पुणे : राज्यभरात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. शनिवार आणि रविवारी पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीला चाप लावण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केली. पुण्यात शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अजित पवार यांनी आज पुण्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी सर्व बंद राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात येईल. ग्रामीण भागातही हे नियम लागू राहणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाईल, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.अनेक लोक अजूनही गांभीर्याने घेत नाही. कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. अत्यंत महत्त्वाची कामं असतील तरच बाहेर जा. काही लोकं तर पुण्याच्या बाहेर जात आहेत.पुण्याच्या बाहेर जाणाऱ्यांना पुण्यात आल्यावर १५ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी महाबळेश्वर, खोपोली, लोणावळा आणि खंडाळ्यात गर्दी करायला सुरुवात केली आहे. नागरिकांनी पर्यटन स्थळी येऊन गर्दी करू नये. पावसात भिजू नये. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्व काही बंद असताना तुम्ही घराबाहेर पडण्याचेकारणच नाही. तरुण पिढी नाराज होण्याची शक्यता आहे. पण अमेरिकेत शंभर टक्के लसीकरण झालेलं असतानाही तिथे तिसरी लाट आली. आपल्याकडे अजूनही लसीकरण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जनतेच्या जिवीताची खबरदारी घेणे हे आमचे कामच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.