरीही तंत्रज्ञानाची आवड, त्याबाबतची माहिती ही त्याने लहानपणापासूनच जोपासली होती, त्याचा त्याला ‘कोविड’काळात फायदा झाला. तंत्रज्ञानाची आवड असल्याने त्याने विविध सॉफ्टवेअर्स, डिजिटल मीडिया त्यासंबंधित विषय यांचे ज्ञान संपादित केले. बर्याच चांगल्या संस्था चांगले काम करूनसुद्धा लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचत नाहीत. त्यामुळे त्यांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून आदित्य करत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सांगीतिक मैफली, विविध कार्यक्रम तसेच उपक्रम बंद पडले. या काळात सामाजिक संस्था किंवा संघटनांना आपल्या सदस्यांच्या संपर्कात राहणेपण कठीण होत होते. त्यावेळी या संस्थांच्या मदतीला आदित्य धावून गेला. ‘फोटोग्राफी’, ‘व्हिडिओग्राफी’, संकलन, ‘वेब डेव्हलपमेंट’, तांत्रिक संयोजन, ‘ब्रॅण्डिंग’ अशा अनेक जबाबदार्या त्याने विविध संस्थांसाठी पार पाडल्या. ‘ऑफलाईन ते ऑनलाईन’ हे स्थित्यंतर अनेकांना अवघड होते, त्यावेळी लोकांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना सहकार्य करण्याचे मोलाचे काम आदित्य करीत आहे.सांगीतिक मैफली उत्तम तंत्रज्ञानाने ‘ऑनलाईन’ कशा सादर होतील, हा विचार त्याने कलाकारांसोबत मांडला आणि त्यातूनच चक्क तिकीटदर लावून ‘ऑनलाईन’ कार्यक्रम सादर होऊ लागलेत. अशा अनेक कार्यक्रमांच्या संयोजन आणि संकलनाची जबाबदारी आदित्यने स्वीकारली आहे. हे कार्यक्रम सादर होत असताना तांत्रिक बाजू कशी सक्षम राहील हे आव्हान होते, ते उत्तम प्रकारे त्याने सांभाळले.
याचदरम्यान, बर्याच संस्थांना चांगले काम करूनदेखील लोकांसमोर पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे आदित्यच्या लक्षात आले. संस्थांना ‘बेसिक टेक्नोलॉजी’ची माहिती देऊन त्यांची कामं चालू राहतील, यासाठी त्याचा प्रयत्न होता. त्याचबरोबर ‘ऑनलाईन’ कार्यक्रम कसे सादर करावेत, लोकांनी ‘ऑनलाईन’ येताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि त्यात नेमके कोणते तंत्रज्ञान लागते याची माहिती त्याने पूर्ण आत्मसात केली आणि आजच्या घडीला विविध संस्थांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आदित्य मदत करत आहे. ‘कोविड’काळात जवळपास 150 उपक्रमांसाठी त्याने तांत्रिक साहाय्य केले असून, केवळ मुंबई, ठाणेच नाही तर जगभरातल्या संस्थांचा यामध्ये समावेश आहे. ‘महाराष्ट्र मंडळ, बंगळुरू’, ‘कल्लोळ एंटरटेन्मेंट, शिकागो’, ‘ग्रीनव्हील महाराष्ट्र मंडळ, अमेरिका’, ‘लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले’, ‘ज्ञानप्रबोधिनी, आंबेजोगाई’ यांसारख्या संस्थांचा यामध्ये समावेश आहे.अमेरिकेतील कार्यक्रमाची यंत्रणा भारतात बसून हाताळत तेथील कार्यक्रम यशस्वी केल्याचे आदित्य अभिमानाने सांगतो. विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असलेल्या आदित्यने, कोरोनाकाळात कलाकारांना आणि गरजू लोकांना योग्य ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला, शिवाय विविध माध्यमांतून कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे तो सांगतो.
लाईव्ह जाताना कोणत्या साधनांचा वापर करावा, त्या त्यावेळीच्या कार्यक्रमाचे स्वरूप बघून कोणते तंत्रज्ञान वापरावे, त्यात लोकांचा प्रत्यक्ष सहभाग कसा होईल, याकडेसुद्धा लक्ष दिल्याचे आदित्य सांगतो. बर्याचदा संस्थांना या कामांमध्ये फसवणुकीचे अनुभव येतात. त्यामुळे माध्यमांपासून अनेक संस्था लांब असतात. त्यांना याचे महत्त्व समजावून त्यांना तंत्रज्ञानाकडे वळवण्याचे कामही आदित्य करीत आहे.या क्षेत्राची माहिती खरं तर अनेकांना नाही, ‘कोविड’काळात सगळं ठप्प झाल्यानंतर संस्थांना मदतीसाठी हा पर्याय स्वीकारला असल्याचे आदित्य सांगतो. “विशेष म्हणजे, संपूर्ण मुंबईमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक या क्षेत्रात कार्यरत आहेत. एखादी गोष्ट लाईव्ह करायची म्हटले, तर इंटरनेटची गरज भासतेच. हा मोठा अडथळाच असतो, इंटरनेटचा स्पीड, व्हिडिओची क्वालिटी या घटकांचा विचार करून योग्य पद्धतीने संयोजन करावे लागते. त्यामुळे हे काम थोडेसे आव्हानात्मक ठरते. याशिवाय बर्याचदा ‘प्रीरेकॉर्डेड’ कार्यक्रमांचेसुद्धा ‘स्ट्रीमिंग’ करावे लागते, त्यादृष्टीने ‘पेमेंट गेटवे’ आणि इतर गोष्टींचे नियोजन करून मगच कार्यक्रम लाईव्ह केला जातो,” असं आदित्य सांगतो.
सध्या ‘डीजी टेक्नोलॉजी’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून तंत्रज्ञानासंबंधी वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आदित्य फेसबुकवर शेअर करत असतो. सोप्या भाषेत अधिकाधिक लोकांना तंत्रज्ञान समजावे, या हेतूने हा उपक्रम राबवत असल्याचे तो सांगतो. सामान्यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, तसेच सार्यांनीच ‘डिजिटल’ माध्यमाचा स्वीकार करावा, हा त्याचा प्रयत्न आहे. यासाठी तो विविध कार्यशाळांच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. ‘डिजिटल सारथी’ बनून आदित्य अनेकांना मदत करत असून भविष्यात सामाजिक संस्था, कलाकार आणि अप्रकाशित लोकांना प्रकाशझोतात आणण्याचे, त्यांना सोशल मीडियाशी जोडण्याचे आणि तंत्रज्ञानाबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांसमोर पोहोचावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे आदित्य सांगतो. त्याच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!