कोरोना तपासामुळे चीन बॅकफूटवर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2021   
Total Views |

dr xi _1  H x W




कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, या प्रश्नावर जगाला आता ‘चीन’ या एकमेव उत्तराची खात्री पटलेली दिसते. पण, ज्यांनी चीनला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न केला, ते अद्यापही कोरोनाच्या मुळाचा शोध घेत असावेत किंवा चीनच्या चुकांवर पांघरूण घालण्यातच व्यस्त असावेत. मात्र, कोरोनाच्या मूळ गावाचा शोध लागल्यानंतर बचावासाठी चीनच पुढे येऊ लागला. कोरोनाचे मूळ कुठे आहे, या प्रश्नाचे उत्तर चीनमध्ये असलेल्या वुहानच्या प्रयोगशाळेभोवतीच फिरत राहते. मात्र, प्रयोगशाळेतील संशोधक आता कुठे बचावात्मक पवित्रा घेताना दिसतात. जगभरातून चीनविरोधात होत असलेले आरोप निराधार असल्याचे हे संशोधकही सांगू लागले.
 
 
एकप्रकारे या संशोधकांचे म्हणणेही बरोबरच. कारण, वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू बाहेर पडू दिला किंवा विषाणूचा प्रसार झाला, याबद्दलचा एकही पुरावा चीनने मागे सोडलेला नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला खोडून काढण्याची ताकद खुद्द अमेरिकेतही नाही. वुहान प्रयोगशाळेत एक धोकादायक खेळ सुरू करण्यात आला. विषाणू हा मानवी शरीरातील ‘डीएनए’मध्ये प्रवेश करेल अशी रचना करायची व भविष्यात तशा प्रकारच्या रोगाचा फैलाव झाला, तर त्यावर आधीच लस शोधून ठेवायची, असला उद्योग ज्या डॉ. शी झेंग ली यांनी केला, त्याही आता बचावासाठी पुढे आल्या आहेत.
 
 
‘बॅट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ली म्हणतात, “हे जग कुठल्याही पुराव्यांशिवाय इथल्या संशोधकांवर बेछूट आरोप करत सुटले आहे. वुहानमध्ये झालेल्या कोरोनाच्या उत्पत्तीचा दावा हा पूर्णपणे खोटा आहे. मी अशी एक गोष्ट पुराव्यासकट सिद्ध करु शकते.” झेंग ली यांचे म्हणणे पूर्णपणे योग्यच आहे. कारण, चीनच्या सरकारने वुहानमध्ये संशोधन करण्यात आलेल्या कुठल्याही संशोधनाचे पुरावे ठेवलेलेच नाहीत. वुहानच्या प्रयोगशाळेत कुठल्याही प्रकारच्या नोंदी उपलब्ध नाहीत. पण, ज्या घटना वुहान प्रयोगशाळेत घडल्या, त्याला योगायोग तर नक्कीच म्हणता येणार नाही आणि त्याचे उत्तर या झेंग ली यांच्यापाशी नाही.
 
 
चीनच्या प्रमुख विषाणूशास्त्रज्ञांनी यासंदर्भात नुकतीच ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला एक मुलाखत दिली. अमेरिकेतूनच चीनविरोधात प्रामुख्याने आवाज उठायला लागल्याने आता तिथल्याच माध्यमांमध्ये मुलाखती देऊन आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचे काम झेंग ली यांनी केले आहे. “माझ्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये जराही सत्यता नाही,” असे झेंग ली म्हणतात. ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’मध्ये वटवाघुळांवर संशोधन करत असताना योग्य काळजी न घेतल्याने विषाणूंचा प्रसार झाला, असा तर्क जगभरातील संशोधकांनी आणि तज्ज्ञांनी मांडला आणि कोरोनाचे मूळ इथली प्रयोगशाळाच आहे व हा विषाणू मानवनिर्मितच आहे, असा दावाही काही माध्यमांनी केला. या प्रकाराची ९० दिवसांत चौकशी व्हायला हवी, असा निर्देश अमेरिकन सरकारने दिला आहे. त्यानंतर चीनही बिथरल्याने असे स्पष्टीकरण देण्याची वेळ इथल्या संशोधकांवर आली आहे.
 
 
 
अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेने कोरोनाच्या मूळ उत्पत्तीबद्दल एक अहवाल तयार केला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेतील कित्येक संशोधकांना ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये कोरोना संक्रमण झाले होते. हे सर्व संशोधक संक्रमित झाले असतील, तर कोरोनाची उत्पत्ती झालेली नेमकी जागा कुठली, याबद्दल प्रश्नही विचारले जातील. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर चीनचा मात्र तिळपापड झाला आणि सर्व आरोप चीनने फेटाळून लावले. खरंतर अमेरिकेतील संस्थांनी निधी देऊन ज्या प्रयोगासाठी हा सर्व खटाटोप केला होता, तो अमेरिकेसह जगावरच उलटला आहे. अमेरिकेतील १८ वैज्ञानिकांच्या गटाने कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली होती.
 
 
याप्रकरणी चीन ‘सार्स’ विषाणूबद्दल एक महत्त्वाचा अभ्यास करत आहे, अशी माहिती अमेरिकन वैज्ञानिकांनी दिली होती. या समूहाचे नेतृत्व करणार्‍या विषाणू शास्त्रज्ञ जेसी ब्लूम यांच्या मते, ज्यावेळी ‘जागतिक आरोग्य संघटने’चे पथक वुहानच्या प्रयोगशाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते, तेव्हा त्यांना याबद्दल पाहणी करण्यापासून रोखले गेले, तसेच चौकशी सुरू असल्याचा देखावा करण्यात आला. जो बायडन यांनी अमेरिकेच्या तपास यंत्रणांना आता कुठे चौकशीचे आदेश दिले आहेत. कोरोना कुठून पसरला, कुठल्या प्राण्याद्वारे तो माणसांत संक्रमित झाला, याचे उत्तर येणार्‍या काळातच समोर येईल. तूर्त चीनकडे डोळेझाक करणार्‍यांचे डोळे काहीसे उघडले हेही नसे थोडके!
@@AUTHORINFO_V1@@