चिनी धोक्याची घंटा...

    09-May-2021   
Total Views | 132

jp _1  H x W: 0


चीनचे नौदल, हवाईदल आणि ‘स्ट्रॅटेजिक रॉकेट फॉर्सेस’ यांची ताकद अजून वाढणार असल्याची महत्त्वाची बाबही हा अहवाल अधोरेखित करतो. तसेच चीनच्या गोटातील ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ म्हणजे अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रे यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. चीनची आर्थिक ताकद प्रचंड असल्यामुळे त्यांना अशा प्रकारची महागडी शस्त्रे निर्माण करणे सोपे होणार असल्याची चेतावणीदेखील या अहवालातून समोर येते.


अमेरिकेतील गुप्तहेर संघटना असलेल्या ‘डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्स’मार्फत नुकताच एक वार्षिक अहवाल अमेरिकन सिनेट समोर ठेवण्यात आला. यानुसार पुढच्या एक वर्षामध्ये अमेरिकेच्या आणि जगाच्या सुरक्षेला जे वेगवेगळे धोके निर्माण होऊ शकतात, त्याविषयी विश्लेषण करण्यात आले आहे. आपण या संदर्भात भारताचा विचार करणे आवश्यक आहे. चीनपासून निर्माण होणारे धोके हे विविध क्षेत्रांत, विविध स्तरांवर ३६५ दिवस येणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये चीनच्या सीमेवरच्या कारवाया, त्यांची आक्रमक मुत्सद्देगिरी, भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये होणारी चिनी घुसखोरी, दक्षिण चीन समुद्रामध्ये त्यांचे आक्रमक धोरण, चिनी गुप्तहेरांची भारताच्या विविध क्षेत्रांतील घुसखोरी, ‘सायबर ऑपरेशन’, चीनचे तांत्रिक आक्रमण असे विविध विषय यामध्ये प्रकर्षाने मांडण्यात आले आहेत.



या सर्वात महत्त्वाचे हे आहे की, या आव्हानांना भारताने कसे प्रत्युत्तर द्यावे? हा अहवाल असे सांगतो की, चीन येणार्‍या काळामध्ये भारतामध्ये विविध प्रकाराने अराजकता पसरवून भारताची आर्थिक प्रगती रोखण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. भारत-चीन सीमेवरती चिनी आक्रमकता वाढण्याचा धोकादेखील या अहवालात नमूद करण्यात आला आहे. चीनचे नौदल, हवाईदल आणि ‘स्ट्रॅटेजिक रॉकेट फॉर्सेस’ यांची ताकद अजून वाढणार असल्याची महत्त्वाची बाबही हा अहवाल अधोरेखित करतो. तसेच चीनच्या गोटातील ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ म्हणजे अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रे यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. चीनची आर्थिक ताकद प्रचंड असल्यामुळे त्यांना अशा प्रकारची महागडी शस्त्रे निर्माण करणे सोपे होणार असल्याची चेतावणीदेखील या अहवालातून समोर येते.

कदाचित सध्या भारताला कोरोनामुळे आपले संरक्षणविषयक ‘बजेट’ वाढविण्यात अडचणी येऊ शकतात, अशा वेळी प्राप्त झालेला हा अहवाल भारतासाठी महत्त्वाचा आहे.अंतराळातल्या लढाईमध्ये चीन वेगाने प्रगती करत आहे. चीन आपल्या उपग्रहांच्या मदतीने जगावर बारीक लक्ष ठेवून आहे. त्याच्याकडे दुसर्‍या देशांचे उपग्रह नष्ट करण्याची देखील क्षमता आहे. त्यामुळे अंतराळात होऊ शकणार्‍या युद्धावरसुद्धा भारताला आगामी काळात अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहेच. दरम्यान, भारताने अंतराळात असलेले उपग्रह पाडण्याची क्षमता गेल्याच वर्षी दाखवून दिली होती. पण, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनची शक्ती प्रचंड आहे. साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून वेगवेगळ्या देशांचे तंत्रज्ञानही चीनने चोरले आणि हाच प्रयत्न ते येणार्‍या काळातही असाच सुरु ठेवतील. भारतामध्ये जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये चीनने घुसखोरी करायचा प्रयत्न केला आहे.



उदाहरणार्थ, बंगळुरूमधल्या आयटी सेक्टरमध्ये चीन मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता. आता तो राष्ट्रविघातक प्रयत्न रीतसर थांबवण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ‘आत्मनिर्भरते’कडे टाकलेले पाऊल हे आता येणार्‍या काळात सर्वार्थाने सिद्ध होणार आहे. याला अर्थात काहीसा वेळ लागेल. परंतु, तोपर्यंत आपल्याला इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची मित्रराष्ट्र म्हणजे अमेरिका, जपान, तैवान यांची मदत घेऊन चीनच्या तंत्रज्ञान आक्रमणाचा मुकाबला करावा लागेल. सायबर जगतातील हॅकिंग, व्यापार गुपिते, डिझाईन चोरणे या क्षेत्रांत चीन पुढे आहे. त्याने ‘फॉर्चुन फाईव्ह हंड्रेड’ कंपनीचे असेच एक व्यापारी गुपितसुद्धा चोरले आहे. या पार्श्वभूमीवर आपण केवळ आपल्या देशाच्या महत्त्वाच्या संघटनांचा चीनच्या आक्रमणापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करतो.
भारताचे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल रावत यांनी म्हटले आहे की, आक्रमक ‘सायबर ऑपरेशन्स’मध्ये भारताला प्रगतीच्या अजून अनेक संधी आहे. आगामी चार वर्षांमध्ये आपण चीनबरोबर स्पर्धा करण्याकरिता सज्ज राहू.” पण, चीनने भारताच्या कुठल्याही यंत्रणांवर सायबर हल्ला केला, (जसा महाराष्ट्राच्या वीजनिर्मितीवर) तर आपल्याला चीनच्या सायबर जगतामध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची क्षमता निर्माण करावी लागणार आहे.याकरिता भारतीय सैन्याने ‘डिफेन्स स्पेस’, ‘सायबर एजन्सी’ तयार केली आहे. आशा करूया की, यामध्ये भारतातले बुद्धिमान विद्यार्थी, संशोधन करणारे शास्त्रज्ञ आणि सैन्य हे एकत्रित येऊन काम करतील. त्यामुळे चीनच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याची आपली क्षमता येणार्‍या काळांमध्ये वाढण्यास निश्चितच मदत होईल.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121