हवेतील सुरक्षा हवेतच?

    02-Jun-2021   
Total Views | 64

aviation_1  H x



आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय प्रवासाचा जो काही ‘क्लास’ असायला हवा, त्याबद्दल चिंता व्यक्त करणारी गोष्ट उघडकीस आली आहे. अमेरिकेत प्रवाशांच्या गैरवर्तणुकीचे प्रकार उघडकीस येण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या काही काळातील घटनांची आकडेवारी धक्कादायक मानली जात आहे.



कोरोनाकाळात आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आणण्यात आले. काही देशांनी अद्याप नव्या कोरोना ‘स्ट्रेन’च्या भीतीने ते कायमही ठेवले आहेत. अनेक देशांच्या सीमा आजही बंदच ठेवण्यात आल्या आहेत. देशांतर्गत विमानसेवाही कूर्म गतीनेच सुरू आहे. अर्थात, या सर्व बाबींमुळे उत्पन्नवाढीचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय प्रवासाचा जो काही ‘क्लास’ असायला हवा, त्याबद्दल चिंता व्यक्त करणारी गोष्ट उघडकीस आली आहे. अमेरिकेत प्रवाशांच्या गैरवर्तणुकीचे प्रकार उघडकीस येण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या काही काळातील घटनांची आकडेवारी धक्कादायक मानली जात आहे.

‘फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’तर्फे जानेवारीनंतर आतापर्यंतच प्रवाशांद्वारे केल्या जाणार्‍या गैरवर्तनाबद्दलच्या एकूण २,५०० प्रकारांची नोंद आहे. वर्षभरातील हा आकडा दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे. कारण, हा सभ्य संस्कृती समजल्या जाणार्‍या अमेरिकेतील आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, कोरोनाकाळात हवाई प्रवासात निर्बंध असतानाचा आहे. केवळ विमानात मास्क न वापरण्याच्या १,९०० घटना नोंदवण्यात आल्या आहेत. भारतातही असे प्रकार काही नवे नाहीत. कारण, मे २०२१ रोजी अखेरच्या आठवड्यात एका जोडप्याने केलेला प्रताप पाहायला मिळाला होता. काय तर म्हणे पृथ्वीवर ‘लॉकडाऊन’ आहे म्हणून आम्ही विमानात येऊन लग्न केलं! या विमानात एकूण १६१ प्रवासी होते. कॉमेडियन कुणाल कामराचे प्रकरण आठवत असेल, तर लक्षात येईल की, ज्या प्रकारे त्याने ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णव गोस्वामी यांचा विनापरवाना व्हिडिओ तयार केला होता, त्यानंतर त्याच्यावर सहा महिन्यांची विमानप्रवास बंदी आणण्यात आली होती.

दुसरीकडे अमेरिकेतील दोन प्रमुख विमान कंपन्यांनी मद्य वितरण बंद केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांनी अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत ही प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे दखल घेणे गरजेचेे वाटले. अमेरिकेतील ‘साऊथ वेस्ट एअरलाईन्स’मध्ये या रविवारीच एक प्रसंग घडला. एका महिलेने ‘फ्लाईट अटेन्डंट’च्या नाकावर मुक्का मारला. हा मार इतका जबर होता की, त्या अटेन्डंटचे दोन दात तुटले. या महिलेवर आजीवन विमानप्रवासाची बंदी घातली गेली.आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरक्षा हा मुद्दा या सर्व प्रकरणांमुळे अधोरेखित होतो. बर्‍याचदा काही खासगी व्हिडिओ विमानात बसलेल्या प्रवाशांद्वारे व्हायरल केले जातात. अनेकदा विमान प्रवासातील हाणामारीचे प्रसंग अनेकदा जीवावर बेतू लागतात. मे २०२१ मध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. रशियाच्या शेजारील देश असलेला बेलारूसला ‘व्हाईट रशिया’ असेही संबोधले जाते. हा देश तसा आकारमानानेही मोठा मानला जातो. साधारणतः दोन लाख स्केव्हर किमी इतकी त्याची व्याप्ती आहे. १९९१पासून हा देश रशियापासून वेगळा झाला. तेव्हापासून या देशाची अ‍ॅलेझॅन्डर लुकाशेनको याने सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून हा तिथला राज्यकर्ता बनला तो अद्याप कायम आहे. हुकूमशाह या शब्दाला साजेसा, असाच त्याचा व्यवहार.

विमानप्रवासाबद्दलच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये या अ‍ॅलेझॅन्डर हा कमालीचा धूर्त निघाला. विमान प्रवास करणार्‍या रोमन प्रोटेसेविच (वय २७) या पत्रकाराला हवाई प्रवासातच अटक केली. कारण काय तर या पत्रकाराने देशाच्या बाहेर जाऊन विरोधात सोशल मीडियामध्ये वक्तव्य केले होते. केवळ २७ वर्षे वय असलेल्या या पत्रकाराला अ‍ॅलेझॅन्डरने विमानातूनच ताब्यात घेतले. हा प्रकारही मोठा नाट्यमय होता. प्रोटेसेविच त्याच्या प्रेयसीसोबत अथेन्सहून लिथोनियात विमानाने जात होता. लिथोनिया हा बेलोरशियाच्या बाजूला असलेला छोटासा देश. ‘रायन एअरलाईन’च्या ‘४९७९' या विमानाने तो निघाला होता. जेव्हा हे विमान बेलोरशियाच्या हवाई हद्दीत आले, तेव्हा बेलोरशियाच्या ‘फ्लाईट कंट्रोलर’ने पायलटला सांगितले की, “आम्हाला दाट माहिती मिळाली आहे की, तुमच्या विमानात बॉम्ब आहे. तेव्हा ताबडतोब तुम्ही विमान उतरवा.” आंतरराष्ट्रीय शिकागो कन्व्हेन्शन नियमानुसार, असा संदेश मिळाल्यानंतर विमान हे खाली उतरावेच लागते. बेलोरशियाच्या राजधानीत विमान उतरलं आणि विमानात थेट सैनिक घुसले प्रोटेसेविच आणि त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले. खरेतर बॉम्ब असल्याची अफवाच होती. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करत असताना अशा घटना आणि प्रवाशांची त्यावेळेस झालेली हतबलता म्हणूनच चिंताजनक आहे.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121