मुंबई : १८ ते २२ जूनदरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. यासाठी भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. यावेळी भारतीय संघ हा नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. ही जर्सी नव्वदीच्या दशकाची आठवण करून देणारी आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने या जर्सीचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला. यामध्ये त्याने 'पुन्हा ९०' असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला.
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. हा सामना इंग्लंडयेथील साउथॅम्प्टन स्टेडीयमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, जर हा सामना अनिर्णीत किंवा टाय झाला तर दोन्ही संघांना संयुक्तपणे या स्पर्धेचा विजेता घोषित केला जाईल. मात्र, विराटची सेना हा सामना जिंकून आयसीसीचा आणखी एक चषक भारतात घेऊन येण्यास सज्ज आहे. त्यामुळे संपूर्ण क्रीडाविश्वाचे या अंतिम सामन्याकडे लक्ष लागले आहे.