मानसिक आजारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक नसतानाही त्याकाळात मनोविकारतज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतलेल्या आणि रुग्णसेवेतूनही सामाजिक भान जपणार्या डॉ. अद्वैत पाध्ये यांच्याविषयी...
डॉ. अद्वैत यांचा जन्म १९७२ साली ठाण्यात झाला. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिरातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. दहावीमध्ये त्यांना नशिबाने थोडी हुलकावणीच दिली. केवळ दोन गुणांनी त्यांची ‘मेरिट लिस्ट’ हुकली. दहावीनंतर काय करायचे, हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होता. कला की विज्ञान शाखा निवडावी, याविषयी मनात घालमेल सुरू होती. सारासार विचार करून त्यांनी विज्ञान शाखेवर शिक्कामोर्तब केले. ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या काळात बारावीच्या निकालावरच ‘मेडिकल’ला जाता येत होते. त्यासाठी वेगळी प्रवेश परीक्षा देण्याची गरज भासत नव्हती. जी. एस. मेडिकल महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांनी १९९४ साली ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केले. एक वर्ष त्याच ठिकाणी इंटर्नशिप केली. पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी काय विषय निवडायचे, असे विचार मनात सुरू होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या वाचनात डॉ. आनंद नाडकर्णी यांचे काही लेख आले. त्या लेखांचा प्रभाव मनावर होता. कला आणि ‘मानसोपचारा’शी संबंधित ‘मनोविकारतज्ज्ञ’ होऊ शकते, असे त्यांना वाटले. त्यामुळे कला आणि विज्ञान शाखा या दोन्हीची आवड जोपासली जाईल म्हणून ‘मनोविकारतज्ज्ञ’ होण्याचा निर्णय त्यांनी पक्का केला. डॉ. शुभांगी पारकर, डॉ. प्रकाश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यात डॉ. शुभांगी पारकर या विविध अॅक्टिव्हिटी करायच्या. उदा. व्यसनमुक्तीविषयी जनजागृती व्हावी, यासाठी पथनाट्य बसविणे, त्यामुळे मानसशास्त्र या विषयाची गोडी वाढतच गेली. के. जे. सोमय्या महाविद्यालयात दोन वर्षे मानसशास्त्रीय विभागात व्याख्याते म्हणून त्यांनी काम केले. दुसर्या बाजूला सायंकाळच्या वेळेत प्रॅक्टिस सुरू होती. हळूहळू जम बसत आहे, असे वाटू लागले. त्यामुळे २००१ मध्ये ‘मानस सायकोलॉजिकल सेंटर’ची स्थापना केली. त्या ठिकाणी समुपदेशन आणि नर्सिंग होम, अशी दोन्हीची सोय होती. या सेंटरला आता २० वर्षे पूर्ण होत आहेत. कामाचा व्याप वाढल्याने दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी सुरू असलेले नर्सिंग होम बंद केले. पण, समुपदेशन सुरू आहे. त्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय, उपचार यासारखे अनेक उपक्रम येथे चालतात.
‘स्क्रिझोफेनिया’च्या रुग्णांना नोकरी करता येत नाही. हा आजार तरुण वयात होणारा असल्याने शिक्षणही अर्धवट राहते. पालक, “तुम्ही त्यांना काम द्या,” अशी मागणी डॉ. अद्वैत यांच्याकडे करीत असत. त्यांच्या क्लिनीकची जागा फार मोठी नव्हती. मग त्या रुग्णांना बसवून ठेवून काय करणार. त्यातूनच या रुग्णांना पुनर्वसनची गरज असल्याचे डॉ. अद्वैत यांच्या लक्षात आले. ‘स्क्रिझोफेनिया’ रुग्णांच्या पालकांसाठी त्यांनी २००३ मध्ये एक परिषद घेतली. पण, या परिषदेला एकच पालक आले होते. तरीही डॉ. अद्वैत यांनी हार मानली नाही. त्या पालकाने इतर पालकांशी आपण संवाद साधू याची जबाबदारी घेतली. त्या एका पालकापासून परिषद भरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पालकांचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांची बैठकांना संख्या वाढू लागली. या सगळ्या उपक्रमांना एक व्यवस्थित स्वरूप देण्यासाठी ‘मनोदय ट्रस्ट’ची स्थापना केली. त्याअंतर्गत पालकांचा ‘सपोर्ट ग्रुप’ तयार झाला होता. सहा महिन्यांनंतर १५ ऑगस्ट, २००८ला रुग्णांसाठीचा मदत गट म्हणजेच ‘व्यवसाय पुनर्वसन गट’ तयार केला. यामध्ये रुग्ण आल्यावर त्यांना विविध थेरपी दिल्या जातात. योगासारख्या ‘अॅक्टिव्हिटी’ होतात. डान्स थेरपी होते. विविध प्रकारच्या वस्तू, शिवणकाम किंवा विविध प्रकारची पीठ तयार करणे या गोष्टी ते करतात. कोरोनाकाळात मार्च २०२० मधील पहिले दहा दिवस वगळता त्यानंतर ‘ऑनलाईन’वर्ग भरविण्यात येऊ लागले. हे सर्व जण ‘टेक्नोसॅव्ही’ असल्याने ‘ऑनलाईन’वर्गालाही व्यवस्थित हजेरी लावतात. या रुग्णांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचे कामही संस्थेतर्फे केले जाते. वस्तू विकून आलेल्या पैशांतून त्यांना प्रोत्साहन वेतन दिले जाते.
विविध प्रकारच्या प्रदर्शनातही स्टॉल लावले जातात. त्या रुग्णांचेही ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ गट तयार केले आहेत. त्यानुसार प्रोत्साहन वेतन दिले जाते. आपणही ‘ब’ गटातून ‘अ’ गटात गेले पाहिजे, अशी इच्छा निर्माण होते. या उपक्रमात कोणत्याही डॉक्टरांकडे उपचार घेत असलेले रुग्ण येऊ शकतात, ही मोकळीक दिली आहे. विविध आजारांसाठी सपोर्ट ग्रुप तयार केले. त्यामध्ये ‘आधारवड’, ‘चिंतन’, ‘प्रोत्साहन’, ‘फिनिक्स’, ‘उड्डाण’, ‘मधुशाला’ असे स्वमदत गट सुरू आहेत. हे सर्व वर्ग कोरोनाकाळातही ‘ऑनलाईन’ सुरू आहेत. ‘फिनिक्स’ सोमवार ते शनिवार ‘झूम’वर असतात. इतर वर्ग महिन्यातून एकदा ‘ऑनलाईन’ येतात. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती व्हावी याकरिता दरवर्षी मानसिक आरोग्याशी निगडित कार्यक्रम केले जातात. नाटक, सिनेमा दाखवून त्यावर चर्चा केली जाते. ‘माझी गोष्ट’, ‘कदाचित’, ‘देवराई’ हे विविध आजारांवरील सिनेमा दाखवून मनोरंजनाच्या माध्यमातून आजारांविषयी प्रबोधन त्यांनी केले आहे. ‘जाणीव’ या उपक्रमांतर्गत गेल्या दहा वर्षांपासून शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना व्यसनाधीनता आणि लैंगिक शिक्षण यावर मार्गदर्शन केले जाते, तसेच विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख व्हावी, यासाठी ‘मी अष्टपैलू’ ही स्पर्धा घेतली होती.
कोरोनाकाळात शिक्षणाचा पूर्णपणे गोंधळ सुरू आहे. परीक्षाबाबतचा तणाव, कमी गुण मिळतील का ही भीती असते. याशिवाय ‘ऑनलाईन’ शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल आला आहे. त्यामुळे बौद्धिक क्षमता फार नसलेली मुले ‘ऑनलाईन’ शिक्षणाकडे पाठ फिरविताना दिसून येत आहेत. मोबाईल हातात असल्याने ती गेम खेळण्याकडे अधिक वळत आहेत. कोरोनाकाळात मोबाईलचा वापर वाढल्याने मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणार्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोनाची लाट आल्याने अनेकांना आपल्यालाही कोरोना झालेला असेल का, अशी सातत्याने भीती वाटत असते. ‘कोविड योद्धा’ही सातत्याने काम करीत आहेत. त्यांच्या मनावर ओझे तयार होण्याची शक्यता आहे. ‘कोविड योद्धा’पासून ‘कोविड’मधून बरे झालेल्या प्रत्येकासाठी मोफत समुपदेशनाची सोय डॉ. अद्वैत पाध्ये यांनी केली आहे. त्यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या खूप खूप शुभेच्छा.