कोविडविरोधी लढाई – जगभरातील मराठी मान्यवरांचे विचारमंथन
12-Jun-2021
Total Views | 162
2
करोना काळात भारतात ऑनलाईन शिक्षणास मिळाली गती – डॉ. अभय जेरे
‘माझा भारत’ ही भावना बळकट करण्याची गरज – आनंद गानू
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : दैनिक मुंबई तरुण भारत आणि साप्ताहिक विवेक आयोजित मराठीतील पहिली जागतिक कोव्हिड परिषद शनिवारी पार पडली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांनी परिषदेचे उद्घाटन केले तर अमेरिकेतील गर्जे मराठी ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष प्रमुख आनंद गानू यांनी समारोप केला. परिषदेस विविध क्षेत्रात कार्यरत १५ देशातील मराठी जन सहभागी झाले होते.
मराठीतील पहिल्याच कोव्हिड परिषदेचे आयोजन दैनिक मुंबई तरुण भारत आणि साप्ताहिक विवेकतर्फे करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन डॉ. अभय जेरे यांनी केले. यावेळी जेरे यांनी करोनाकाळात भारतात शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा घेतला. ते म्हणाले, करोना काळात सोयीसाठी डिजीटल पद्धतीने अभ्यासक्रमांना प्रारंभ झाला आणि विद्यार्थ्यांनी तो बदल लगेचच स्विकारला. भारतात टाळेबंदी लागू केल्यावर लगेचच शिक्षण मंत्रालयातर्फे एक आयडियाथॉन घेण्यात आली, त्यामध्ये करोनाशी संबंधित अनेक उपकरणांसाठी संशोधकांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना सादर केल्या, त्यातील अनेक प्रकल्पांवर आता कामही सुरू झाले आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे मंत्रालयातर्फे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही प्रथमच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केले आणि आसियान देशांसोबत हॅकेथॉन संपन्न झाली. त्याचप्रमाणे आता आगामी काळात आफ्रिकन देशांसोबत प्रथमच भारत स्मार्ट हॅकेथॉन घेणार आहे. त्यामुळे करोना संकटामुळे रुजलेल्या ऑनलाईन पद्धतीचा वापर आपण आंतरराष्ट्रीय संहंध बळकट करण्यासाठीही केला आहे. करोना संकटातही भारतीय शिक्षण क्षेत्राने मोठी झेप घेतल्याचे डॉ. जेरे यांनी सांगितले.
परिषदेचा समारोप अमेरिकेतील गर्जे मराठी ग्लोबलचे आनंद गानू यांनी केला. ते म्हणाले, करोना संकटाने आपणा सर्वांनाच आत्मपरिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या काळात भारत हा स्वयंपूर्ण झाल्याचे संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्याचवेळी आपल्याच नेतृत्वाविरोधात अथवा देशाविरोधात स्वार्थापोटी भूमिका घेणारेही दिसून आले आहेत. अशी परिस्थिती अमेरिकेत दिसलेली नाही, हे समाज म्हणून अमेरिकेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतला बळकटी देण्यासाठी माझा भारत अशी संकल्पना राबविण्याची गरज असल्याचेही गानू म्हणाले.
शिकागो येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी यांनी अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या करोना धोरणाची माहिती दिली. करोनाच्या पहिल्या लाटेतही विविध राज्यांनी आपापल्या प्रदेशातील परिस्थितीनुसार निर्णय घेतले. सर्वांत महत्वाचे म्हणजे येथील नागरिकांनी नियम पाळण्यास विरोध केला नाही. त्याचप्रमाणे लसीकरणासही नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता अमेरिकेमध्ये नो मास्क हे धोरण सुरू झाल्याचे जोशी यांनी सांगितले.
जर्मनीने करोनाच्या पहिल्या लाटेविषयी फार गांभिर्याने उपाययोजना केल्या नव्हत्या, असे देसी जर्मनचे संस्थापन अजित रानडे यांनी सांगितले. मात्र, तरीदेखील जर्मनीमध्ये पूर्णपणे टाळेबंदी लावण्यात आली नव्हती, सध्या येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या काळात येथील भारतीय समुदायाने मोठ्या प्रमाणात मदतकार्ये केली. मात्र, करोनामुळे जर्मनीच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला असून त्यासाठी सुरुवातीला नेतृत्वाने केलेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे रानडे यांनी नमूद केले. थायलंड येथे सरकारच्या प्रत्येक नियमाचे पालन जनतेने काटेकोरपणे केल्याचे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे येथील भारतीय समुदायाने थायलंड तसेच भारतासदेखील विविध प्रकारची मदत करण्यात पुढाकार घेतल्याचेही ते म्हणाले.
आफ्रिकेतील नायजेरिया या देशातील नागरिकांची प्रतिकारशक्ती मजबूत असल्याचे फारसा प्रतिकूल परिणाम झाला नाही, असे निरिक्षण पुष्कराज मोगल यांनी नोंदविले. त्याचवेळी येथील संयुक्त भारत असोसिएशन सभेने ६० खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारण्यात पुढाकार घेतला, त्यामुळे भारताविषयी नायजेरियन जनतेनेही कृतज्ञता व्यक्त केल्याचे मोगल म्हणाले. इंडोनेशियामध्ये करोना संसर्गाची मोठी लाट आली नसल्याचे शैलेंद्र हळबे यांनी सांगितले. त्याचवेळी येथील सरकारनेदेखील काटेकोर उपाययोजना करून जनतेला नेमकी आणि खरी माहिती पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. येथील भारतीय समुदायाने – इंडिया क्लबने देशासह भारतासही विविध प्रकारची मदत केल्याचेही ते म्हणाले. स्वीडन येथील वैभव जपे यांनी स्वीडनकरांच्या शिस्तीमुळे करोनाचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे सांगितले. अर्थात, येथे लोकसंख्या कमी असल्याने आणि आरोग्य सेवा मजबूत असल्याने उपचारांसाठी गोंधळ उडाला नसल्याचे नमूद केले.
अमेरिकेतील मँचेस्टर येथील डॉ. निला आणि रविंद्र सुरंगे यांनी करोना आणि टाळेबंदीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णसंख्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत भयावह वेगाने वाढल्याने आरोग्य सेवेवर मोठा ताण पडल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी ऑनलाईन उपचारांची व्यवस्था वापरण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. दुबई येथे नियम मोडल्यास भरमसाठ दंड वसूल केला जातो, त्याचा परिणाम दुबईमध्ये परिस्थिती आटोक्यात राहण्यावर झाला असे प्राची सातोस्कर यांनी सांगितले. व्हॅक्सिन टुरिझम ही अभिनव कल्पनाही राबविण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.
आस्ट्रेलियामध्ये परिस्थिती आता अतिशय सर्वसामान्य असल्याचे प्रा. राजीव पाध्ये म्हणाले. त्याचवेळी तथील वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या भारतविरोधी व्यंगचित्राविषयी भारतीय समुदायाने आपला निषेध व्यक्त केल्याचेही ते म्हणाले. फिनलंडमध्ये नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी संघ परिवाराशी संबंधित संस्था व भारतीय समुदायाने विशेष प्रयत्न केल्याचे हेरंब कुलकर्णी म्हणाले. तसेच आरोग्य व शिक्षण व्यवस्था ही सर्वोत्तम असल्याने करोनाचा प्रभाव जास्त जाणवल्या नसल्याचेही ते म्हणाले. नॉर्वे येथील लोकसंख्या आणि आरोग्य व्यवस्था तसेच नागरिकां प्रतिसाद हा सकारात्मक ठरल्याचे अमित मुळ्ये म्हणाले.
आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांनी अन्य देशातील स्थिती आणि भारत यांचा तुलनात्मक आढावा मांडला. करोना संसर्गामध्ये चीनची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले.