रे माणसा! तू ‘माणूस’ हो!

    06-May-2021
Total Views | 65

adya aradhya_1  

परमेश्वराला हे ज्ञात होते की, सारेे काही मिळूनदेखील माणूस हा माणुसकीची भाषा व सद्व्यवहार विसरणार आहे. समग्र विश्वाचे ऐश्वर्य प्राप्त करूनही मनुष्य खर्‍या अर्थाने आपल्या जीवनाचा उद्देश संपादित करू शकणार नाही. म्हणूनच या वेदमंत्रात ’माणूस’ बनण्याची व त्याकरिता आवश्यक असणार्‍या बाबींची प्रक्रिया विशद केली आहेे.

तन्तुं तन्वन् रजसो भानुमन्विहि
ज्योतिष्मतः पथो रक्ष धिया कृतान्।
अनुल्बणं वयत जोगुवामपो
मनुर्भव जनता दैव्यं जनम्॥
(ऋग्वेद-१०.५३.६)

अन्वयार्थ


अरे कर्मशील मानवा! (तन्तुं) जीवनरूपी वस्त्राच्या तंतूंना (तन्वन्) विनत-विनत, तू (रजस:) आकाशमार्गाच्या (भानुम्) सूर्याचे (अनु इहि) अनुसरण कर! त्याला आदर्श मानून वाटचाल कर. तसेच ज्ञानवंतांनी आपल्या (धिया कृतान्) बुद्धीद्वारे बनविल्या गेलेल्या (ज्योतिष्मत: पथ:) प्रकाशयुक्त मार्गाचे (रक्षा) रक्षण कर. (जोगुवाम्) कवी, विद्वान व धर्मात्मा विचारवंतांच्या (अप:) कर्मांना (अनुल्बणम्) निर्भ्रांतपणे, यथोचित प्रगतीने (वयत) विनत राहा, त्यांना पुढे वाढव. (मनु:) मानव, मनुष्य, मननशील (भव ) हो, बन ! आणि (दैव्यं जनम्) दिव्य अशा उत्तमोत्तम गुण, धर्म, स्वभावाने युक्त समाजाला, जनसमूहाला (जनय) उत्पन्न कर, जन्माला घाल.


विवेचन

परमेश्वराचे वेदज्ञान हे त्रिकालाबाधित आहे. अल्पज्ञ अशा जीवात्म्याला किंबहुना सार्‍या जगाला भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळात ज्या मौलिक उपदेशाची नेहमीकरिता सर्वाधिक गरज भासणार आहेे, असा उपदेश सदरील मंत्रात वर्णिला आहे. परमेश्वराला हे ज्ञात होते की, सारेे काही मिळूनदेखील माणूस हा माणुसकीची भाषा व सद्व्यवहार विसरणार आहे. समग्र विश्वाचे ऐश्वर्य प्राप्त करूनही मनुष्य खर्‍या अर्थाने आपल्या जीवनाचा उद्देश संपादित करू शकणार नाही. म्हणूनच या वेदमंत्रात ’माणूूस’ बनण्याची व त्याकरिता आवश्यक असणार्‍या बाबींची प्रक्रिया विशद केली आहेे. किती सुंदर शब्दांत म्हटले आहे - मनुर्भव! म्हणजेच हेे माणसा! तू माणूस हो, मनुष्य बन. सध्या मानवतेच्या या उपदेशाची समग्र विश्वाला फारच गरज आहे. मनुष्य कोणाला म्हणावे? जो मननशील असतो, तो मनुष्य होय. निरुक्त ग्रंथात आचार्य यास्क म्हणतात - मत्वा कर्माणि सीव्यति। म्हणजेच, जो आपली सर्व कामे विचारपूर्वक करतो, तोच माणूूस होय. असा हा उदात्त उपदेश कोणत्याही सांप्रदायिक ग्रंथात आढळणार नाही. सर्वात प्रथम वेदांनीच माणसाला माणूस होण्याची शिकवण दिली. चारही वेदांतील सर्व मंत्रांमध्ये हा मंत्र सर्वाधिक श्रेष्ठ व उच्च आशय विशद करणारा आहे. कदाचित इतर उपदेश नसले असते आणि हाच एकमेव मंत्र जरी राहिला असता, तरी वेदांचे स्थान हे जगातील सर्वच मत-पंथ व संप्रदायांपेक्षाही उच्चस्थानी अढळ राहिले असतेे.


सदरील मंत्राचा केंद्रबिंदू आहे - मनुर्भव जनया दैव्यं जनम्। म्हणजेच हे माणसा, तू माणूस हो आणि माणूस बनून दिव्य(सर्वोत्तम) गुण, कर्म व स्वभावांनी परिपूर्ण अशा समाजव्यवस्थेची निर्मिती कर. सर्व प्राण्यांमध्ये ईश्वराने माणसालाच बुद्धीचे वरदान दिले आहे. या बुद्धिबळावर सत्यज्ञान व पवित्र कर्मांद्वारे हा नरदेही आत्मा माणूस बनून समग्र विश्वाचे पालन करो, हाच या मानवनिर्मितीमागचा ईश्वराचा उद्देश होता. देहाकृती तर मिळाली नराची, पण माणूस बनणे मात्र याने पूर्णपणे विसरले. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख यांबरोबरच विविध प्रकारच्या जाती व उपजातींमध्ये हा नरदेह विभागला गेला. त्याबरोबरच पुढारी, व्यापारी, उद्योगपती, अधिकारी, शेतकरी, मजूर, कामगार इत्यादी बनण्यासदेखील या नरदेहाने प्राधान्य दिले. पण, माणूस बनणे व माणुसकीचा दिव्य समाज निर्माण करणे हे मात्र तो पूर्णपणे विसरला. गेल्या काही वर्षांपासून सारे जग मत - पंथ, संप्रदाय व जातीपातींच्या भेदाभेदांमध्ये विभागले गेले. याच संप्रदायांमुळे देशा-देशांत व माणसा-माणसांत भांडणे लागली. दुर्दैवाने अशा या मत-पंथांनाच ‘धर्म’ असे गोंडस नावदेखील बहाल करण्यात आले. पण, ‘धर्म’ या शब्दाची सत्य व पवित्र अशीच तत्त्वे धारण करणे, अशी व्यापक व्याख्या मात्र सध्याच्या या व्यवस्थेकडून विस्मृत झाली आहे. खरेतर मानवता हाच धर्म! जो की, सर्वप्रथम वेदांनीच प्रतिपादित केला आहे. हा मंत्र मानवतेचा सर्वप्रथम उद्घोष करतो.


माणूस घडायचा असेल, तर यासंदर्भात काय करावे? यावर सुरुवातीची तीन चरणे प्रकाश टाकतात. सुरुवातीलाच म्हटले आहे- तन्तुं तन्वन् रजसो भानुमन्विहि। मानव जीवन म्हणजे विविध प्रकारच्या तंतूंचे वस्त्र होय. ज्याप्रमाणे विणकर कापड विणतांना त्यात आडवे आणि उभे धागे जोडतो आणि त्यांना एका विशिष्ट गतीने पसरवतो व ओढतो, यालाच तर विणणे असे म्हणतात. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सर्वांच्या हाती येते ते सुंदर असे वस्त्र! किती कष्ट आणि परिश्रम लागतात अशा या वस्त्रनिर्मितीकरिता! जुन्या काळात चरखा किंवा हातमागावर वस्त्र विणले जायचे. त्यावेळी विणकरांना फार मोठे श्रम घ्यावे लागत. पण आता मात्र मोठमोठ्या सूतगिरण्या किंवा अत्याधुनिक कारखाने बनले आहेत. ज्यातून मोठ्या प्रमाणावर कपडे तयार होतात. म्हणूनच आजच्या या युगात आपणांस कपडा कसा तयार होतो, याबद्दल विशेष उत्सुकता किंवा नवल वाटत नाही. मानवी जीवनाचेदेखील असेच आहे. जीवनरुपी वस्त्र विणताना वेगवेगळ्या प्रगती व प्रवृत्तींचे धागे ओढावे किंवा ताणावे लागतात. तेव्हा कुठे जीवनरुपी वस्त्र तयार होते. संकटे कितीही येवोत, पण त्यांना कदापिही न घाबरता विवेक व ज्ञानपूर्वक सत्प्रवृत्ती व प्रगतीचे आडवे व उभे तंतू विणले पाहिजेत. त्यामुळे निश्चितच सुंदर असे जीवनवस्त्र तयार होते. हे झाले की, मग पुढे माणसाने कोणाचे अनुकरण करावे? तर आकाशमार्गावरील सूर्याचे! सूर्य हा गतिमान आहे. मानवानेदेखील तेजोमय सूर्याप्रमाणे सतत प्रगतीच्या दिशेने उंच उंच झेप घ्यावी. जसा सूर्य आकाशात झेपावताना चहुकडे व्यापलेला दाट अंधार आपल्या प्रकाश किरणांनी नाहीसा करतो व सर्वांना ऊर्जा देतो, जगण्याचे बळ प्रदान करतो, तद्वतच माणसानेदेखील आपल्या ज्ञानप्रकाशाने अंधारमग्न नशा आपल्या अज्ञानी बांधवांना ज्ञानाच्या प्रकाशात आणावे. अन्यायग्रस्त, पीडित व दुःखी अशा शक्तिहीन बांधवांना न्याय द्यावा, जगण्याचे नवे बळ द्यावे. जो सूर्याप्रमाणे प्रगती करतो तोच मानव होऊ शकतो.

दुसर्‍या चरणात म्हटले आहे - धिया कृतान् ज्योतिष्मत: पथ: रक्ष। म्हणजेच प्राचीन काळापासून आजपर्यंत ज्या ज्ञानी ऋषिमुनी, संत सुधारक व विद्वानांनी आपल्या बुद्धीच्या बळावर आणि मोठ्या परिश्रमाने ज्या पवित्र परंपरा निर्माण केल्या आहेत, त्या सर्व चांगल्या परंपरांचे रक्षण करावे. अगदी पूर्वापार आपल्या समाजात व देशात स्वार्थी लोक वाईट प्रथा व परंपरा निर्माण करतात. त्यामुळे समाज उद्ध्वस्त होतो, पण या अनिष्ट परंपरांना दूर सारण्याकरिता ज्ञानी लोकांना फार मोठे कष्ट झेलावे लागतात. आपले सारे आयुष्य त्यांना केवळ याच पवित्र मंगलमय कार्यासाठी वेचावे लागते. म्हणूनच त्यांनी निर्माण केलेले पथ म्हणजेच पंथ (मार्ग) हे ज्योतिष्मान असतात. सद्बुद्धीच्या बळावर त्यांनी रचलेले हे परंपरांचे सन्मार्ग रक्षणाकरिता आपणांस प्रयत्न करावयास हवा. आम्हांस नवे चांगले असे काही करता आले नाही, तरी चालेल पण किमान आपल्या पूर्वजांच्या पवित्र प्रथांचे व परंपरांचे जतन तरी करता आले पाहिजे. तिसर्‍या चरणात म्हटले आहे - जोगुवाम् अप: अनुल्बणं वयत। ‘जोगू’ शब्दाचा अर्थ विद्वान किंवा ईश्वराची उपासना करणारे अथवा सामगान करणारे असा होतो. या विद्वानांनी जे ’अप:’ म्हणजेच मार्ग निर्माण केले आहेत, त्या मार्ग किंवा प्रथांना निर्भ्रांतपणे व स्वतःहून वेगळे प्रक्षेप न करता पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा भविष्यकालीन समाज बिघडण्याचा धोका होऊ शकतो. वस्त्र विणताना एखादा धागा तुटला तर विणकर त्याला जोडण्यासाठी मध्येच गाठ बांधतो. याच गाठीला ’उल्बण’ असे म्हणतात. या गाठीमुळे वस्त्राची सुंदरता नाहीशी होते. आपल्या प्राचीन वैदिक वाङ्मयात असे हे उल्बण काल्पनिक प्रक्षेपांच्या रूपाने मोठ्या प्रमाणात झाले. यामुळे आपल्या ऋषिमुनींनी व स्मृतिकारांनी रचलेला वेदज्ञान मार्ग संकुचित झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात संकीर्णता उदयास आली. परिणामी, देशाची वैभवशाली परंपरा लयास गेली.जर मानवाने सदरील मंत्रातील आशयजीवनात उतरवला, तर ‘निश्चित असतो मनुर्भव’ म्हणजेच श्रेष्ठ मानव बनेल व आदर्श समाज घडवण्यात यशस्वी ठरेल.


-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121