‘मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड’, पण ‘ऑन रेकॉर्ड’ ठेवण्यायोग्य पुस्तक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2021   
Total Views |

Manohar Parrikar_1 &
 
 
 
लेखकाने आपल्या पुस्तकाला ‘पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड’ असे नाव दिले असले, तरी पुस्तक लिहिताना लेखणी मात्र मुक्त ठेवली आहे. पर्रीकरांसारख्या स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शक, राजकारण्याबाबत ‘ऑफ द रेकॉर्ड’ काही असण्याची शक्यताच कमी, सर्वच पारदर्शक असण्याची शक्यता जास्त!
 
 
गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार वामन सुभा प्रभू लिखित ‘मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन संपन्न झाले. वामन प्रभू हे पत्रकारितेत ५१ हून अधिक वर्षे कार्यरत असून, त्यांनी गोव्यातून प्रकाशित होणार्‍या बर्‍याच वर्तमानपत्रांत पत्रकरिता केली आहे. ‘चॅनेल’मध्येही ते कार्यरत होते. दै. ‘गोवादूत’चे संपादक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी लिहिलेले हे पहिले पुस्तक. या पुस्तकाची हिंदी आवृत्तीही प्रसिद्ध झाली असून, गोव्याच्या कोकणीतील आवृत्तीही प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
 
 
गोवा विधानसभेचे माजी सभापती प्राचार्य सुरेंद्र शिरसाट यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. नुकतेच सुरेंद्र शिरसाट यांचे निधन झाले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर यांचा २७ वर्षांहून अधिक काळचा सहवास प्रभू यांना लाभला होता. इतका दीर्घ सहवास लाभल्यामुळे पर्रीकरांवर पुस्तक लिहिण्याचा अधिकार प्रभू यांना प्राप्त झाला होता, असे म्हणायला वाव आहे.
 
लेखकाने पर्रीकर यांच्या विविध पैलूंनी युक्त अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या अनेक आठवणींचे शब्दांकन या पुस्तकात केले आहे. लेखक व पर्रीकर या दोघांमधील स्नेहसंबंधांचे चित्रण या पुस्तकात वाचायला मिळते. या पुस्तकाच्या शीर्षकातून हेच लक्षात येते की, लेखकाला काही वेगळी माहिती या पुस्तकाद्वारे द्यावयाची आहे व पुस्तक पूर्ण वाचल्यावर लेखक आपल्या या ध्येयात यशस्वी झाला आहे, हे अधोरेखित करावेच लागेल. हे पुस्तक म्हणजे पर्रीकर यांचे चरित्र नाही किंवा त्यांच्या पूर्ण जीवनावर राजकीय अंगाने लिहिलेले पुस्तकही नाही. लेखकाने पर्रीकरांशी दीर्घकाळ निगडित असलेल्या बर्‍याच आठवणींना शब्दरूप करताना, वाचकांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. पर्रीकरांच्या जवळीकीतून लेखकाला जाणवलेले त्यांचे स्वभावदर्शन, तसेच अन्य काही बाबी शब्दरूप करताना लेखकाने लेखणी आखडती घेतलेली नाही. बरे-वाईट असे सगळेच अनुभव त्या-त्या वेळचे संदर्भ देत व्यवस्थित मांडल्याने हे पुस्तक निश्चित वाचनीय झाले आहे.
 
 
पर्रीकर यांच्या बाबतीतील ‘एक खुले फुस्तक’ असा याचा उल्लेख होऊ शकेल. लेखकाने या पुस्तकात बरीच वेगळी माहिती वाचकांना उपलब्ध करुन दिली असून, ती केवळ पर्रीकर यांच्याशी असलेल्या त्यांच्या जवळच्या संबंधांतून कागदावर उतरली आहे. पर्रीकरांचा जोश आणि कार्य, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक कंगोरे पाहण्याचे भाग्य लेखकाला लाभले आणि त्यांच्याशी निगडित अनेक आठवणी त्यांनी या पुस्तकात मांडल्या.
 
 
पर्रीकर राजकीय रणनीतीत नेहमीच पुढे राहिले. त्यांनी भाजपसाठीही बरेच धाडसी निर्णय घेतले. लेखकाने अशा अनेक घटनांचा वेध घेताना, पर्रीकरांनी राजकारणात घेतलेल्या निर्णयांचा, खेळलेल्या खेळांचा, आखलेल्याा व्यूहरचनांच्या दोन्ही बाजू चांगल्या प्रकारे, वस्तुनिष्ठपणे मांडल्या आहेत. मनोहर पर्रीकर यांचे जवळून अनुभवलेले राजकारण आणि लेखकाचा पत्रकारितेतील दीर्घ प्रवास यांची सुरेख सांगड घालत लेखकाने हे पुस्तक कसे अधिकाधिक वाचनीय होईल, याची दक्षता घेतली आहे.
 
 
पर्रीकर हे म्हापशाचे सुुपुत्र. त्यांची पत्नी मेधा यांच्या अकाली निधनानंतर आपल्या उत्पल व अभिजात या दोन मुलांचा कसा उत्कृष्टपणे सांभाळ केला, राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणाला वाहूून घेत, स्वत:ला कायम कामात व्यस्त ठेवत पत्नी वियोगाचे दु:ख विसरण्याचा प्रयत्न कसा केला, हे गोंवेकर जाणून आहेत. या सर्व प्रसंगांचे विश्लेषण या पुस्तकात सोप्या व सुटसुटीत शैलीत लेखकाने केले आहे. पर्रीकर यांच्या राजकीय जीवनातील बरेच प्रसंग तसेच घटनांचे साक्षीदार असेलेल्या प्रभू यांनी या बाबतची ‘फर्स्ट हॅण्ड इन्फॉर्मेशन’ या पुस्तकात दिली आहे. खरंतर या पुस्तकात पर्रीकरांशी संबंधित अनेक संदर्भ असल्याने हे पुस्तक दस्तावेज ठरू शकते. प्रभू यांनी त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवाच्या शिदोरीवर लिहिलेले हे पुस्तक गोव्यासह अन्य मराठी भाषक प्रांतांत देखील तितकेच वाचकप्रिय होत आहे. लेखकाची पर्रीकरांबरोबर असलेली जवळीक त्यांनी पुस्तकात समाविष्ट केलेल्या अनेक दुर्मीळ व जुन्या छायाचित्रांवरूनही स्पष्ट होते.
 
 
लेखकाने आपल्या पुस्तकाला ‘पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड’ असे नाव दिले असले, तरी पुस्तक लिहिताना लेखणी मात्र मुक्त ठेवली आहे. पर्रीकरांसारख्या स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शक, राजकारण्याबाबत ‘ऑफ द रेकॉर्ड’ काही असण्याची शक्यताच कमी, सर्वच पारदर्शक असण्याची शक्यता जास्त!
 
 
पर्रीकरांची राजकीय कारकिर्द उदयाला येताना लेखकाने त्यांना जवळून पाहिले. नंतरच्या काळात पर्रीकर आणि पणजी मतदारसंघ असे एक समीकरणच झाले. तरीही सुरुवातीच्या काळात पर्रीकरांना पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर अशा दोन्ही आघाड्यांवर कसा संघर्ष करावा लागला, याची बित्तंबातमी लेखकाने या पुस्तकात दिली आहे. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र गोमंतक (मगो) पक्ष यांची झालेली युती हा गोव्याच्या राजकीय इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. यातून गोव्यातील एकूणच राजकारणाला कलाटणी मिळत गेली. भाजपची गोव्यात पुढे झालेली प्रगती ही त्या पक्षाने ‘मगो’शी केलेल्या युतीमुळेच शक्य झालेली आहे. त्यामुळे भाजप व मगो कसे एकत्र आले हे जाणून घ्यायचे असेल, तर हे पुस्तक वाचावेच लागेल. भाजप व मगो यांच्या युतीबाबतच्या खूप बैठका लेखकाच्याही घरी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या पुस्तकात लिहिलेला शब्द नि शब्द हा प्रमाण मानावा लागेल. पुढे कधी तरी गोव्याचा एकंदरीत राजकीय इतिहास लिहिण्याचे कुणी मनावर घेतले तर, त्यासाठी वामन प्रभू यांचे हे पुस्तक संदर्भ दस्तावेज म्हणून नक्कीच उपयोगी पडेल.
 
 
लेखकाने या पुस्तकात, पर्रीकर यांना सुरुवातीच्या काळात कोणाकोणाचा विरोध होता, हे अगदी नावानिशी या पुस्तकात लिहिले आहे. बर्‍याच गोष्टी आता विस्मृतीत गेलेल्या आहेत, तर काही जण मुद्दामहून या विषयावर बोलणे टाळतात. या सर्व घटना जशा घडल्या तशा लेखकाने पुस्तकात सविस्तरपणे मांडलेल्या दिसतात. प्रभू पत्रकार असल्यामुळे त्यांची निरीक्षणशक्ती अफाट आणि भाषेवरील प्रभुत्व अमर्याद आहे. परिणामी, पर्रीकरांची वाटचाल शब्दांत पकडताना लेखकाने वाचकाला कुठेही कंटाळा येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. या पुस्तकात अवधूत मांगले यांनी पर्रीकरांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली होती आणि नंतर ती कशी मागे घेतली, हे प्रकरण वाचण्यासारखे आहे.
 
 
पुढे पर्रीकर पणजीत आले व स्थिरावले असे काही झाले नव्हते. पणजीत स्थिरावण्यासाठी त्यांनी पणजीतील घराघरांत आपले स्थान कसे निर्माण केले? त्यासाठी काय मेहनत घेतली? याचा सर्व लेखाजोखाच प्रभू यांनी या पुस्तकात आपल्या विशिष्ट शैलीत मांडलेला आहे. भाजपचे सरकार वाचविण्याचे प्रयत्न त्या काळात कसे फसत गेले होते? त्यासाठी कोण कोण जबाबदार होते? याचा अगदी नावांसह भांडाफोड या पुस्तकात करण्यात आलेला आहे. आज अनेकांचे सौहार्दाचे संबंध असतील. पण, त्या काळी कसे विळा-भोपळ्याचे नाते होते (महाराष्ट्राच्या राजकारणात याचे उदाहरण म्हणजे फडणवीस व नारायण राणे), याचे मार्मिकपणे चित्रण या पुस्तकात लेखकाने केलेले आहे. हे सारे लिहिताना लेखकाने कोणालाही दुखावलेले नाही. कुठेही त्यांनी लेखक म्हणून आपल्या लेखनस्वातंत्र्याची मर्यादा ओलांडलेली नाही. जसे जसे प्रसंग घडले, तसे तसे त्यांनी ते वाचकांसमोर मांडले आहेत.
 
 
‘गोवा न्यूज लाईन’ या प्रभू यांच्या वृत्तवाहिनीसंदर्भात जी काही मध्यंतरी चर्चा होत होती, त्या सार्‍याची पोलखोल करण्याची संधी या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाने घेतली आहे. सध्या भाजपकडून पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची पाठराखण केली जाते, अशी चर्चा आहे. याची सुरुवात कशी झाली? का झाली? त्यावेळी भाजपसमोर कोणते प्रश्न होते? पणजी मतदारसंघातील राजकीय समीकरणे काय होती? या सार्‍याचा लेखाजोखा जाणून घ्यायचा असेल, तर या पुस्तकाचे पान अन् पान वाचावे लागेल. अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून वाचकांना नक्कीच मिळतील. खरंतर लेखकाने प्रत्येक पानावर नवनवीन माहिती देत वाचकांना चकित केले आहे. हे सारे करताना, लेखकाने कुठेही वास्तव नजरेआड केलेले नाही, हे विशेष. त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती काय होती? ती कशी होती? या सार्‍याचे बारकावे त्या वेळच्या सगळ्या तपशिलांसह, अगदी बैठक कोणत्या बंगल्यावर झाली होती, यासहचा तपशील लेखकाने पुस्तकात मांडला आहे. 28 प्रकरणे असलेले हे पुस्तक म्हणजे लेखकाचे काहीही लपवाछपवी नसलेले प्रामाणिक लेखन आहे. हे पुस्तक वाचायला घेतल्यावर, ते पूर्ण वाचल्याशिवाय वाचक समाधानी होणारच नाहीत आणि हीच या पुस्तकाची ताकद आहे.
 
 
पुस्तकाचे नाव : मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड
लेखक : वामन सुभा प्रभू
प्रकाशन : सहित प्रकाशन
पृष्ठसंख्या : १८५
मूल्य : ३०० रु.
 
  
 
@@AUTHORINFO_V1@@