मुंबई : क्रांतिसूर्य स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे विचार परस्पर विरोधी होते, हा गैरसमज समाजात पसरवला गेला. हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हे कडवट हिंदुत्ववादी होते म्हणूनच हिंदू विरोधी शक्तींनी नेहमीच या दोघांनाही वेगवेगळे करण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र तो विफल ठरला. संघाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये स्वा. सावरकर यांचा उल्लेख केला जातो. तर हिंदू महासभेतही संघाच्या कार्याचे कौतुकच केले जाते.
शुक्रवार दिनांक २८ मे २०२१ स्वा. सावरकर यांची १३८व्या जयंती निमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक मधील सावरकर यांच्या पुतळ्यास प्रतिवर्षी प्रमाणे पुष्पार्पण केले जाणार आहे. तसेच, या वर्षी मुंबईत चक्रीवादळामुळे अनेक वृक्ष कोलमळून पडले. त्यामुळे पर्यावरणाची नासधूस तर झालीच आहे, पण भविष्यात प्राणवायूची कमतरता देखील माणसांना होऊ शकते. त्याचा विचार करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आयाम राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद यांच्या पुढाकाराने तसेच राष्ट्राभिमानी सेवा समिती, ज्ञानदा प्रबोधन संस्था यांच्या सहकार्याने वृक्ष रोपणाचे कार्य हाती घेतले आहे. या संपूर्ण कार्याला निसर्गप्रेमी सीमाताई खोत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
स्वा. सावरकर यांच्या जयंतीच्या दिनी सावरकर स्मारकात वृक्ष रोपण करून त्याचा शुभारंभ करणार आहे. ५ जून ला संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या ४८ व्या स्मृतिदिनाचे व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी वृक्ष रोपण करणार आहेत. हे वृक्ष हुतात्मा झालेल्या त्या सर्व क्रांतिकारक आणि सैनिकांना समर्पित केले जाणार आहेत. वृक्षारोपण मोहिमेत महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून स्वदेशी वृक्षांची मदत देण्याचे आश्वासन मुंबई उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिले आहे. स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रा. स्व. संघ , विहिंप , राष्ट्र सेविका समिती आणि हिंदू महासभेचे पदाधिकारी सावरकर स्मारकात उपस्थित राहणार आहेत.