केंद्र सरकारकडून मार्गदर्शन सूचना जारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती
नवी दिल्ली : कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, येत्या सोमवार, दि. २१ जूनपासून ही लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. १८ जून रोजी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे ‘कोविड -१९ फ्रंटलाइन वर्कर्स’साठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली. २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा ‘क्रॅश कोर्स प्रोग्राम’ सुरु करण्यात आला आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकतामंत्री महेंद्र नाथ पांडे यावेळी उपस्थित होते.
“देशाची वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य क्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील ‘कोरोना योद्ध्यां’साठी ’क्रॅश कोर्स’ची निर्मिती करण्यात आली असून त्या माध्यमातून एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार येणार आहे. केंद्र सरकारने सुरु केलेला हा ‘क्रॅश कोर्स’ २६ राज्यांतील १११ केंद्राच्या माध्यमातून अंमलात आणण्यात येणार आहे. देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी या ‘क्रॅश कोर्स’ची मागणी केली होती. त्यामुळे देशातील सर्वोत्तम तज्ज्ञांच्या साहाय्याने केंद्र सरकारने हा ‘क्रॅश कोर्स’ तयार केला आहे. त्या माध्यमातून दोन ते तीन महिन्यांत एक लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या ‘क्रॅश कोर्स’मध्ये सहा प्रकारचे विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्राला एक नवीन ऊर्जा मिळणार असून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशातील युवकांना ‘स्किलिंग’, ‘रिस्किलिंग’ आणि ‘अपस्किलिंग’चा मंत्र दिला. ‘स्किलिंग’, ‘रिस्किलिंग’ आणि ‘अपस्किलिंग’ची गरज लक्षात घेता या आधीच केंद्र सरकारने केंद्रीय कौशल्य मंत्रालयाची स्थापना केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यावेळी त्यानुसार बदल होणे आवश्यक असल्याचे सांगत ’अपस्किलिंग’ ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यासाठी देशात ‘स्किल इंडिया मिशन’ सुरु केले, तसेच ‘आयटीआय’च्या संख्येतही वाढ केल्याचे पंतप्रधान म्हणाले.
“आगामी काळात देशभरातील एक लाखांहून अधिक ‘कोविड वॉरियर्स’नी कौशल्यपूर्ण बनवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. ‘कोविड योद्ध्यां’ना ‘होम केअर सपोर्ट’, ‘बेसिक केअर सपोर्ट’, ‘अॅडव्हान्स केअर सपोर्ट’, ‘इमर्जन्सी केअर सपोर्ट’ नोकरीच्या क्षेत्रांसाठी प्रशिक्षण दिले जाईल. केंद्रीय कौशल विकास योजना ३.० अंतर्गत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून या योजनेसाठी एकूण रु. २७६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे,” असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
प्रोटोकॉल’चे पालन करावे लागेल
“देशातील प्रत्येक नागरिकाला लोकांना मोफत लस देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, आपल्याला कोरोना संदर्भातील ‘प्रोटोकॉल’चे पालन करावे लागेल. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये कोरोना विषाणूचे वारंवार बदलणार्या रुपामुळे कोणती आव्हाने येऊ शकतात हे आपण पाहिले आहे. हा विषाणू अजूनही आपल्या आजूबाजूला आहे आणि त्यात बदल होण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक उपचार पद्धती आणि प्रत्येक शक्यतांसह आपल्याला आपली तयारी अधिक वाढवावी लागेल. या साथीने वारंवार जगाची, प्रत्येक देशाची, संस्थाची, समाजाची, कुटुंबातील माणसांच्या मर्यादांची परीक्षा घेतली आहे. त्यामुळे आता ४५ वर्षांवरील पुढील वयोगटाप्रमाणे १८ वर्षांवरील नागरिकांनादेखील मोफत लस मिळणार आहे,” असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.