आपल्या परीने समाज आणि ग्रामविकासासाठी झटणारा दत्तात्रय पाटील हा युवक युवाशक्तीचा नायक ठरावा. त्याच्याविषयी...
ठाणे जिल्ह्यातील शहापूर या वनवासी तालुक्यातील दहिवली गावचा दत्तात्रय पाटील हा युवक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. सध्या ‘गूंज’ या राष्ट्रीय पातळीवर काम करत असलेल्या संस्थेमध्ये ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहे. कोरोना काळात विविध संस्थांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देत आहे. रेशन किट, मेडिकल किट, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, तर महिलांना ‘सॅनिटरी पॅड’ वाटप करणारा हा युवक विविध सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यातील एक दुवा म्हणून कार्यरत आहे.
मुरबाड-शहापूर सीमेवरील दहिवली गावच्या जिल्हा परिषद शाळेत त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. वडील शेतकरी. त्यामुळे शेतीत जे पिकेल त्यावर घर चालायचे. घरची परिस्थिती कमकुवत. अशा खडतर परिस्थितीशी झुंज देत त्याने विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केली. याबाबत आठवण सांगताना दत्तात्रय म्हणतो, “बारावीत कॉलेजचे शुल्क भरायला पैसे नव्हते. त्यामुळे अंतिम परीक्षेचे ‘हॉल तिकीट’ मिळत नव्हतं, त्याचदरम्यान निवडणुकांचा काळ होता, उमेदवाराच्या प्रचारातून जे पैसे मिळाले त्यातून शुल्क भरून बारावीची परीक्षा दिली.” एकीकडे आर्थिक दुर्बलतेचे चटके असाहाय्य करणारे, तर दुसरीकडे पुढील शिक्षण, नोकरीची विवंचना सतावत होती. रडत बसून, हताश होऊन यातून मार्ग निघणार नाही, याची पुरेपूर त्याला जाणीव असल्याने हाताला मिळेल ते काम करून त्याने कला शाखेतून पदवी प्राप्त केली. शालेय वयापासून वाचनाची, लिखाणाची, वक्तृत्वाची आवड असल्याने अवती-भवतीच्या घटनांचा वेध तो विविध माध्यमातून टिपत असे.
शिवाय सामाजिक परिस्थितीविषयी त्याच्या जाणिवा प्रगल्भ होत होत्या. वयाच्या १७ व्या वर्षांपासून सामाजिक कार्याशी जोडून घेत ग्रामीण वनवासी भागाच्या सर्वांगिण विकासासाठी ‘नवक्रांती मित्रमंडळा’ची स्थापना केली. ऐन उमेदीच्या काळात आपले करिअर बाजूला सारून सामाजिक संस्थेमार्फत विविध क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू केले. पुढे सामाजिक क्षेत्राची संपूर्ण ओळख झाल्यानंतर वैयक्तिक कार्याला सुरुवात केली. या सामाजिक कार्याची दखल भारत सरकारच्या ‘नेहरू युवा केंद्रा’ने घेतल्यानंतर त्यांच्या सोबतीने युवक कल्याण कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. दत्तात्रयने गावाच्या विकासासाठी कार्यशील व्हायचे हेच अंतिम ध्येय ठेवल्याने त्या पद्धतीनेच त्याने पावले टाकायला सुरुवात केली. त्यामुळे त्याने राज्यातील आदर्श गावे पाहिली. त्या गावातील सरपंचांशी चर्चा केल्या आणि आपल्या गावचा विकास कसा करता येईल, याची आखणी केली.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती युवक व जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध सामजिक उपक्रमांचे आयोजन तो जिल्हाभर करीत आहे. युवा संसद तसेच सरकारच्या विविध अभियानात सक्रिय सहभाग घेऊन ते यशस्वी करण्यासाठी युवकांचा सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यात ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘स्कील इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ अशा विविध अभियानात युवकांना सहभागी करून ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील युवतींना कौशल्य विकासाचे धडे देण्यासाठी दरवर्षी प्रशिक्षण वर्गाची स्थापना करून तज्ज्ञ व्यक्तींमार्फत प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. युवकांमध्ये नेतृत्व, कलागुणांना वाव मिळाल्यामुळे विविध क्षेत्रांत युवकांची उल्लेखनीय कामगिरी होत आहे. मतदार नोंदणी अभियान राबवून दरवर्षी नवीन मतदारांचे नाव मतदान यादीत समाविष्ट करून त्यांना ओळखपत्र मिळवून देणे, वनवासी भागातील युवकांना जातीचे तसेच इतर प्रमाणपत्र मिळवून देण्यासह वनवासी महिलांना वंदना योजना, जननी सुरक्षा योजनाचे लाभ मिळवून दिले.
ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या विविध योजना, साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी वन विभागाच्या साहाय्याने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आदी उपक्रम दत्तात्रय राबवतो. ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थासोबत काम करण्यास त्याने प्रवृत्त केले आहे. जिल्ह्यात युवकांच्या नेतृत्व विकास तसेच त्यांच्यामधील कौशल्य विकासासाठी जिल्हाभरात पडोस युवा सांसद, जिल्हास्तरीय कला महोत्सव, क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय युवा सप्ताह आदी कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने आयोजित करणे तसेच युवक मंडळाचा विकास करण्यासाठी त्यांना जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र यांच्या योजना सांगून विविध योजनांचे अर्ज करायला सांगून त्यांचा पाठपुरावा करणे, व्यायामशाळा विकास अनुदान, युवक कल्याण योजना यांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध ठिकाणी मार्गदर्शन कार्यक्रम राबविणे, हा त्याचा नित्यक्रम बनला आहे.
शिक्षण हा त्याचा सर्वात आवडता विषय. त्यात ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील समस्यांची बर्यापैकी जाणीव होती. त्यानुसार गावातील उच्चशिक्षित युवकांना एकत्र करून त्यांच्या सहकार्याने अभ्यासवर्ग सुरू केले. जिल्हा प्रशासनासोबत एक दिवस शाळेसाठी उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन करणे असे शैक्षणिक क्षेत्रात योगदान सुरू आहे. तसेच दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, कला महोत्सवाचे आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
स्थानिक प्रश्नांवर, समस्यांवर वेळोवेळी आवाज उठवून सरकार दरबारी पत्रव्यवहार करून प्रसंगी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करून प्रश्न सोडविले. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक, कला, महिला सक्षमीकरण, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणारे कार्य, दुर्बल घटक विकास अशा महत्त्वाच्या विषयांवर काम करून, विविध कार्यक्रम राबवून ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी दत्तात्रय कार्यरत आहे. तरूणांना संदेश देताना, ज्या क्षेत्रात असाल त्यात यशस्वी व्हा, आयुष्यात सामाजिक जाणिवा मरू न देता आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात, त्याच्याकडे एक सामाजिक भान जपून शक्य त्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे तो सांगतो.
“तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला हवा. आपल्याकडे अजूनही सामान्य युवावर्गाला फार कमी संधी दिली जाते, ही खेदाची बाब आहे. संविधानिक पदावर काम करताना मर्यादा असल्या तरी विविध विकास कामे मार्गी लावण्याची ताकद असते,” असे मत दत्तात्रय व्यक्त करतो. या ग्रामविकासाच्या ध्येयामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याचेही तो अभिमानाने सांगतो. सध्या एका नामांकित संस्थेत काम करत सामाजिक-राजकीय गाडा हाकणार्या या युवाशक्तीचा नायकाला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!