विविध विषयांवर कवितेच्या माध्यमातून आपले मनोविचार व्यक्त करणार्या कवयित्री सुरेखा गावंडे यांच्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...
रेल्वेप्रवासात अनेक नैसर्गिक कविता सुचलेल्या कल्याणच्या सुरेखा गावंडे यांचा कथा, पटकथा, संवाद, गीत आणि अभिनयाची पंचसूत्री असलेला ‘ऑक्सिजन’ हा पहिला लघुचित्रपट येत आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या कवितेला आठवीच्या ‘सुगमभारती’च्या पुस्तकात स्थान देण्यात आले होते. या कवयित्रीविषयी जाणून घेऊया.
सुरेखा यांचा जन्म नाशिकजवळ एका छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील हे नोकरीनिमित्त मुंबईला राहत होते. त्यामुळे सुरेखा यांचे सर्व बालपण गिरगावात दिव्याची चाळ येथे गेले. काळबादेवी शाळा येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. शिरोडकर हायस्कूल चिकित्सक शाळा येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पदवीचे पहिले वर्ष झाल्यानंतर सुरेखा यांचे लग्न झाले. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले.
१९८३ साली सुरेखा यांना ‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई’ येथे नोकरी मिळाली. नोकरी करीत त्यांचे शिक्षण सुरू होते, पण १९८४ साली त्यांचे लग्न झाले आणि त्या कल्याणकर झाल्या. गेल्या ३६ वर्षांपासून त्या कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहतात. छशिमट ते कल्याण असा नोकरीनिमित्ताने सुरेखा यांचा प्रवास सुरू होता. लोकलमध्ये कितीही गर्दी असली, तरी सुरेखा या त्यांच्या विश्वात मग्न असायच्या. साहित्यिकाला कविता कुठेही सुचतात, असे म्हटले जाते. त्याला सुरेखा यादेखील अपवाद नव्हत्या.
सुरेखा यांच्या अनेक कवितांनी रेल्वे प्रवासात जन्म घेतला आहे. ‘कोळ्याची पोरं’ ही कविता कळवा-मुंब्रा येथील खाडी पाहून सुचली. २०१८ मध्ये या कवितेचा महाराष्ट्र शासनाच्या ‘सुगम भारती’ अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. ही कविता आज आठवीचे विद्यार्थी अभ्यासत आहेत. या कवितेची निवड ‘बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे’ यांनी केली आहे. कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही गोष्ट आहे. कथा, प्रवासवर्णने, कविता लिखाणाचे काम सुरेखा करतात. आता त्यांनी लघुचित्रपट या नवीन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या सगळ्या प्रवासात आपले शिक्षण अर्धवट राहिले, ही गोष्ट त्यांच्या मनाला चटका लावून गेली होती.
अनेक कार्यक्रमांना गेल्यावर त्यांना तुम्ही शिक्षिका आहात का, असे विचारले जात असे. “खरंतर साहित्य आणि शिक्षण यांचा काहीही संबंध नाही. अशिक्षित असलेल्या बहिणाबाई चौधरी यांनीदेखील साहित्यात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटविला आहे,” असे सुरेखा सांगतात. सुरेखा यांची मुलगी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती, त्यावेळी सुरेखा यांनीदेखील आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखविले. त्यांच्या मुलीलाही खूप आनंद झाला. सुरेखा यांच्या निर्णयाला कुटुंबीयांकडून चांगला पाठिंबा मिळाला. त्यामुळे सुरेखा यांना आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले.
नोकरी आणि घर सांभाळून आपली कवितेची आवड सुरेखा जोपासत होत्या. हे सगळे करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. कार्यालयाच्या संचार कार्यक्रमात कविता सादर करता करता आंतरराष्ट्रीय कवी संमेलनापर्यंत त्यांनी प्रवास केला. ‘पहिला पाऊस, पहिलं प्रेम’ या मराठी गाण्यांच्या अल्बममध्ये गीत लिहिण्यापासून अभिनयापर्यंत त्यांनी काम केले. ‘संजलची दंगल’, ‘सवंगडी’ हे त्यांचे बाल काव्यसंग्रहं ‘सांजवेळ’, ‘साक्षी’ हे त्यांचे कवितासंग्रह, तर ‘सह्याद्रीची लेक हिमालयाच्या कुशीत’ हे प्रवासवर्णन या त्यांच्या साहित्यनिर्मिती उल्लेखनीय आहेत.
‘सवंगडी’ या बालकाव्य संग्रहातील गीते आकाशवाणीच्या ‘अस्मिता’ आणि ‘गंमत जंमत’ वाहिनीवर प्रसारित झाली आहेत. सुरेखा यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. त्यामध्ये नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार’, शिर्डी येथे ‘जीवनगौरव पुरस्कार’, मुंबई येथे ‘नेल्सन मंडेला राष्ट्रीय पुरस्कार’, पुणे येथे ‘महाराष्ट्र साहित्य भूषण शिवरत्न पुरस्कार’, इंदापूर येथे ‘राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी महाराष्ट्र तसेच देशाच्या राजधानीत या कवयित्रीचा आणि तिच्या कवितांचा सन्मान झाला आहे.
सुरेखा यांनी आकाशवाणी, दूरदर्शनवर कथावाचन, काव्यवाचन केले आहे. तसेच अनेक नियतकालिकं, दिवाळी अंक, वर्तमानपत्रांमधून लेख प्रकाशित झाले आहेत. कवयित्री म्हणून मिळालेल्या यशात त्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींपासून ते मार्गदर्शक व्यक्तींपर्यंत सर्वांना समान भागीदार मानतात. नवकवींना त्यांनी निसर्गाचे तसेच समाजाचे निरीक्षण करा. प्रेमापलीकडे अनेक विषय आहेत ते वाचा. त्यांच्यावरती लिखाण करा, असा संदेश दिला आहे.
सुरेखा यांचा ‘ऑक्सिजन’ हा लघुचित्रपट मराठी व कन्नड अशा दोन्ही भाषेत होत आहे. स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट एका स्त्रीच्या भोवती फिरत आहे. एकत्र कुटुंब सांभाळून, नोकरी करणारी, सुशिक्षित अशी ही मध्यमवर्गीय स्त्री आपली सर्व कर्तव्यं पार पाडत असून आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात घर सोडून ‘शिवानंद आश्रमा’त निघून जाते. तिला आता तिच्या मनासारखं आयुष्य जगायचं आहे. मनात दाबून ठेवलेले छंद जोपासायचे आहेत. तिला आता मोकळा श्वास घ्यायचा आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीत सुरेखा यांचे आहे. या लघुपटाचा शुभारंभाचा कार्यक्रम घरगुती पद्धतीने नुकताच पार पडला आहे. या हरहुन्नरी कवयित्रीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.