‘आयपीओ’त गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2021   
Total Views |

IPO_1  H x W: 0
 
 
 
नजीकच्या भविष्यात गुंतवणूकदारांना ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग्ज’ (आयपीओ)च्या संधी फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. बर्‍याच कंपन्या आपले ‘आयपीओ’ नजीकच्या भविष्यात ‘लॉन्च’ करणार आहेत. गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का? त्याविषयी आज सविस्तर माहिती जाणून घेऊया...
 
 
आपण इतिहासात डोकावून बघितलं तर १९९२ साली फार मोठ्या प्रमाणावर ‘आयपीओ’ ‘लॉन्च’ झाले होते. दिवसाला सरासरी पाच ते सहा कंपन्यांचे ‘आयपीओ’ भांडवली बाजारपेठेत प्रवेश करीत होते. त्याकाळात भारतीय अर्थव्यवस्थेवर जणू या ‘आयपीओ’चे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यानंतर हर्षद मेहता शेअर घोटाळा उघडकीस आला व ‘आयपीओ’ बाजारपेठ पूर्णत: उद्ध्वस्त झाली. बर्‍याच लोकांचे बरेच पैसे बुडाले. ‘आयपीओ’ विक्रीस काढलेल्या कित्येक कंपन्या, कित्येक प्रकल्प अस्तित्वातच आले नाहीत. त्या काळात ज्यांनी ‘आयपीओ’त गुंतवणूक केली होती, त्या कंपन्यांचे शेअर बाजारात ‘ट्रेडिंग’च होत नाही. गुंतवणूकदारांकडे लावलेल्या गुंतवणुकीची जर ‘शेअर सर्टिफिकेट’ असतील, तर ती आता फक्त रद्दीतच विकावी लागतील व कित्येकांनी फाडूनही टाकली असतील. हर्षद मेहता शेअर घोटाळ्यानंतर पुढील सुमारे दोन वर्षे ‘आयपीओ’चे अस्तित्वच नव्हते. आता पुन्हा भांडवली बाजारपेठेत ‘आयपीओ’ मुसंडी मारीत आहेत. तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, याबाबत गुंतवणूकदार साशंक आहेत.
 
 
२०२०-२०२१ या आर्थिक वर्षी ‘आयपीओ’त फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. गेल्या दहा वर्षांत दुसर्‍या क्रमांकाची गुंतवणूक झाली.
 
 

IPO 1_1  H x W: 
 
 
 
वरील आकडेवारीवरून हे लक्षात येते की, भारतीय गुंतवणूकदार ‘आयपीओ’तील गुंतवणुकीला जास्त परतावा मिळावा, या हेतूने फार मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतात. पण, सरसकट कोणत्याही ‘आयपीओ’त गुंतवणूक करु नका. ‘आयपीओ’च्या ‘मेरिट्स’वर गुंतवणूक करा. ‘लॉन्च’ होणार्‍या ‘आयपीओ’पैकी फक्त दहा टक्के ‘आयपीओ’च गुंतवणूक करण्यास योग्य असतात, असे या क्षेत्रातील जाणकरांचे मत आहे. अलीकडे ‘नझारा टेक्नॉलॉजीस्’ या कंपनीचा ‘आयपीओ’ प्रतिशेअर १,१०१ रुपये या मूल्याने बाजारात विक्रीस आला होता. आता याचे शेअर बाजारात मूल्य १,६८० रुपयांच्या दरम्यान आहे. ‘कल्याण ज्वेलर्स’च्या ८७ रुपये मूल्याने विक्री झालेला शेअर आज शेअर बाजारात ६० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. ज्यांनी ‘कल्याण ज्वेलर्स’च्या ‘आयपीओ’त गुंतवणूक केली नसेल, त्यांना आज तो शेअर कमी मूल्यात मिळू शकतो.
 
 
जशी शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते, तशी ‘आयपीओ’तील गुंतवणुकीतही जोखीम आहे. शेअर बाजारात ‘लिस्ट’ झालेल्या कंपनीबाबत जितकी माहिती उपलब्ध असते, तितकी माहिती ‘आयपीओ’त विक्रीस काढलेल्या कंपनीबाबत नसते, हा एक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ‘मायनस पॉईंट’ ठरू शकतो. ‘आयपीओ’त गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचे प्रवर्तक, कंपनीचे व्यवस्थापन त्यांचा इतिहास व ज्या क्षेत्रातील ही कंपनी आहे, त्या क्षेत्रात या कंपनीचे स्थान याची माहिती गुंतवणूकदाराने करुन घ्यावयास हवी.
 
 
साधारणपणे तीन प्रकारच्या कंपन्या ‘आयपीओ’ ‘लॉन्च’ करतात. कंपन्यांना विस्तारासाठी किंवा नवीन उत्पादन निर्मितीसाठी किंवा अस्तित्वात असलेली कर्जे फेडण्यासाठी तसेच कॉर्पोरेट कारणांसाठी खेळते भांडवल म्हणून निधीची आवश्यकता भासते. नवी यंत्रणा उभारणे या निधीसाठी बँकांकडे गेल्यास गरजे इतके कर्ज संमत होईलच, याची खात्री नसते. थोड्याशा कालावधीनंतर व्याज फेडावे, मूळ रक्कम फेडावी लागते. जर ‘आयपीओ’तून पैसा जमविला, तर त्यात व्याज द्यावे लागत नाही. लाभांश द्यावा लागतो. पण, लाभांश दिलाच पाहिजे असा कायदा नाही. कंपनी नफ्यात असेल तरच लाभांश द्यावा लागतो. जनतेकडून गोळा केलेला पैसा कंपनीला परत करावा लागत नाही. शेअर ‘लिस्ट’ झाल्यानंतर तो विकून गुंतवणूकदार नफा कमवू शकतो किंवा तोटा सोसू शकतो. त्यामुळे कंपन्या ‘आयपीओ’ ‘लॉन्च’ करायला प्राधान्य देतात.
 
 
 
IPO 2_1  H x W:
 
 
 
‘आयपीओ’तून जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जाणारा आहे, यालाही महत्त्व द्यायला हवे. कंपनी जर ‘आयपीओ’तून जमा करणारा निधी विस्तारासाठी वापरणार असेल तर चांगले पण कंपनीचे ‘अनलिस्टेड’ शेअर सध्या कोणाच्या तरी ताब्यात आहेत, त्यांना ते ‘आयपीओ’ मार्गे विकायचे असतील, तर अशा ‘आयपीओ’त गुंतवूणक करणे जोखमीचे ठेवू शकते. जर मोठ्या वित्तीय कंपन्या एखाद्या ‘आयपीओ’त गुंतवणूक करीत असतील किंवा ‘एलआयसी’ सार्वजनिक उद्योगातील बँका वगैरे गुंतवणूक करीत असतील तर अशा ‘आयपीओ’त गुंतवणूक करावी. कारण, यांनी कंपनीच्या आर्थिक स्थितीचा भविष्याचा फार सूक्ष्मपणे अभ्यास केलेला असतो. एवढा खोलवर अभ्यास करण्याची क्षमता यंत्रणा आपल्याकडे नसते. त्यामुळे अशा कंपन्या तर एखादा ‘आयपीओ’ पसंद करीत असतील, तर आपल्यासाठी अशात गंतवणूक करणे कमी जोखमीचे ठरू शकते. ‘आयपीओ’ ‘लिस्ट’ झाल्यानंतर तत्काळ विकू नका. जर तुम्ही हे शेअर ‘होल्ड’ केले, तर कदाचित भविष्यात जास्त परतावाही मिळू शकतो. शेअर बाजारात किंवा ‘आयपीओ’त गुंतवणूक करताना ती दीर्घ मुदतीसाठीच करावी, तरच त्यातून चांगला फायदा होऊ शकतो.
 
 
शेअर बाजारात तेजीने असणार्‍या काही कंपन्या
 
 
या कंपन्यांचे ‘आयपीओ’ गेल्या तीन ते चार वर्षांत ‘लॉन्च’ झाले होते व आजचे या कंपन्यांच्या शेअरचे बाजारमूल्य प्रचंड वाढलेले असून या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलेले आहे, हा असा प्रचंड परतावा फक्त शेअर बाजारातील व्यवहारांतच मिळू शकतो.
 
 
 
IPO 3_1  H x W:
 
 
प्रचंड तोट्यातील कंपन्या
 
 
या कंपन्या कशा फायद्यात गेल्या? या कशा तोट्यात गेल्या? याबाबतचे निश्चित ठोकताळे शेअर बाजाराच्या बाबतीत करता येत नाही. तोटा का झाला? फायदा का झाला? यांचा अंदाजच वर्तविला जातो. शेअर बाजारात असेच होईल, असे छातीठोकपणे कोणीही सांगू शकत नाही.
 
 
दरम्यान, येत्या वर्षभरात गुंतवणूकदारांला भांडवली गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ६० हून ‘एमएसएमई’ उद्योग येत्या वर्षभरात ‘आयपीओ’ ‘लॉन्च’ करणार आहेत. गेल्या आर्थिक वर्षी १६ ‘एमएसएमई’ कंपन्यांनी मुंबई शेअर बाजारात ‘आयपीओ’ ‘लॉन्च’ केले होते. यातून या कंपन्यांनी १०० कोटी रुपयांची उभारणी केली होती. ‘एमएसएमई’ कंपन्यांची भांडवल उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर ‘आयपीओ’ विक्रीस काढावेत व या उद्योगांनी भांडवली बाजारात सक्रिय व्हावे, यासाठी छोट्या उद्योगांना प्रोत्साहन मुंबई शेअर बाजारतर्फे दिले जात आहे.
 
 
हर्षद मेहताच्या काळात गुंतवणूकदार जसे भरडले गेले, तेवढे आता जाऊ शकत नाहीत. कारण, हर्षद मेहता प्रकरणातून धडा घेऊन ‘सेबी’ या भांडवली बाजाराच्या नियंत्रक यंत्रणेने बरेच निर्णय घेतले. त्यामुळे गुंतवणूकदार आता पूर्वीइतके भरडले जाऊ शकत नाहीत. ‘आयपीओ’ विक्रीस काढल्यापासून त्याचे ‘लिस्टिंग’ करण्याचा कालावधी बराच कमी केला. तसेच अगोदर शेअरसाठी अर्ज करताना भरलेली रक्कम कंपनीकडे जात असे व शेअर वाटप झाले नाही, तर ते पैसे परत मिळविणेही गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी ठरायचे. आता ‘सेबी’ने ‘एएसबीए’ (अस्बा) असा नियम केला आहे. या नियमाने गुंतवणूकदाराने अर्जासोबत भरलेली रक्कम बँकेकडेच राहते. जर शेअर वाटप झाले तर जितके शेअर वाटप झाले असेल तितकी रक्कम बँक ‘आयपीओ’ विक्रीस काढलेल्या कंपनीस देते, ज्याची ‘अस्बा’मध्ये आहे, त्याला त्या रकमेवर बँकेतर्फे व्याजही मिळते. एखाद्याला ‘आयपीओ’ काढायचा असेल तर त्यासाठी ‘सेबी’ची परवानगी लागते व ‘सेबी’ची योग्य छाननी करुनच परवानगी देते. त्यामुळे ‘आयपीओ’तून पैसे गोळा करुन पळणार्‍या कंपन्यांना चांगलाच चाप बसला आहे. तरुणांनी त्यांच्या वयाचा विचार करता शेअर बाजारात गुंतवणुकीस जोखीम घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी मात्र डोळस वृत्तीने गुंतवणूक करावी.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@