नवी दिल्ली : 5G टेक्नॉलॉजी आणि यामुळे सामान्य जनता,जीव- जिवाणू आणि पर्यावरणावर होणारा परिणाम यावर अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात ही टेक्नॉलॉजी लागू करण्यात येऊ नये यासाठी याचिका दाखल केली आहे. ५Gसाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल टॉवरच्या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विशेष अभियान चालवत आहे. यावेळी या टेक्नॉलॉजीचे संभाव्य धोके बघता तिने यासाठी कायदेशीर मार्ग पत्करला आहे. या याचिके पुढील सुनावणी २ जूनला होणार आहे.
अभिनेत्री जुही चावलाचे म्हणणे काय?
अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखला करताना म्हंटले आहे की, "5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी यामुळे सामान्य जनता,जीव- जिवाणू आणि पर्यावरणावर होणा-या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा. त्यानंतर या अहवालांच्या आधारे भारतात 5G लागू करायचे की नाही या संदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली आहे."
याआधीदेखील तिने मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशन्सचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी केली होती. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले आहे की, "अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अजिबात विरोध नसून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन अधिक सुसह्य झाले आहे. परंतु, आम्ही स्वत: यासंदर्भातील गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा 'आरएफ' रेडिएशन आपल्यासाठी अतिशय घातक असल्याचे समोर आले आहे. पर्यावरण तसेच मानवी आरोग्यासाठी ही घटक ठरू शकते. ही एक गंभीर बाब आहे" असे स्पष्ट केले.