मुंबईतील पाणथळीच्या कथा आणि व्यथा

    31-May-2021
Total Views | 489
flamingo_1  H x
 
मुंबईच्या खाडीलगत असणारा दलदलीचा परिसर हा स्थलांतरित पक्ष्यांना पोषक खाद्य पुरविण्याकरिता समृद्ध आहे. दलदलीच्या परिसरात लहान मासे, नील आणि हरित शैवाळ, जलकीटकांच्या अळ्या, एकपेशी वनस्पती हे खाद्य विपुल प्रमाणात मिळत असल्याने स्थलांतरित पक्ष्यांसोबत फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी स्थलांतर करतात. मुंबईतील महानगर क्षेत्रातील अशा काही महत्त्वाच्या पाणथळींचा घेतलेला हा वेध...
 
 
 
माहुल-शिवडीची खाडी
 
 
माहुल-शिवडी आणि ट्रॉम्बे खाडीतील दलदलीचा प्रदेश अरबी समुद्राला मिळालेला आहे. एकंदरीत हा पट्टा भरती-ओहोटीच्या दलदलीचा भाग (ळपींशीींरळवरश्र र्ाीवषश्ररीं) आहे. या परिसरातील जमिनीकडील बाजूला सर्वत्र कांदळवने पसरलेली आहेत. एकूण विस्तार दहा किमी लांबी आणि तीन किमी रुंदी असलेला हा दलदलीचा पट्टा उत्तर गोलार्धातून स्थलांतर करून येणार्‍या हजारो पक्ष्यांचे हिवाळी आश्रयस्थान बनतो. त्यात विशेष करून चिखलपायट्या पक्ष्यांचा समावेश असतो. कच्छच्या रणातून आणि मध्य पूर्वेतून स्थलांतर करून येणारे हजारो छोटे रोहित येथे जवळपास सहा महिन्यांसाठी आश्रयाला येतात. येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक रसायनांचे प्रदूषण असूनसुद्धा पक्षी येथे येतात आणि मुक्काम करतात. येथे स्थलांतर करून येणार्‍या पक्ष्यांची एकूण संख्या 50 हजार असावी, असे अनुमान केले जाते. याठिकाणी हजारो फ्लेमिंगो आणि चिखलपायटे (ुरवशीी) पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, सध्या या दलदलीपासून नवी मुंबईला जोडणारा ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ प्रकल्पाअंतर्गत सागरी पूल बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. अशाही परिस्थितीत ओहोटीच्या वेळेस हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो आणि इतर पाणपक्षी बांधकाम सुरू असलेल्या दलदलीवर अन्नग्रहण करताना दिसतात.
 
 
 
ठाण्याची खाडी (ठाणे-मुंबई)
 
 
ठाणे खाडीचा पूर्व किनारा ठाणे व नवी मुंबई जिल्ह्यांमध्ये येतो, तर पश्चिम भाग बृहन्मुंबई जिल्ह्यात येतो. उल्हास नदीचे गोडे पाणी ठाणे खाडीला येऊन मिळते. तसेच या तिन्ही जिल्ह्यांचे सांडपाणी उल्हास नदी तसेच ठाणे खाडीत येऊन मिळते. अर्थात, त्यामुळे ठाण्याच्या खाडीतील पाणी खूप प्रदूषित झाले आहे. खाडीच्या भोवती कांदळवने तसेच मिठागरे आहेत. ठाण्याची खाडी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांनी गजबजते. त्यामुळेच राज्य सरकारने 2015 साली येथील 16.905 चौ.किमी खाडीक्षेत्र ठाणे खाडी ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून घोषित केले. तसेच 48.32 चौ.किमी क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्राला संरक्षण मिळाले. या ठिकाणी एक लाख पक्षी आसरा घेऊ शकतात. विशेष करून लाखोंच्या संख्येत स्थलांतर करून येणारे छोटे आणि मोठे फ्लेमिंगो इथले मुख्य आकर्षण आहेत. सोबतच हजारोंच्या संख्येने चिखलपायटे पक्षी याठिकाणी येतात.
 
 
 
उरणच्या पाणथळी
 
 
उरण तालुक्यात अंदाजे 32 हजार, 600 हेक्टरवर पसरलेले खाजण म्हणजेच पाणथळ क्षेत्र आहे. ’शहर व औद्योगिक विकास महामंडळा’ने(सिडको) 1971-72 साली या तालुक्यातील 26 गावांमधील शेतजमिनी आणि सरकारी खाजण जमिनी (27 हजार, 150 हेक्टर) ताब्यात घेतल्या. या जमिनी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी भाडे तत्त्वावर देण्यात आल्या. उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडस्थित ’जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’ची(जेएनपीटी) 2,240 हेक्टर, ’नवी मुंबई स्पेशल इकोनॉमिक झोन’ची(एनएमसीईझेड) 1,250 हेक्टर आणि ’सिडको’ची 5,127 हेक्टर मालकी जमीन आहे. तसेच या जमिनी आता पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील ’सीआरझेड’ कायद्याच्या अंतर्गत येतात. त्यामुळे याठिकाणी कोणत्याही प्रकारचे विकास काम करताना ’महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा’ची (एमसीझेडएमए) परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या दशकभरापासून उरण तालुक्यातील पांजे, भेंडखळ, पागोटे आणि आसपासच्या पाणथळ क्षेत्रांवर अतिक्रमणांनी वेग पकडला आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसह कांदळवनांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणार्‍या या जमिनींचा आता र्‍हास होऊ लागला आहे.
 
 
 
 
 
 
 
नवी मुंबईच्या पाणथळी
 
 
नवी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने पाणथळ जागा अस्तित्वामध्ये आहेत. या पाणथळ जागा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यामधील पक्ष्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. कारण, खाडीमध्ये भरती सुरू झाल्यानंतर दलदलीमध्ये अन्नग्रहण करणारे पक्षी हे आरामासाठी खास करुन नवी मुंबईतील पाणथळी जागांवर येतात. तलावे, टी. एस. चाणक्य, डी. पी. एस तलाव या पक्ष्यांकडून वापरल्या जाणार्‍या महत्त्वाच्या जागा आहेत. मात्र, या जागांवर भराव टाकून त्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे. तलावे येथील पाणथळीवर येणारे भरतीचे पाणी सध्या अडवण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे फ्लेमिंगो पक्षी याठिकाणी आश्रयाकरिता येत नसल्याची नोंद करण्यात आली आहे. ’बीनएसएच’च्या शास्त्रज्ञांनी पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी 2019 साली टी. एस. चाणक्य येथील पाणथळीवर ‘सॅण्डपायपर’ पक्ष्याच्या पायाला टॅग लावला होता. 2020 मध्ये हा पक्षी भांडुप उदंचन केंद्रामधील पाणथळीवर पाहण्यास मिळाला आणि आता 6 मे रोजी हा चीनमध्ये सापडला. त्यामुळे या निरीक्षणावरून नवी मुंबईतील पाणथळीचे महत्त्व अधोरेखित होते.
 
 
 
 
नवी मुंबईतील पाणथळी का महत्त्वाच्या ?
 
 
मुंबईतील शिवडीच्या पाणथळींवर ’ट्रान्सहार्बर लिंक’ आणि नवी मुंबईत विमानतळाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येथील पाणथळींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी नवी मुंबई आणि उरणमधील पाणथळ जागांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे या दोन्ही प्रकल्पांच्या पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करणार्या ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने म्हटले आहे. सध्या उरणमधील पांजे, भेंडखळ, पागोटे, जाईसइ आणि नवी मुंबईतील तलावे, टी. एस. चाणाक्य येथील पाणथळींवर भराव टाकून त्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे. हे काम असेच सुरू राहिल्यास स्थलांतरित पाणपक्ष्यांबरोबर स्थानिक पाणपक्ष्यांचे अधिवास नष्ट होतील. ज्यामुळे याठिकाणी येणारे पक्षी नवी मुंबईच्या विमानतळाच्या जागेकडे वळतील. त्यामुळे विमान अपघात होण्याची शक्यताही ’बीएनएचएस’ने वर्तवली होती.
 
 
 
 
फ्लेमिगोंचा नवा अधिवास
 
 
दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात स्थलांतर करून शिवडी, माहुल, ठाणे खाडी, भांडुप उदंचन केंद्र याठिकाणी फ्लेमिंगो पक्षी डेरेदाखल होतात. साधारण सहा ते सात महिने या ठिकाणी वास्तव्य करून विणीच्या हंगामासाठी हे पक्षी पुन्हा आपल्या मायदेशी परतात. मात्र, आता अशी परिस्थिती राहिली नसून गेल्या तीन वर्षांपासून गोराईसह मालाडच्या खाडी क्षेत्रात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी उतरत आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार यापूर्वी हे पक्षी या परिसरात स्थलांतर करत नव्हते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी हे फ्लेमिंगो याठिकाणी येत असल्याचे स्थानिक सांगतात.
 
 
 
 
असेही एक निरीक्षण
 
 
मुंबईमधील एक उदाहरण म्हणजे, ठाणे खाडीवरुन जाणार्‍या मुलुंड-ऐरोली पुलाच्या बांधकामावेळी पर्यावरणवाद्यांनी रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गात अडथळा निर्माण होणार असल्याची बोंब ठोकली होती. मात्र, प्रत्यक्षात पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फ्लेमिंगो पक्ष्यांनी तो अधिवास स्वीकारला. आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळेदेखील फ्लेमिंगो पक्ष्याच्या अधिवासाला धोका निर्माण होत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात न्हावा येथील पुलाच्या बांधकाम परिसरात हजारो फ्लेमिंगो आसरा घेऊन असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. पुलाच्या बांधकाम परिसरात हजारो फ्लेमिंगो पक्षी बिनदिक्कत अन्नग्रहण करत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121