नव्या माहिती व तंत्रज्ञान नियमावलीविरोधात याचिका
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्र सरकारची नवी माहिती व तंत्रज्ञानविषयक नियमावलीमुळे वापरकर्त्यांच्या गोपनियतेचा भंग होणार आहे, त्यामुळे त्यांना स्थगिती देण्यात यावी. अशी याचिका व्हॉट्स अॅपतर्फे दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने २५ फेब्रुवारी रोजी माहिती व तंत्रज्ञानविषयक नवी नियमावली जारी केली होती. समाजमाध्यमे आणि डिजीटल प्रसारमाध्यमांसाठी ही नियमावली असून ती लागू करण्यासाठी ३ महिनांची मुदत देण्यात आली होती. सदर मुदत मंगळवारी संपुष्टात आली. दरम्यान, फेसबुक या समाजमाध्यमाने नियमावलीचे पालन करण्याची तयारी दर्शविली असून त्याविषयी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितले.
त्याचवेळी व्हॉट्स अॅपने मात्र केंद्र सरकारच्या नव्या माहिती व तंत्रज्ञानविषयक नियमावलीचे पालन करण्यास नकार दिला आहे. व्हॉट्स अॅपने केंद्र सरकाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदर नियमावलीमुळे वापरकर्त्यांच्या खासगी आयुष्याचा आणि गोपनियतेचा भंग असल्याचे व्हॉट्स अॅपने आपल्या याचिकेत म्हटले आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीचे पालन करणे म्हणजे वापरकर्त्यांच्या बोटांच्या ठशांची माहिती सार्वजनिक करण्यासारखे आहे, त्यामुळे सदर नियमावली स्थगित करण्याचा आदेश देण्यात यावा अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे.