रश्मी वहिनींच्या आग्रहास्तव उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री!

    26-May-2021
Total Views | 1537

Uddhav _1  H x


'गगनभेदी थत्ते भाग-३'मध्ये ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्तेंचा गौप्यस्फोट

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना शिवसेनेकडून मुख्यमंत्री कोण होणार यावेळी एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि अनिल परब ही तीन नावे चर्चेत होती. मात्र, 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांनी साहेबच (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री होणार, असे म्हणत या चर्चेला पूर्णविराम दिला. ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी 'सा.विवेक' आणि 'महाMTB' आयोजित 'गगनभेदी थत्ते भाग-३' या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यात रस नव्हता मात्र, रश्मी ठाकरे यांनी पुढील राजकीय डावपेच ओळखून हा निर्णय घेतल्याचे थत्ते यांनी सांगितले.
 
 
थत्ते म्हणाले, "महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदाची माळ संजय राऊत यांच्या गळ्यात पडावी, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची होती. तर एकनाथ शिंदे यांच्या मागे ३०-३२ आमदारांचे पाठबळ होते. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत होते. अनिल परब यांचेही नाव या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते मात्र, आमदारांचे पाठबळ परब यांच्याकडे नव्हते. ही तिनही नावे चर्चेत असताना रश्मी ठाकरे यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत, असा आग्रह धरला व मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली ही चर्चा त्वरित थांबवावी, असाही 'आदेश' दिला.
 
 
'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे या शिवसेनेत सक्रीय आहेत का, असा प्रश्न गेल्या काही काळापासून राजकीय वर्तूळात चर्चेचा मुद्दा असतो. थत्ते यांच्या या गौप्यस्फोटामुळे या शक्यतेला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला आहे. रश्मी ठाकरेंनी भविष्यात शिवसेनेसाठी धोका ओळखूनच मुख्यमंत्रीपद हे ठाकरे यांच्याकडेच रहावे, अशी खेळी केल्याचे थत्ते म्हणाले आहेत.
 
 
 
'पॉवर' मातोश्री बाहेर जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ?
 
 
उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा रश्मी ठाकरे यांनी आग्रह का केला, असा प्रश्न विचारला असता थत्ते म्हणाले, "जर संजय राऊत यांना मुख्यमंत्री केले तर ते पवारांच्या अधिक जवळचे आहेत. एकनाथ शिंदे हा पर्याय स्वीकारला तर त्यांच्या पाठीशी ३०-३२ आमदार आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षात शिंदे यांची मोठी ताकद तयार होऊ शकते. हे शिवसेना नेतृत्वाला नको होते. पुढे जाऊन अनिल परब यांचेही नाव पुढे आले त्यांच्या मागे आमदारांचे पाठबळ नसल्याने त्यांचेही नाव मागे पडले. अशावेळी ठाकरे यांच्याशिवाय पर्याय निर्माण करायचा नव्हता. म्हणून रश्मी ठाकरे यांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला."
 
 
पहा संपूर्ण मुलाखत
 
'गगनभेदी थत्ते' या सा.विवेक आणि महाMTBच्या नव्या मुलाखतींच्या शृंखलेत ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. किंवा महाMTB अॅप डाऊनलोड करा.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121