दिल्ली - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोविड-19 फ्रंटलाइन वर्कर्ससाठी क्रॅश कोर्स सुरू केला. पीएम मोदी यांनी २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून १ लाख योद्धा तयार होणार असून त्यांना रोजगार मिळणार आहे.
पंतप्रधान कौशल विकास योजनेअंतर्गत देशभर फ्रंटलाइन वर्कर्ससाठी क्रॅश कोर्स घेण्यात येणार आहे. या कोर्सच्या उद्धटनाप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज देशात सुमारे एक लाख कोरोना वॉरियर्स तयार करण्याची मोठी मोहीम सुरू झाली आहे. या वाॅरियर्सना प्रशिक्षण देणारा हा कोर्स दोन ते तीन महिन्यांचा असेल. फ्रंटलाइन वर्कर्ससाठी असलेल्या या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना मोफत प्रशिक्षण, कौशल्य भारताचे प्रमाणपत्र, भोजन आणि राहण्याची सोय यासह वेतन मिळणार आहे. याशिवाय नोंदणीकृत उमेदवारांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळेल. हे कर्मचारी सीएचसी, पीएचसी आणि रुग्णालयात काम करू शकतील.
हा प्रशिक्षण कार्यक्रम सध्याची आणि भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. विना-वैद्यकीय आरोग्य सेवा कामगारांची कौशल्ये विकसित करणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. यासाठी २७६ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. या कोर्सच्या उद्धटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रत्येक देश, संस्था, कुटुंब आणि जगातील प्रत्येक माणसाची क्षमता तपासली गेली आहे. आपल्यातील क्षमता विकसित करण्यासाठी विज्ञान, सरकार, समाज, संस्था म्हणून या सर्वांना सतर्क केले आहे."