मुंबई : जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह १४ जून २०२१ पासून सुरू झाला आहे. हे सप्ताहाचे दुसरे वर्ष असून जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा करण्याचे तिसरे वर्ष आहे. मी मराठी व्यवसायिक एकीकरण समितीच्या फेसबुक पेजवर कार्यक्रम लाईव्ह बघता येणार आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ मुंबईच्या प्रथम नागरिक श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाने आणि शुभेच्छानी झाला.किशोरीताईनी महिला उद्योजिका विषयावर मार्गदर्शन केले तसेच अर्थसंकेतच्या सह - संस्थापिका सौ रचना लचके बागवे यांची तरुण महिला उद्योजिका म्हणून मुलाखत घेण्यात आली. मराठी माणूस, उद्योजकता आणि भांडवल...एक समस्या? या विषयावर सी ए जयदीप बर्वे व टी जे एस बी बँकेचे ब्रांच हेड श्री अविनाश मुंढे यांनी मार्गदर्शन केले.
मी मराठी व्यवसायिक एकीकरण समिती तर्फे कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंती निमित्त २० जून हा जागतिक मराठी उद्योजकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमीत्ताने हा उद्योजकीय सप्ताहही आयोजित केला जातो. उद्योजकांना पाठबळ मिळावं आणि सर्व उद्योजकीय संस्थांनी एकत्रित येऊन हा सप्ताह साजरा करवा म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
संपूर्ण सप्ताह विविध मान्यवर मंडळी ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जेष्ठ उद्योजक श्री दीपक घैसास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे स्ट्रॅटेजी हेड श्री शंकर जाधव, माधवबागचे डॉ रोहित साने, प्रिन्सेस वाईन्सच्या अचला जोशी, अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे तसेच श्री मकरंद शेरकर, स्नेहल लोंढे, रेखा चौधरी, सानिका गोळे, डॉ मेघा जाधव, श्री शेखर पवार, श्री प्रसन्ना लोहार, श्री कुंदन गुरव, सौमानसी मांजरेकर, डॉ प्रज्ञा बापट, पूनम राणे, सुनिता पडवेकर, जान्हवी राऊळ, सुरेखा वाळके, मोहना हांडे असे विविध मार्गदर्शक या उपक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
श्री मंदार नार्वेकर व सौ वैशाली तळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. मी मराठी व्यवसायिक एकीकरण समितीतर्फे हा सप्ताह आयोजित केला असून अर्थसंकेत या कार्यक्रमाचे सह आयोजक आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध उद्योजकीय संस्थांचा या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा लाभला आहे.